मुलांमध्ये व मोठयांमध्ये झटके येण्याची कारणे बहुधा वेगवेगळी असतात. झटका येणे म्हणजे स्नायूंचे इच्छेशिवाय व अचानक आखडणे. झटका एखाद्या स्नायूपुरता किंवा अनेक भागांत असतो (उदा. धनुर्वात). काही वेळा केवळ दातखीळ बसून सुरुवात होते. झटके सर्व शरीरभर पसरतात. झटक्यांच्या कारणांचा वयाप्रमाणे विचार करावा.
झटक्याची कारणे : लहान मुले (पाच वर्षेपर्यंत)
काही मुलांना जास्त ताप आल्यास झटका येतो. ताप उतरल्यावर झटके थांबतात. मेंदूला किंवा मेंदूच्या आवरणाला सूज आल्यास झटके येतात. धनुर्वात (हल्ली हा आजार आढळत नाही) काही विषारी पदार्थ पोटात गेल्यास. अपस्मार, फेफरे (पुढील आयुष्यातही टिकते). शरीरातले चुन्याचे प्रमाण कमी झाल्यास. डोक्यास मार लागून मेंदूला धक्का पोचला असल्यास. नवजात अर्भकांत शरीरातील चुना (कॅल्शियम) कमी झाल्यास किंवा शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास झटके येतात. नवजात अर्भकाचे झटके ओळखणे अवघड असते. या वयातले झटकेदेखील काही स्नायू भागांपुरतेच मर्यादित असतात. हाताचे स्नायू आखडणे, पाय सारखा जवळ ओढणे, पाठ जमिनीपासून उंचावून ताणून धरणे, मान वाकडी करणे, डोळे फिरवणे अशा विविध स्वरूपांत हे झटके येऊ शकतात. थोडयाशा अनुभवानंतर हे कळू शकते. अर्थात बाळाच्या आईला बाळाचे हे 'वेगळे वागणे' कळते. त्या मानाने मोठया मुलांना किंवा माणसांना आलेले झटके कळणे सोपे असते.
मोठेपणी झटके येण्याची कारणे
तरुण व प्रौढ वयातल्या झटक्यांमागे अपस्मार, फेफरे, धनुर्वात, विषबाधा, सर्पदंश,मेंदूला मार लागणे (उदा. अपघात), मेंदूला सूज, गाठ येणे यांपैकी काही कारण असू शकेल. झटका तीव्र व सर्व शरीरभर असेल तर ब-याच वेळा जीभ चावली जाते. वेडेवाकडे पडल्यामुळे जखम होऊ शकते, क्वचित बेशुध्दीही येऊ शकते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या