सगळी सोंग करता येतात पण पैशांचे करता येत नाही असं म्हटलं जातं. आर्थिक सक्षमता असेल तरच विकास कामांना गती देता येते हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जे काही नाविन्यपूर्ण आणि अनोखे प्रयोग राज्यात झाले त्यातलाच हा एक अतिशय लक्ष्यवेधी असा उपक्रम.
तालुका- जिल्हा औरंगाबादच्या पाटोदा ग्रामपंचायतीची ही अनोखी कहाणी. 3353 एकूण लोकसंख्या असलेल्या या गावात 1649 पुरुष आणि 1604 महिला आहेत. गावाचे एकूण क्षेत्रफळ 150 चौरस.कि.मी तर जमीन बहुतांश बागायती. ऊस, कापूस आणि गहू ही गावाची मुख्य पिकं.
गावाचा विकास करायचा या एकाच ध्येयाने झपाटलेल्या गावानं लोकसहभागातून अनेक महत्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी केली एवढेच नाही तर नवनवीन संकल्पना राबवून गावाचं वेगळेपणही जपलं. एकेकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या गावात रोगराई, अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य होते हे आता कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही इतकी या गावानं कात टाकली आहे.
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानापासून सुरु झालेली ही विकास चळवळ सरपंच दत्तात्रय त्र्यंबक शहाणे आणि ग्रामसेवक बी.एम.पाटील यांच्या कुशल नेतृत्वातून निर्धाराने पुढे जात आहे. त्याला अनेकांची साथ आणि सहकार्याचा हात आहे. 100 टक्के पाणंदमुक्ती असो किंवा 100 टक्के कर संकलन, ग्रामपंचायतीने विकास कामांची धडाकेबाज अंमलबजावणी करतांना पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही.
ग्रामपंचायतीने अनेक चांगले आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.त्यातलाच हा एक. ग्रामपंचायतीमार्फत आकारण्यात येणाऱ्या विविध करांचा शंभर टक्के भरणा केला तर असा कर भरणाऱ्या कुटुंबाला वर्षभर त्यांचे धान्य मोफत दळून दिले जाते. यासाठी गावात दोन पिठाच्या गिरण्या सुरु करण्यात आल्या आहेत. याबरोबरच जे नागरिक मुदतपूर्व कर भरणा करतात त्यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्याची परंपराही गावाने घालून दिली आहे. ग्रामविकासात उत्तुंग झेप घेतांना यशवंत पंचायतराज अभियान असो किंवा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, गावाने प्रत्येक अभियान आणि स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवत प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे.
गावाला विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ग्रामसभेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार असो किंवा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील तीनही वर्षाचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळालेला पर्यावरण विकासरत्न पुरस्कार. चांगले काम आणि कामाचा सन्मान असा अनुभव गावाने सातत्याने घेतला आहे.
गावात सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकसहभागातून दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत मोफत दुधाचे वितरण केले जाते. गावात 3 अंगणवाड्या आहेत. तीनही अंगणवाड्याची इमारत चांगली असून तिथे वर्गखोल्यांची व्यवस्था आहे.
कुपोषणमुक्त अंगणवाडीचा बहुमान मिळवतांना ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीला आय.एस.ओ मानांकन मिळवण्याचा आगळा वेगळा बहुमान गावानं प्राप्त केला आहे. आय.एस.ओ प्रणालीच्या शिस्तीनुसार काम करण्याची सवय गावाने अंगवळणी पाडून घेतली आहे.
गावात सौर दिवे आणि बायोगॅसच्या वापराला चालना देण्यात आली आहे. गावात 15 सौर दिवे आणि बायोगॅसचे 11 प्रकल्प कार्यान्वित आहेत. बायोगॅस प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प शौचालयांना जोडलेले आहेत.
पाण्याचे महत्व ओळखून ग्रामपंचायतीने प्रत्येक घरातील नळाला पाण्याचे मिटर बसवले आहे. त्यामुळे पाणी वापराला शिस्त आली आणि पाणी बचतीचा संदेश घरोघर गेला. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत गावाने लोकसंख्येएवढी झाडे लावली आणि आजच्या पाणी टंचाईच्याकाळात ही ती नेटाने जगवली आहेत.
गावासाठी गावकरी मानाचे. त्यांच्या सहभागाशिवाय आणि सहकार्याशिवाय पुढे जाणे अशक्य. याचे ऋण जाणत ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या आनंदातही आपला सहभाग नोंदवला. गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या आणि विद्यार्थ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा सत्कार करून अभिष्टचिंतन करण्याची प्रथा ग्रामपंचायतीने सुरु केली.
गावाच्या सुरक्षिततेचे महत्व लक्षात घेऊन शाळा, कार्यालय आणि गावातील महत्वाच्या ठिकाणी 32 सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवले. प्रत्येक महिन्याचा तिसरा शनिवार हा समूह भोजनासाठी निश्चित केला. यादिवशी संपूर्ण गावाला लोकसहभागातून भोजनाचे निमंत्रण जातेच. भोजनानंतर प्रबोधनात्मक व्याख्यान किंवा सांस्कृतिक कार्यक्रमही ठरलेला. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाने गाव "एकजीव" झालं. मतभेद दूर होऊन विकासाच्या मार्गी लागलं.
ग्रामपंचायतीमार्फत गावातील प्रत्येक घरासमोर दोन कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवला जातो. ग्रामपंचायतीमार्फत हा कचरा गोळा करून त्याचे कंपोस्ट खत तयार करण्यात येते.
घरात, कुटुंबात आणि राज्यात महिलांना समान हक्क आणि समान संधीची गोष्ट नेहमी बोलली जाते. पण पाटोदा ग्रामपंचायतीने हे शब्द कृतीत आणून महिलांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा आणि अस्तित्वाचा यथोचित सन्मान केला आहे. आज गावातील प्रत्येक घरावर पुरुषांबरोबर महिलांचा मालकी हक्क आहे.
वटपोर्णिमेला गावातील महिलांना वटवृक्षाचे वाटप,ग्रामोत्सवाच्या निमित्ताने गावात धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असे अनेक उपक्रम राबवून गावानं आपलं वेगळेपण तर जपलं आहेच पण ग्रामोन्नतीचा दिवा घरोघर प्रज्वलित केला आहे.
लेखिका : डॉ. सुरेखा मुळे
स्त्रोत: महान्यूजअंतिम सुधारित : 11/21/2019
बनगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील नरहरी बापूराव मुरमे...
औरंगाबाद शहरातील नागसेनवन परिसराला लागून मराठवाडा ...
औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेले पोखरी हे छोट...
शेतीची आवड व उत्साह ओसंडून वाहत असेल तर शेतीच्या व...