राजगुरुनगर तालुक्यात कामधेनू प्रकल्प गोठ्यात एका गाईची संख्या पोचली नऊपर्यंत
अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय ठरू शकतो. रेठवडी आणि गोसासी (जि. पुणे) या गावांत कार्यरत असलेल्या जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत. त्यातून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
रेठवडे आणि गोसासी (ता. राजगुरुनगर, जि. पुणे) येथील विहीर बागायत असलेल्या आणि कोरडवाहू शेतकऱ्यांकडे पाणलोट प्रकल्पांतून पाण्याची उपलब्धता होत गेली. पूर्वी पाण्याची कमतरता असल्याने दुग्धोत्पादनाकडे वळण्यास इच्छुक नसलेले शेतकरीही संकरित गोपालनाकडे वळण्यास सुरवात झाली. याचे कारण म्हणजे पुण्याची जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था व रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांनी संयुक्तपणे राबवलेल्या कामधेनू या प्रकल्पामुळे.
...अशी होती परिस्थिती
रेठवडे गावचा अर्धा भाग कॅनॉलखाली आहे. अर्धा भाग म्हणजे सुमारे 500 हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. या भागात काही प्रमाणात विहिरी असल्या तरी त्या जानेवारी- फेब्रुवारीत कोरड्या पडत असत. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागे. त्यामुळे मोजक्या कुटुंबाकडे जनावरे होती. इच्छा असूनही उन्हाळ्यात पाण्याची सोय नसल्याने शेतकरी दुग्धोत्पादनाकडे वळत नव्हते. मात्र जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने पाणलोटाची कामे झाली. त्याचबरोबर उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने दुग्धोत्पादनावर भर देण्यात आला. गावात संस्थेचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रमेश हिंगे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीच्या गोपालनाविषयी माहिती देण्यात सुरवात केली. हळूहळू पाणलोटातून पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांचा ओढा पशुपालनाकडे वळू लागला.
..असा घडलाय बदल
-गाईंचे वाटप - रेठवडे गावात 37, गोसासी- 40
-प्रत्येक गाईमागे अनुदान - पंधरा ते 20 हजार रुपये (संबंधित संस्थांकडून)
-गोठ्यासाठी 2006 मध्ये पाच हजार व पुढील टप्प्यात 2008 मध्ये दहा हजार रुपयांचा निधी.
- गाईंच्या संख्येत वाढ - गोसासी- 40 पैकी 30 शेतकऱ्यांकडून 2 ते 9 पर्यंत
- रेठवडे- 37 पैकी 27 शेतकऱ्यांकडून- 2 ते 11 पर्यंत
रेठवडेत अनेक कुटुंबांचा गोपालन प्रवास एका गाईपासून सुरू झाला. जनावरांची व्यवस्थित काळजी घेतल्याने दुधाच्या व्यवसायात वाढ होत गेली. दोन ते 11 गाई त्यांच्या गोठ्यात जमा झाल्या आहेत. दुग्ध व्यवसायातील नफ्यामुळे काहींनी चांगल्या गोठ्यांची उभारणी केली आहे. त्यातील प्रातिनिधिक दोन शेतकऱ्यांची ही उदाहरणे.
गोपालनातून उभारले मोठे घर
रेठवडेतील भगवान व निवृत्ती तुकाराम पवळे या बंधूंची एकत्रित साडेतीन एकर शेती आहे. कोरडवाहू शेतीमुळे उत्पन्नाचा स्रोत कमी. मात्र पाणलोटाच्या कामांनंतर पाण्याची शाश्वती वाढली. खरीप, रब्बी चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ लागले. उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची कमतरता राहिली नाही. कामधेनू गोपालन प्रकल्पाच्या अनुदानातून 2006 मध्ये एक होल्स्टिन फ्रिजीयन (एचएफ) गाय व गोठा त्यांनी घेतला. 2007 मध्ये दुसरी एचएफ गाय विकत घेतली. या जोडीपासून चांगले नियोजन करीत चार वर्षांत गाईंची संख्या 16 पर्यंत नेली. त्यांचे दररोज सुमारे दीडशे लिटर दूध मिळू लागले. या व्यवसायातूनच साध्या घराचे रूपांतर 1300 वर्गफुटांचे सुसज्ज घरात झाले आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने व घरातील मनुष्यबळही विभागले. आता संकरित चार गाई, दोन बैल, दोन खिलार गाई व दोन गोऱ्हे आहेत. या वर्षी जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी येत असल्याचे भगवान पवळे यांनी सांगितले.
जनावरांच्या खाद्याचे नियोजन
- चाऱ्यासाठी लसूण घास, मका आणि मेथी घास आदींच्या लागवडीला सुरवात
- वर्षभराची आवश्यकता लक्षात घेऊन चाऱ्यांचे नियोजन. ज्वारीचा कडबा आणि गवत चाऱ्यांची गंजी लावून साठवण.
- कडबा कुट्टी मशिन विकत घेतले.
- जनावरांच्या आरोग्यासाठी संस्थेच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- खनिज मिश्रण व पशुखाद्याचे योग्य प्रमाण ठेवले जाते. पशुखाद्यात कांडी पेंड आणि गव्हाचा भुस्सा भिजवून दिला जातो. त्याचे प्रमाण 20 लिटर दुधामागे पाच किलो एका वेळी.
उत्पादन व खर्चाचा ताळेबंद
पवळे यांच्याकडील दोन गाईंचे दूध चालू आहे. त्यातील एका गाईपासून पंधरा, तर दुसऱ्या गाईपासून 20 लिटर दूध प्रति दिन मिळते. दूध डेअरीला घातले जाते. त्याला 3.5 फॅटसाठी 17 रुपये प्रति लिटर व चार फॅटसाठी 18 ते 19 रुपये दर मिळतो. दरानुसार प्रति दिन 595 रुपये मिळतात. महिन्याला सुमारे 1050 लिटर दूध उत्पादन होते. त्यापासून 17 हजार 850 रुपये उत्पन्न मिळते.
-पशुखाद्य खर्च 1700 रुपये, अन्य हिरवा चारा, कोरडा चारा हा घरचा असल्याने फारसा खर्च नाही. तरीही त्याची काढणी, साठवणी याचा एक हजार रुपये खर्च धरला आहे. अन्य लसीकरण, खर्च प्रति महिना 300 रुपयांपर्यंत येतो. याप्रमाणे चार गाईंचा खर्च दहा हजारांपर्यंत येतो. निव्वळ नफा प्रति महिना सात हजार ते साडेसात हजारांपर्यंत शिल्लक राहतो.
संपर्क - भगवान पवळे, 9922092401
दुग्धोत्पादनासाठी सोडली नोकरी
गोसासी येथील योगेश गोसावी चाकण येथे खासगी कंपनीत नोकरीस होते. त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कामधेनू गोपालन प्रकल्पातून एक गाय आणि गोठा घेतला. चांगल्या नियोजनातून दरवर्षी वेत मिळत गेले. त्यातून घरच्या कालवडी सांभाळण्यास सुरवात केली. त्यातून आज त्यांच्याकडे सहा गाई आहेत. त्यांचे दूध डेअरीला घातले जाते. दुग्धोत्पादनातून नफ्याचे प्रमाण वाढत गेले. योगेश यांनी आज खासगी नोकरी सोडली असून दुग्ध व्यवसायाकडेच ते पूर्ण वेळ लक्ष देत आहेत.
चाऱ्याचे नियोजन
खरीप मका, बाजरी, लसूण घास यांचे उत्पादन घेतले जाते. रब्बी ज्वारीतून मिळणारा कडबा साठवला जातो. मात्र जनावरे अधिक असल्याने काही प्रमाणात कडबा विकत घ्यावा लागतो.
-गव्हाचे काड व भुस्सा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातूनही आणला जातो. त्यावर युरिया दोन टक्के, मीठ, गुळाचे पाणी व खनिज मिश्रण यांची प्रक्रिया होते. असे खाद्य जनावरांना दिले जाते.
-प्रत्येक जनावरासाठी कांडी पेंड व विकतचे पशुखाद्य योग्य प्रमाणात दिले जाते. त्याचे प्रमाण एक लिटर दुधामागे 400 ग्रॅम असे असते. भाकड जनावरांना प्रति दिवस तीन किलो पशुखाद्य दिले जाते.
जमा-खर्च
सध्या पाच गाईंचे दूध सुरू आहे. त्यांच्यापासून दररोज 60 लिटर दूध मिळते. त्यातील 10 लिटर घरासाठी ठेवून 50 लिटर डेअरीला घातले जाते. दुधाचे फॅट 3.5 ते चारच्या दरम्यान असते. त्याला प्रति लिटर दर 17 ते 17 रुपये 80 पैशांपर्यंत मिळतो. प्रति महिना 1500 लिटर दुधाचे 17 रुपयांप्रमाणे 25 हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळते. जनावरांचे खाद्य व संगोपन खर्च 12 हजार रुपयांपर्यंत होतो. मासिक निव्वळ नफा 13 हजार रुपये शिल्लक राहतो.
संपर्क = योगेश गोसावी, 8888189475
पवळे व गोसावी यांच्याकडून शिकण्याजोगे...
- एका गाईपासून वाढवला गोठा
- जनावरांची स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची
- जनावरांचा माज ओळखून योग्य वेळी रेतन
- तीन ते साडेतीन एकर शेतीतही हिरवा चाऱ्याचे नियोजन
- कोरड्या चाऱ्याची योग्य साठवण
संपर्क = डॉ. रमेश हिंगे, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, 9850995661
माहिती संदर्भ : अॅग्रोवन