प्रस्तावना :
लिंगसांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे सांसर्गिक आजार. याला पूर्वी गुप्तरोग असे नाव होते. त्यांतले महत्त्वाचे आजार म्हणजे गरमी (सिफिलिस), परमा (गोनोरिया), दुखरा व्रण (शांक्रॉईड), व्रणविकार (ग्रॅन्युलोमा इनग्वायनेल) एल.जी.व्ही. (मराठीत याला समर्पक शब्द नाही) हार्पिस ज्वर (हार्पिस प्रोजेनायटॅलिस) आणि नव्याने पसरणारा एड्स हे सात आजार आहेत.
याशिवाय खरूज, गजकर्ण, उवा हे त्वचेचे आजार पण यातून पसरु शकतात. तसेच स्त्री-पुरुष संबंधानंतर एक-दोन दिवसांत येणारा शिश्नदाह किंवा योनिदाह (एक प्रकारच्या बुरशीमुळे किंवा एकपेशीय जीवांमुळे-ट्रायकोमोनास) हाही लिंगसांसर्गिक आजारच आहे.
'बी' प्रकारच्या विषाणूंमुळे होणारी कावीळही लिंगसांसर्गिक मार्गाने पसरू शकते. हा आठवा लिंगसांसर्गिक आजार म्हणू या.
हे सर्व आजार एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे जाणारे आहेत. असे असले तरी सर्वसाधारणपणे महत्त्वाचे सात आठ आजार हे एकापेक्षा अधिक जणांशी लैंगिक संबंध ठेवणा-या व्यक्तींना होतात. उदा. वेश्यांशी संबंध करणा-या व समलिंगी व्यक्तींना यांचा संसर्ग जास्त होतो. नंतर हा संसर्ग त्यांच्यापासून त्यांच्या वैवाहिक जोडीदारांनाही होतो.
शिश्नदाह, योनिदाह,खरूज, गजकर्ण हे मात्र असे संबंध न ठेवणा-या व्यक्तींमध्येही असतात.
एड्स आणि 'बी'प्रकारची कावीळ ही व्याधी इंजेक्शन, रक्तदान या मार्गानेही पसरते.
निरोध वापराने लिंगसंसर्ग ब-याच प्रमाणात टळू शकतो. खरूज, गजकर्ण किंवा जननेंद्रियाच्या आजूबाजूला पसरणारे सांसर्गिक आजार मात्र निरोध वापराने टळणार नाहीत.
लिंगसांसर्गिक आजार (विशेषतः महत्त्वाचे सात-आठ आजार) टाळण्यासाठी निरोध हा सोपा उपाय आहे. मात्र निरोधमुळे शंभर टक्के संरक्षण मिळेल याची काही हमी नाही. कारण निरोध किवळ शिश्न झाकू शकते. आजूबाजूला जंतू असण्याची शक्यता असतेच. शिवाय निरोध निसटून किंवा फुटून संसर्गाची शक्यता असते.
महत्त्वाचे लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी स्वैर लैंगिक संबंध टाळणे हा सर्वोत्तम उपाय आहे. दुर्दैवाने अनेक आर्थिक, सामाजिक कारणांमुळे वेश्याव्यवसायात (उघड किंवा गुप्तपणे) स्त्रियांची संख्या वाढत आहे. तसेच पैसे टाकून शरीरसुख खरेदी करणा-या पुरुषांची संख्या सतत वाढते आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही हे लोण येऊन पोहोचले आहे.
लिंगसांसर्गिक आजारांपैकी अनेक आजारांचे परिणाम अगदी किळसवाणे व दूरगामी होतात. आजार 'गुप्त संबंधामुळे' आले असल्याने आजार झाकून ठेवण्याची प्रवृत्ती असते. या गुप्ततेमुळे त्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. उदा. सार्वजनिक मुतारीत लघवी करणे, हस्तमैथुन करणे यांमुळे गुप्तरोग होतात हा चुकीचा समज आहे. तसेच,झालेला रोग कोवळया मुलीशी (कुमारिका) संभोग केल्याने जातो असाही एक घातकी गैरसमज प्रचलित आहे. यामुळे अनेक निष्पाप मुली बलात्कार आणि गुप्तरोगांना बळी पडतात.
एक महत्त्वाची सूचना म्हणजे जननेंद्रियावर होणारा प्रत्येक आजार हा लिंगसांसर्गिक आजार असेलच असे नाही. कित्येक वेळा अस्वच्छतेमुळे त्वचारोग उद्भवतात. अज्ञानामुळे त्यांची भीती तयार होते. यामुळे संबंधित व्यक्तीस विनाकारण यातना भोगाव्या लागतात. अशा गैरसमजाने खरूज, गजकर्ण यांसारखे किरकोळ आजारही तपासणी व उपचाराविना राहून जातात.
आणखी एक सूचना म्हणजे लिंगसांसर्गिक आजारांची तपासणी व उपचार करताना त्याच वेळी जोडीदाराचीही तशीच तपासणी व उपचार होणे आवश्यक असते. अन्यथा आजार या एकमेकांमध्ये फिरत राहतील.
समाजातल्या लिंगसांसर्गिक आजारांचा नायनाट करायचा तर केवळ औषधोपचारांनी भागणार नाही. सुरक्षित शरीरसंबंधांना अनुकूल अशी सामाजिक स्थिती निर्माण झाली पाहिजे.
एचायव्ही संसर्ग :
कोणत्याही लिंगसांसर्गिक आजारासोबत एचायव्ही बाधा असू शकते. या आजारांच्या बरोबर एचायव्ही विषाणूंचा प्रवेश जास्त सोपा होता. पण एचायव्ही/एड्स लगेचच येईल असे नाही. यासाठी काही काळ जाऊ शकतो.
एचायव्ही एड्सची शक्यता यामुळे नेहमीच धरायला पाहिजे. दोन्ही आजार एकत्र आले असतील तर साध्या लिंगसांसर्गिक आजाराचा उपचारही गुंतागुंतीचा होतो; त्याचा कालावधी व औषधाचा डोस वाढतो.
लिंगसांसर्गिक आजारांसाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग असतो. यात नोंदलेल्या लिंगसांसर्गिक रुग्णांमध्ये एचायव्ही संसर्गाचे प्रमाण 10% इतके आढळते.
|