অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मांजरसुंब्याने ग्रामविकास साधला

मांजरसुंबा (ता. जि. नगर) हे छोटेसे गाव. परंतु गावचे नेतृत्व तरुण कार्यकर्त्यांच्या हाती गेल्यानंतर गावचे रूप कसे बदलता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळते. पाणलोट, बचत गट, वृक्षारोपण, रोजगार हे सर्व सहजासहजी उपलब्ध करून दिल्याने अनेक बक्षिसांचे धनी झालेले हे गाव राज्यात चमकू पाहत आहे.

नगर-वांबोरी रस्त्यावर नगर शहरापासून सुमारे 25 किलोमीटरवर मांजरसुंबा हे खेडे वसले आहे. डोंगरगणचे रामेश्‍वर देवस्थान व गोरक्षनाथ गड या प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये वसलेले हे टुमदार खेडे आता जिल्ह्याचे लक्ष वेधून घेऊ पाहत आहे. मुख्य रस्त्यावरून वळण घेताच भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. अर्थात गावाकडील रस्त्यावर अर्धा किलोमीटर परिसरात बाजूंनी असलेली वृक्षराई उल्हासदायक वाटते. गावात गेल्यानंतर नीटनेटकी घरे लक्ष वेधून घेतात. घरांवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्‍ये वाचत असतानाच गावातील नेतृत्व, विकास यांची झलक दृष्टीस पडते. 

जालिंदर कदम गावचे सरपंच आहेत. गावाने त्यांची कार्यक्षमता व विकासकामांत पुढाकार घेण्याची वृत्ती पाहून त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास टाकला. त्यानंतर या सरपंच युवकाने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर गावात विकासाचे वारे वाहू लागले. सरकारी कार्यालये, सामाजिक संस्था, आरोग्य संस्था यांचा अभ्यास करण्यात आला. गावातील युवकांना रोजगार कसा देता येईल, तसेच गरिबांना घरे, रस्ते, वृक्षराईंसाठी नियोजन, सरकारी योजना आदींबाबत नियोजन गावपातळीवर सुरू झाले. हळूहळू गावचे रूपडे बदलू लागले. "आपलं पाणी' योजनेतून जर्मन अर्थसाह्यातून मांजरसुंबा गावची विकासासाठी निवड झाली.


असं आहे मांजरसुंबा गाव


  1. लोकसंख्या 1064, घरे 194, कुटुंब संख्या 194.
  2. क्षेत्र - 1009.43 हेक्‍टर
  3. डोंगराच्या पायथ्याला स्थान.

गावात झालेले महत्त्वाचे निर्णय


  1. दारूबंदी, गुटखाबंदी, व्यसनबंदी करण्यात आली आहे.
  2. चार वर्षांत गुन्हे दाखल नाहीत.
  3. श्रमदानातून काम करण्यावर भर
  4. कचरा व्यवस्थापनाचे नियोजन आहे.
  5. कचऱ्यातून गांडूळ खत प्रकल्प आहे.
  6. बायोगॅसचा वापर. गोबरगॅसचाही वापर होतो.
  7. एक व्यक्ती-एक झाड योजना राबविली.


गावाला मिळालेली पारितोषिके


  1. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान - द्वितीय क्रमांक 2003-4
  2. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान - प्रथम क्रमांक 2007-8
  3. संत तुकाराम वनग्राम पुरस्कार
  4. शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान पुरस्कार
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकता पुरस्कार
  6. "तंटामुक्त गाव' पुरस्कार प्राप्त
  7. शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव

बचत गटांचे काम उल्लेखनीय


गावात बचत गटांनी चांगले रूप धारण केले आहे. स्वामी समर्थ महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, शिवकन्या, झाशीची राणी, नाथकृपा पुरुष बचत गट असे सुमारे 14 बचत गट कार्यरत आहेत. त्या माध्यमातून बचतीची सवय लागली आहे. अडीअडचणीच्या काळात महिलाच एकमेकींना मदत करतात, हे यातून दिसले आहे.


बालसंगोपनासाठी प्रयत्न

ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडीतील स्वयंपाकासाठी इंधनवायूचा पुरवठा करण्यात आला आहे. बालसंगोपनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात. प्रत्येक गरोदर मातेची काळजी घेतली जाते. नवजात शिशूचे लसीकरण करण्यावर विशेष लक्ष दिले जाते.


संस्कारक्षम प्रशिक्षणासाठी प्रयत्न


गावात चौथीपर्यंत शाळा आहे. प्रगत मुलांची टक्केवारीही 72 टक्के आहे. जादा तासिका घेऊन मुलांना प्रशिक्षण दिले जाते. साक्षरताही 93 टक्के आहे.


पशुधन विकासासाठी नियोजन


गावात सुमारे 700 जनावरे आहेत. रोज सुमारे साडेतीन हजार लिटर दुधाचे संकलन होते. शेतीस पूरक व्यवसाय असल्याने गावात ताजा पैसा खेळता राहतो. पर्यायाने रोजगार उपलब्धताही सहज होते. 


पीक-पाणी नियोजन


गावात मुख्यतः बाजरी, ज्वारी, गहू, कडधान्य, भाजीपाला अशी पिके घेतली जातात. फळबागाही अनेक शेतकऱ्यांकडे आहेत. शेजारीच दोन महत्त्वाची देवस्थाने असल्याने काही शेतकरी फुलोत्पादनाकडेही वळले आहेत. सीसीटी, नालाबांध, छोटे बंधारे झाल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे पाण्याची मुबलकता राहते. 

संपर्क : जालिंदर कदम - 982299987 
सरपंच, मांजरसुंबा

सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच गावचा विकास होण्यास मदत झाली आहे. सरकारी योजना राबविताना अशा योजना व आपल्या गावाची गरज यांचा ताळमेळ योग्य पद्धतीने घातला की विकास अवघड नाही. चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण यावर आम्ही भर दिला आहे. प्रत्येक शेतकरी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावा, शेतीपूरक उद्योग प्रत्येकाकडे असावा, रोजचे खेळते चलन सर्वांकडे असावे, अशीही आमची धडपड आहे. 
- जालिंदर कदम, सरपंच, मांजरसुंबा ग्रामपंचायत 
----------------------------------------------------------
मोलाचे योगदान मिळाले
गावच्या विकासासाठी सर्वच ग्रामस्थांचे श्रमदान महत्त्वाचे ठरले आहे. त्याचबरोबर नगरच्या कमिन्स जनरेटर इंडिया लिमिटेड या कंपनीने गावात 40 लोकांना गोबरगॅस दिले. तसेच गाव तलाव आणि विविध कामांसाठी मोठे सहकार्य केले. ग्रामविकासासाठी ऐक्‍य सेवा सेंटरने गावात पाणलोटाची कामे केली. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम वाखारे यांचे कायम मार्गदर्शन लाभले. 
--------------------------------------------------------

लेखक : मुरलीधर कराळे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

 

 

अंतिम सुधारित : 1/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate