राज्यातील विविध सामाजिक व विकासाशी संबंधित प्रश्नांची संशोधनाद्वारे उकल करुन त्यावर अचूक उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध शासकीय यंत्रणा व शैक्षणिक संस्था यांच्यादरम्यान विशेषत: सामाजिक व आर्थिक स्वरुपाच्या महत्त्वाच्या गंभीर समस्यांसंदर्भातील संशोधन वृद्धिंगत करण्यासाठी आणि विविध प्रकल्पनिहाय निरनिराळ्या योजनांमध्ये अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने पुढचे पाऊल उचलत ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ ही योजना आणली आहे. याबाबतचा शासन निर्णय 13 जानेवारी 2016 रोजी निर्गमित झाला आहे. या योजनेविषयी थोडसं...
देशातील ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांमध्ये आय.आय.टी.सारख्या प्रगत शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढवून परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘उन्नत भारत अभियान’ देशातील निवडक, प्रगत शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये सुरु असलेले संशोधन हे अधिकाअधिक राज्यातील विविध सामाजिक व विकासाशी निगडीत दैनंदिन जीवनातील समस्यांची (उदा. ग्रामीण योजनांतर्गत ग्राम स्वच्छता, शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, पेयजल, रस्ते विकास, रस्त्याचे मूल्यांकन करुन मजबुतीकरण, जलसंधारण, इंधन व ऊर्जा, आरोग्य, दुष्काळ आदी) उकल करुन ते लोकाभिमुख करणे गरजेचे आहे. या संस्थांमधील संशोधन तसेच कुशल मनुष्यबळ वापरुन सामाजिक क्षेत्रातील विकासाच्या समस्यांवर उचित तंत्रज्ञानाच्या वापराने तोडगा शोधणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत अनेक शासकीय, निमशासकीय, खाजगी यंत्रणा व अनेक स्वयंसेवी संस्था विविध विकास योजनांवर ग्रामीण व शहरी भागातील समस्यांवर काम करीत आहेत. तथापि, यासंदर्भात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थांचा अशा प्रकल्पात सहभाग वाढविणे व एक संस्थात्मक संरचना निर्माण करणे गरजेचे आहे.
सर्व बाबींचा विचार करुन विविध विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये ठोस कार्यक्रम सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निदेशांनुसार संदर्भाधिन शासन निर्णयान्वये कार्य गटाची स्थापना करण्यात आली होती.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांच्या मदतीने विविध सामाजिक व विकासाच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची उकल करुन त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने दर्जेदार शैक्षणिक संस्था, विविध शासकीय यंत्रणा (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा विकास आणि नियोजन विकास यंत्रणा इ.) यांच्यादरम्यान परस्पर समन्वय सहकार्य व वृद्धिंगत करणे. त्याद्वारे संशोधनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रकियेला नवीन स्वरुप देऊन स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रश्नांवर तंत्रज्ञानाचा वापर करुन उपाय शोधण्यासाठी ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या अभियानात सहभागी होणाऱ्या संस्थांमध्ये अभ्यासक्रमातील स्वायत्तता, विकास प्रकल्प, संशोधन करण्याची क्षमता, अनुभव, विविध शाखांमध्ये तज्ज्ञ अध्यापकवर्ग व संशोधक, प्रयोगशाळा व इतर सुविधा, स्थानिक विकास व त्याला अनुसरून संशोधनामध्ये स्वारस्य असणे अपेक्षित आहे. तंत्रशिक्षण दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत (TEQIP) सहभागी झालेल्या 17 संस्था या अभियानात सहभागी होण्यास पात्र आहेत. या संस्थांव्यतिरिक्त इतर इच्छुक उच्च शिक्षण संस्थांनाही या अभियानात सहभागी होता येईल. अभियानाअंतर्गत सल्लागार समितीने निश्चित केलेल्या निकषानुसार व प्रादेशिक गरजानुसार संस्थांची वेळोवेळी निवड करण्यात येणार आहे.
उन्नत (प्रगत) महाराष्ट्र अभियानाची रचना त्रिस्तरीय असेल. सर्वोच्च पातळीवर सल्लागार समिती, मध्यस्तरावर प्रकल्प समन्वय कक्ष आणि संस्थास्तरावर तंत्रज्ञान आणि विकास कक्ष असे त्याचे स्वरुप असेल.
सल्लागार समिती ही राज्यस्तरावर कार्य करेल. या समितीची रचना खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. |
सदस्याचे पदनाम |
पद |
1. |
चेअर प्राध्यापक सीटीएआरए ॲण्ड सीएसई, आयआयटी,पवई, मुंबई |
अध्यक्ष |
2. |
संचालक, (व्यवसाय) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई. |
सदस्य |
3. |
संचालक, (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई. |
सदस्य |
4. |
उन्नत महाराष्ट्र अभियानात समाविष्ट संबंधित संस्थांचे प्राचार्य |
सदस्य |
5. |
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई. |
सदस्य |
6. |
संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर (एमआरसॅक), व्हीएनआयटी परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग,नागपूर. |
सदस्य |
7. |
संबंधित विषयाचे तज्ज्ञ |
सदस्य |
8. |
संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई. |
सदस्य सचिव |
प्रकल्प समन्वय कक्ष-हा कक्ष तंत्र शिक्षण संचालनालयात कार्यरत असेल व प्रकल्प अंमलबजावणीमध्ये सहाय्य करेल. हा कक्ष सल्लागार समिती, सहभागी संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्यामधील दुवा असेल.
प्रकल्पात सहभागी झालेल्या प्रत्येक संस्थेत तंत्रज्ञान आणि विकास कक्ष स्थापित केला जाईल. या कक्षातर्फे संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण पूरक अभ्यासक्रम व संशोधन प्रणाली अस्तित्वात आणून विद्यार्थी, अध्यापक व संशोधक यांना अशा विकास संशोधनामध्ये सहभाग घेता येईल. संस्थेच्या क्षमता व अनुभवाला अनुसरुन व शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय साधून हा कक्ष संस्थेच्या विद्यार्थी व संशोधकांसाठी संशोधन प्रकल्पाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करुन अभियानात सहभागी होता येणार आहे.
या कक्षात विविध शाखांतील अध्यापक व संशोधक आणि इतर तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी असतील. जर कक्षामध्ये महिला सदस्य नसेल व एखाद्या विकासकामाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास महिला सदस्याची नेमणूक करता येईल.
संस्थेकडे एखादा प्रकल्प अभिहस्तांकित झाल्यावर कक्ष त्या प्रकल्पासाठी उपलब्ध तांत्रिक क्षमतांचे, मनुष्यबळाचे मॅपिंग करुन निधीचे अंदाजपत्रक तयार करील. या अनुषंगाने उपलब्ध निधीच्या तरतुदीनुसार तसेच निधी प्राप्त झाल्यावर कक्ष त्या प्रकल्पावर, विद्यार्थी, अध्यापक व संशोधक यांच्या सहाय्याने काम सुरु करुन विहीत मुदतीत पूर्ण करेल. या प्रकल्पादरम्यान आवश्यकतेनुसार विविध शासकीय यंत्रणांशी किंवा विविध सामाजिक घटकांशी बैठकीद्वारे समन्वय साधणे, आवश्यक ती माहिती व सांख्यिकी मिळविणे, प्रकल्पाचे संनियंत्रण करणे, प्रकल्पविषयक संशोधनाचा आणि प्रगती अहवाल इत्यादींचा अभिलेख तयार करणे व तो अहवाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, प्रकल्पासाठी प्राप्त निधीचा विनियोग करणे इत्यादी कामे कक्षामार्फत पार पाडली जाणार आहेत.
या अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागात अनेक कामे करण्याजोगी आहेत. या धर्तीवर विविध शासकीय यंत्रणा (स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, जिल्हा नियोजन व विकास समिती, शासकीय विभाग इत्यादी ) आणि शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातूनही ही कामे घेता येतील.
या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अभियानाअंतर्गत सहभागी उच्च शिक्षण संस्था, लाभार्थी, लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांच्यादरम्यान विविध स्थानिक प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने प्रस्ताव करण्यात येतील.
शासकीय यंत्रणा/विभाग याप्रकरणी निश्चित होणाऱ्या प्रकल्पाचा विषय हा ठोस स्वरुपाचा असल्याची खात्री करुन घेतील. प्रकल्प कालावधी, प्रकल्पासंदर्भातील अपेक्षा आणि फलनिष्पत्तीचा उल्लेख प्रस्तावमध्ये आर्वजून करावा लागेल. संशोधनासाठी येणारा खर्च, field trip, तसेच अध्यापक व विद्यार्थी यासाठी येणारा खर्च हा संबंधित संस्थेस उपलब्ध होणाऱ्या निधीतून भागविणे अपेक्षित आहे. संबंधित शैक्षणिक संस्थेत अशा विविध प्रकल्पांमध्ये समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना विशिष्ट Credits देण्यात येतील.
गुंतागुंतीच्या, क्लिष्ट व विशिष्ट स्वरुपाच्या उपक्रमासाठी संबंधित संस्था प्रकल्पाच्या कालावधीकरीता विशिष्ट अर्हताप्राप्त अध्यापक व संस्थेतील विद्यार्थी यांच्या सेवा उपलब्ध करुन घेऊ शकतील. तसेच स्थानिक विकास व तंत्रज्ञानाशी निगडीत कार्य करण्याची संधी या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना मिळेल.
विविध उपक्रम राबविताना संस्थेने त्यांचे अभ्यासक्रम व संशोधन यात बहुविषयी (inter disciplinary), समाजाभिमुख व प्रादेशिक दृष्टिकोन निर्माण करावा. संशोधनाचा समाजात योग्य त्या मार्गांचा अवलंब करून प्रसार करावा व जाणिवा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
विविध शासकीय विभाग (उदा. सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम), अथवा लाभार्थी व त्यांच्या प्रातिनिधिक संस्था उदा. जिल्हा नियोजन समिती, नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी त्यांच्या विकास कामाविषयक समस्यांबाबत / नियोजनाबाबत नजिकच्या संस्थेतील तंत्रज्ञान आणि विकास कक्षाकडे तांत्रिक सहकार्याबाबत लेखी विनंती करतील. यात एखाद्या योजनेबाबत वा एखाद्या समस्येवर तांत्रिक सल्ला व सेवा देणे, रोजगार हमी योजना किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था, जलयुक्त शिवार इ. सारख्या प्रचलित योजनांचे आराखडे तयार करणे, दर्जा नियंत्रण, निगराणीची तृतीयपक्षी संनियंत्रण वा लेखापरिक्षण करणे, इत्यादींचा समावेश असू शकतो.
अभियानात सहभागी शिक्षण व संशोधन संस्थेकडे अशाप्रकारे तांत्रिक सहकार्याची विनंती संस्थेस प्राप्त झाल्यानंतर तेथील तंत्रज्ञान आणि विकास कक्ष त्यांच्याकडे उपलब्ध तांत्रिक क्षमता, मनुष्यबळ इत्यादींचे मॅपिंग करेल. त्यानंतर प्रकल्पासाठी आवश्यक ट्रेनिंग, क्षमता विकास यांचा समावेश करून(आवर्ती खर्चासह) निधीचे अंदाजपत्रक तयार करुन सामंजस्य करार, प्रस्ताव, लागणारी सांख्यिकी माहिती इ.ची सूची, अंदाजपत्रक संबंधित सक्षम अधिकारी(जसे की जिल्हाधिकारी) यांच्याकडे पाठवतील.
अभियानात सहभागी शिक्षण व संशोधन संस्था, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामसभा, स्वयंसेवी संस्था यांच्याकडे सहभागी संस्थेतील तंत्रज्ञान आणि विकास कक्ष विचारविनिमयाद्वारे काही प्रस्ताव थेट मांडून उपरोल्लिखीत कार्यपद्धतीने त्या प्रकल्पावर काम सुरु करु शकेल.
कामांची यादी सूचनात्मक (suggestive) स्वरुपाची असून या व्यतिरिक्तही कामे या अभियानांतर्गत हाती घेण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत तयार होणारे प्रस्ताव व अहवाल संबंधित संस्थेच्या व शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहेत.
तंत्रज्ञान व विकास कक्ष यांनी प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावा. जिल्हाधिकारी यांनी सहभागी शासकीय यंत्रणा, तंत्रज्ञान व विकास कक्ष यांच्याबरोबर विचारविनिमय करुन, प्रकल्पाची उपयुक्तता विचारात घेऊन मान्यता द्यावी. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन आराखड्यात नाविन्यपूर्ण योजनासाठी राखीव ठेवलेल्या निधीपैकी निधीचा वापर करण्याबाबत सुस्पष्ट आदेश नियोजन विभागामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत.
स्त्रोत : महान्यूज भाग १, भाग - २
अंतिम सुधारित : 10/7/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वा...
बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व स...
ग्रामीण तरुणांना स्वरोजगाराची प्रेरणा देणारी ग्राम...