आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबतींत परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध असा एक विश्वविषयक व जीवनविषयक दृष्टिकोन होय.
या तीन बाबी अशा:
आधुनिक दृष्टिकोन अनुभवाधिष्ठित अशा वैज्ञानिक ज्ञानावर आधारलेला असतो. यात नीतिशास्त्र आणि मूलभूत मानवी प्रेरणा यांची सांगड घालून निश्चित झालेली नीतिमूल्ये, म्हणजे व्यक्ति-व्यक्तींमधील संबंधांचे नियंत्रण करण्यास आवश्यक असलेले सिद्धांत अंतर्भूत असतात. म्हणून आधुनिक नीतिमूल्ये ही बुद्धिनिष्ठ, इष्टसापेक्ष व इहलोकपर असतात. आधुनिकत्वाच्या दृष्टीने नैतिक प्रेरणेचा उगम, विश्वाचे नियमन करणारे एखादे सर्वशक्तिमान दैवत किंवा आधिभौतिक तत्त्व यांत नसून, मानवी मन आणि परिवर्तनशील ऐहिक परिस्थिती यांच्या परस्पर क्रियाप्रतिक्रियांत सापडतो. मनुष्याची अंतर्बाह्य परिस्थिती नेहमी बदलत असते;मनुष्याच्या ज्ञानात एकसारखी भर पडत असते आणि त्याच्या संवेदना अधिक व्यापक व सूक्ष्मग्राही होत असतात. त्याचबरोबर त्याची शारीरिक घडण व तिच्यातून उद्भवणाऱ्या मूलभूत प्रेरणा बव्हंशी स्थायी स्वरूपाच्या असतात. म्हणून आधुनिकत्वाच्या दृष्टीने नीतिमूल्ये जरी सापेक्ष असली, तरी त्यांना सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होत असते.
आधुनिक ज्ञानाचे स्वरूपही याच प्रकारचे होय. ते अनुभवाच्या निकषावर उतरणारे व प्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असले पाहिजे. आज संशयातीत वाटणारा सिद्धांतसुद्धा नवीन किंवा अधिक सूक्ष्म निरीक्षणामुळे उद्या चूक ठरण्याचा संभव असतो. आधुनिकत्वाच्या दृष्टीने कोणतेही सत्य अंतिम असू शकत नाही. सत्याची सतत चिकित्सा व्हावयास पाहिजे;म्हणून शास्त्रीय कार्यपद्धतीस शास्त्रीय ज्ञानाइतकेच महत्त्व असते. तसेच शास्त्रीय सत्य वर सांगितलेल्या अर्थाने तात्पुरते असल्यामुळे आधुनिक दृष्टिकोनात आग्रही वृत्तीस स्थान नाही.
ज्ञान आणि नीतिमूल्ये यांच्याकडे पाहण्याचा हा जो आधुनिक दृष्टिकोन आहे, त्यातच उदारमतवादी लोकशाहीचा तात्त्विक पाया सापडतो. ही लोकशाही व्यक्तीची प्रतिष्ठा आणि तिच्या हक्कांचे पावित्र्य यांच्यावर भर देते;कारण मनुष्य आणि विश्व यांबद्दलचे सर्व ज्ञान स्वभावतःच सापेक्ष आणि तात्पुरते असते व म्हणून अंतिम सत्य किंवा अंतिम मूल्ये यांच्या नावाने कोणत्याही हुकूमशाहीचे नैतिक समर्थन करता येत नाही. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीस, इतरांच्या स्वातंत्र्याआड न येता, स्वतःचा मार्ग चोखाळण्याचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य सर्वांस अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी जी संस्थात्मक चौकट आवश्यक असते, ती लोकशाही समाजरचना होय. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वास विविध पैलू असतात आणि त्याची क्षितिजे नेहमी रुंदावत असतात;म्हणून आधुनिक लोकशाही गतिशील असते व सर्वव्यापी होऊ पाहते. परंपरागत विचार, मूल्ये आणि संस्था यांची या प्रक्रियेच्या दृष्टीने चिकित्सा करून, त्यांपैकी प्रगतीच्या आड येणारे विचार, मूल्ये व संस्था यांचा खंत न बाळगता त्याग करणे व मानवी विकासास पोषक घटकांचा (उदा., करुणा, सहिष्णुता, ज्ञानोपासना इ.) आजच्या नवीन संदर्भात परिपोष करणे, हे आधुनिकत्वाचे वैशिष्ट्य होय.
लेखक: अ. भि. शाह
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/8/2023
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्...
आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये ज्याप्रमाणे ...