অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोवर ( Measles )

गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन गेल्यावर सहसा पुन्हा होत नाही. हा रोग ब्रायेरीअ‍ॅस मॉर्बिलोरम या विषाणूंमुळे होतो.

गोवराचा विषाणू हा मॉरबिलिव्हायरस गटातील आवरणयुक्त विषाणू आहे. विषाणूचे बाह्य आवरण हीमॅग्लुटिनीन-मेदाम्लानी बनलेले आहे. या आवरणात एसएसआरएनए सर्पिलाकार पद्धतीने गुंडाळलेला असतो. आरएनए न्यक्लिओप्रथिन आणि फॉस्फोप्रथिन समूहास न्यूक्लिओकॅप्सिड म्हणतात. गोवराचा विषाणू न्यूरामिनिडेझ विरहित विषाणू आहे.

हिवाळ्याच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस या रोगाची साथ येते. या रोगाचा प्रसार रुग्णाचे खोकणे, शिंकणे तसेच स्पर्शापासून होतो. गोवराची साथ संसर्गामुळे पसरण्याची शक्यता अधिक असते. गोवर त्वचेवर दिसू लागण्यापूर्वी फार सांसर्गिक असतो. रुग्णाचा गोवर मावळत असताना रोगाची संसर्गशक्ती कमी-कमी होत जाते.

गोवराचा विषाणू

गोवराच्या विषाणूंचा परिपाककाल १०–१४ दिवसांचा असतो व त्यानंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप येणे, मरगळल्यासारखे वाटणे, डोके व स्नायू दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे, नाक वाहणे, शिंका येणे व खोकला येणे अशी लक्षणे दिसतात. २-४ दिवसांनंतर अंगावर लालसर पुरळ उठते व ताप वाढतो. पुरळ लहान, गुलाबी व मधे पांढरा ठिपका असलेले असतात. हे पुरळ प्रथम तोंडात व गालाच्या आतल्या बाजूस येते. ४-५ दिवसांनंतर पुरळ केसाच्या मुळांशी फुटतात व त्याची लस शरीरभर पसरते. पांढर्‍या ठिपक्यांचे पुरळ भारतीय रुग्णांत आढळत नाहीत.

हे ठिपके हेन्‍री कॉप्लर या अमेरिकन बालरोगतज्ज्ञाने शोधून काढले म्हणून त्याला कॉप्लिक ठिपके म्हणतात. पुरळ पायापर्यंत पोहोचेपर्यंत ताप उतरतो व पुरळ कमी होऊ लागतात. काही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे श्वासनलिकेचा व फुप्फुसांचा शोथ (दाह) होतो. कधीकधी विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतात व मेंदूज्वर होतो. गोवर मावळताना पुरळ कमी होऊन, त्याच्या खपल्या पडू लागतात. अतिसौम्य गोवर, रक्तस्रावी किंवा काळा गोवर आणि विषारी गोवर असे गोवराचे वेगवेगळे प्रकार आहेत.

गोवराच्या विषाणूंवर परिणामकारक औषधे अजूनही उपलब्ध नाहीत. म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. १९५४ मध्ये जॉन एंडर्स याने गोवराच्या विषाणूंपासून गोवर प्रतिबंधक लस निर्माण केली. ही लस एम्.एम्.आर. या संयुक्त लशीचा भाग आहे. एम्.एम्.आर. ही लस लहान मुलांना पंधराव्या महिन्यात देतात व दुसरा डोस पाचव्या वर्षी देतात. [एम्. म्हणजे मम्प्स (गालगुंड) व मिजल्स (गोवर) आणि आर. म्हणजे रूबेला (वारफोड्या)]. गोवराच्या लशीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते. गोवर होऊन गेलेल्या व्यक्तीला लस दिल्यास गोवराची लागण होऊ शकते. अशा व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गॅमा ग्लोब्युलीनचे अंत:क्षेपण (इंजेक्शन) दिले जाते.


लेखक - शशिकांत प्रधान

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate