অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थायरॉईड रोग

प्रस्तावना

थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे (जगण्यासाठी आवश्यक कार्यं पेशी ज्या गतीनं करतात तो दर).

चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड संप्रेरकांचं उत्सर्जन करते, जे शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची ते सांगतात. योग्यप्रकारे काम करणारी थायरॉईड शरीराची चयापचय क्रिया समाधानकारक गतीनं चालू ठेवण्यासाठी आवश्यक प्रमाणात संप्रेरकांचं उत्पादन करते. संप्रेरक हे जसजसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही करत असते. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पोषग्रंथिव्दारे (पिट्युटरी ग्रंथी) केले जाते. मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पोषग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमीजास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिला काय करायचे ते सांगते.

थायरॉईड रोग म्हणजे काय आणि तो कोणाला होतो ?

ज्यावेळी थायरॉईड ही अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते, तेव्हा शरीर हे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना थायरॉईड रोग होऊ शकतो. तथापि, महिलांना पुरुषांच्या तुलनेत पाच ते आठपट अधिक प्रमाणात थायरॉईड समस्या होऊ शकते.

थायरॉईड रोग कशामुळे होतो ?

थायरॉइड दोन प्रकारे असतो - हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम

खालील स्थितींमुळं हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो

  • थायरॉयडीटीस – म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा दाह. यामुळं, तयार होणा-या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.
  • हाशिमोटोज् थायरॉयडीटीस – हा एक प्रतिकार यंत्रणेचा वेदनाविरहित रोग असून तो अनुवांशिक आहे.
  • प्रसवोत्तर थायरॉयडीटीस – हा रोग प्रसुतिनंतर ५ ते ९ टक्के स्त्रियांमधे होतो.  ही सामान्यतः एक तात्पुरती स्थिती असते.
  • आयोडीनची कमतरता – ही समस्या जगातील अंदाजे १०० दशलक्ष लोकांना आहे.  थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी आयोडीनचा वापर करते.
  • कार्य न करणारी थायरॉईड ग्रंथी – ही समस्या प्रत्येक नवजात ४००० बालकांमधे एकाला होते.  ही समस्या ठीक न केल्यास, ते मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग होऊ शकते.

खालील स्थितींमुळं हायपरथायरॉईडीझम होतो

  • ग्रेव्हज् रोगामुळं, संपूर्ण थायरॉईड ग्रंथी ही अतिक्रियाशील होऊ शकते आणि अति प्रमाणात संप्रेरक उत्पादित करते.
  • थायरॉईडच्या अंतर्गत नोड्यूल्स अतिकार्यशील होतात.
  • थायरॉयडीटीस, ही समस्या वेदनामय किंवा वेदनारहित असू शकते, थायरॉईडमधे साठवून ठेवलेले संप्रेरक मुक्त केले जातात, त्यामुळं काही आठवडे किंवा महिने हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. वेदनारहित प्रकार हा अधिक प्रमाणात महिलांमधे प्रसुतिनंतर होतो.
  • अतिरीक्त आयोडीन हे अनेक प्रकारच्या औषधांमधे आढळते आणि त्यामुळं थायरॉईड ही काही व्यक्तींमधे अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात संप्रेरक निर्माण करते.

हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमची लक्षणे

हायपोथायरॉईडीझमची लक्षणे

  • थकवा येणे
  • वारंवार, मोठ्या प्रमाणात मासिक स्त्राव होणे
  • विसरभोळेपणा
  • वजन वाढणे
  • कोरडी, खरखरीत त्वचा आणि केस
  • घोगरा आवाज
  • थंडी सहन न होणे

हायपरथायरॉईडीझमची लक्षणे

  • चिडचिडेपणा / अस्वस्थता
  • स्नायू कमकुवत होणे / थरथरणे
  • अनियमित, कमी प्रमाणात मासिक स्त्राव
  • वजन कमी होणे
  • झोप नीट न लागणे
  • वाढलेली थायरॉईड ग्रंथी
  • दृष्टीदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणे
  • उष्णता सहन न होणे

ज्यावेळी थायरॉईड रोगाचे लवकर निदान होते, तेव्हा लक्षणे दिसायला लागायच्या आधी ही समस्या नियंत्रणात ठेवता येते.  थायरॉईड रोग ही आयुष्यभराची स्थिती असते.  काळजीपूर्वक नियोजन केल्यास, थायरॉईड रोग असलेले लोक आरोग्यदायी, सामान्य जीवन जगू शकतात.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

आरोग्यविद्या-गलग्रंथी (थॉयरॉईड) विषयी अधिक माहिती

अंतिम सुधारित : 6/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate