सोबतच्या तक्त्यात रक्तस्रावाच्या कारणांचे तीन प्रमुख गट दिले आहेत.
एक गट म्हणजे पाळीशी संबंधित रक्तस्रावांची कारणे. यात होणारा रक्तस्राव संभाव्य तारखेस जोडून, थोडासा मागेपुढे होतो. यात मुख्यतः पाळीचा रक्तस्राव जास्त दिवस जात राहतो किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर रक्तस्राव होतो. साधारणपणे पाळीचा रक्तस्राव दोन ते पाच दिवस टिकतो. सुरुवातीचा व शेवटचा ठिपके येण्याचा भाग सोडल्यास मधले एक-दोन दिवस एक ते दोन घडया रोज भिजेपर्यंत रक्तस्राव होतो. मासिक पाळीसंबंधी रक्तस्रावाचा विचार वेगळया प्रकरणात केला आहे.
रक्तस्रावाचा दुसरा गट आहे-गरोदरपणाशी संबंधित असलेल्या आजारांचा. यात मुख्यतः निरनिराळया प्रकारचे गर्भपात (संभाव्य गर्भपात अटळ गर्भपात अपूर्ण गर्भपात दूषित गर्भपात आणि अस्थानी गर्भ) आणि गर्भाशयातील वारेशी संबधित रक्तस्राव येतात. यांचा विचार गरोदरपणाच्या प्रकरणात केला आहे.
तिसरा गट आहे -गर्भाशयात गाठ किंवा कर्करोगामुळे होणारा रक्तस्राव आणि जखमा
गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग
गर्भाशयाचा कर्करोग बहुधा गर्भाशयाच्या तोंडाशी तयार होतो. हा आजार मध्यम आणि त्यानंतरच्या उतारवयात होतो. याची मुख्य खूण म्हणजे पाळीशी संबंधित नसलेला अधूनमधून होणारा रक्तस्राव. याबरोबर वेदना असेलच असे नाही. पाळी थांबलेली असताना म्हणजे सुमारे 45-50 वर्षे वयानंतर अधूनमधून होणारा रक्तस्राव म्हणजे कर्करोगाचीच शंका आधी घेतली पाहिजे. कर्करोगासंबंधी नंतर जास्त माहिती दिली आहे.
कर्करोग नसलेल्या पण त्यापेक्षा साध्या (म्हणजे न पसरणा-या) गाठी गर्भाशयात होतात. या गाठी मुख्यतः मध्यम वयात येतात. या गाठींमुळे पाळी सोडून अधेमध्ये रक्तस्राव होतो किंवा पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो. 'आतून' तपासणी आणि सोनोग्राफीने नेमके निदान होऊ शकते.
तक्त्यात दिल्याप्रमाणे रक्तस्रावाची आणखी कारणे असू शकतात. संभोगातील जखम,विशेषतः जबरी संभोगातील जखमा, हे रक्तस्रावाचे एक महत्त्वाचे कारण आहे. पहिल्या संभोगाच्या वेळी योनिमार्गावरचा पडदा फाटल्याने रक्तस्राव होतो हे आपण पाहिलेच आहे.
जबरी संभोगातल्या जखमा मुख्यतः योनिमार्गाशी संबंधित असतात. पुढील निदानासाठी आणि उपचारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवावे. याबरोबर अर्थातच न्यायवैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. रक्तस्राव पाळीशी संबंधित आहे, की गरोदरपणाशी याचा आधी निर्णय करणे आवश्यक असते. पाळीचा रक्तस्राव सोडल्यास इतर सर्व कारणे तशी गंभीर आहेत. त्यांचे निदानही डॉक्टरकडून होणे आवश्यक आहे. पण रक्तस्रावावरून कारणाचा अंदाज बांधून संबंधित स्त्रीला समजावून सांगणे आवश्यक आहे. पुढच्या उपचारांची थोडीशी कल्पना त्यावरून देता येईल.
अंगावरून रक्तस्राव : गर्भाशय शस्त्रक्रियेऐवजी पर्यायी उपचार
गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया खूप केली जात असली तरी याला बरेच चांगले पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही एक मोठी बाब आहे. आरोग्य, खर्च व नंतरचा त्रास या तिन्ही दृष्टिकोनातून ती शक्यतोवर टाळलेली बरी. गेल्या दशकात यासाठी विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
अंगावरून तांबडे जाणे (स्त्रियांच्या अंगावरून रक्तस्राव) (तक्ता (Table) पहा)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
रक्ताभिसरण तंत्राच्या रक्तवाहिन्या या प्रमुख भागात...
शरीरात एखाद्या ठिकाणी कापले तर रक्तस्राव सुरू होतो...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...