प्रस्तावना
कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मुतखडा, त्याची लक्षणे कोणती, जाणून घेऊया मुतखड्याविषयी....
मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात.
मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.
मुतखडा तयार होण्याचा धोका असणारे.
- ८०% रुग्ण पुरुष असतात.
- वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण
- २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती
- कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती
- ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.
- गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.
- गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे होण्याचे प्रमाण वाढते. मुतखडा तयार होण्याची प्रकिया
- लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
- पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
- मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.
मुतखड्याचे प्रकार
- कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.
- रक्तातील व लघवीतील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अॅसिडचे मुतखडे तयार होतात.
लक्षणे
- सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
- मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.
- यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते. तपासणीच्या पद्धती
- लघवीची तपासणी करणे, त्यात लघवीतील रक्तपेशी व जंतूंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
- सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते. सोनोग्राफीमुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडनीला त्याचा कितपत त्रास आहे, या सर्वांची उत्तरे मिळतात. रक्त तपासून किडनीचे कार्य कमी झालेले नाहीना, हे तपासावे लागते.
- पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.
- मूत्रमार्गाची एन्डोस्कोपी केल्यास मुतखडा तपशिलात समजतो.
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
- पाणी भरपूर पिणे.
- लघवी तुंबवून न ठेवणे.
- काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून त्याप्रमाणे पथ्य करावे.
एक महत्त्वाची गोष्ट. काही मुतखडे निदान झाल्या झाल्या लगेच काढावे लागतात. काही मुतखडे एकाद-दुसरा महिना थांबले तरी त्रास देत नाहीत. पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले का? हे अधुनमधून बघावे लागते. तर काहींना काही करावे लागत नाही. या सगळ्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.
डॉ. सुजाता पटवर्धन, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स
अंतिम सुधारित : 8/3/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.