शेतीची आवड व उत्साह ओसंडून वाहत असेल तर शेतीच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करता येऊ शकते. कला शाखेचे पदवीधर असलेले श्रीराम शेळके यांनी आपल्या प्रयोगशील वृत्तीतून हे सिद्ध केले आहे. योग्य प्रकारे शेती व पिकांचे नियोजन करीत आपली शेती त्यांनी फायदेशीर केली आहे.
औरंगाबादपासून सुमारे 25 किलोमीटरवर कुंभेफळ परिसरात (ता. जि. औरंगाबाद) सुमारे 32 एकर जमिनीीचे क्षेत्र कोंडीराम, श्रीराम व रामराव या तीन भावांत विभागले आहे. (तीनही भावांच्या नावात राम आहे) कोंडीराम ट्रॅक्टर चालवतात. त्यातील उत्पन्न शेतीसाठी वापरले जाते. श्रीराम शेतीचे व्यवस्थापन, तर रामराव अन्य व्यवसाय करतात. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मजूरटंचाईचा अभ्यास करून बहुतांश जमीन या बंधूंनी फळबागांखाली आणली आहे. अन्य जमिनीत 10 एकर कापूस, प्रत्येकी दोन एकर तूर व बाजरी ही पिके घेतली. जमीन मध्यम ते भारी स्वरूपाची आहे.
प्रयोगशील वृत्ती जोपासली
मोसंबी हे या भागातील पारंपरिक फळपीक आहे. मोसंबीच्या नव्या बागेत सुमारे दहा एकरांत शेळके यांनी यंदाच्या वर्षी कापूस घेतला. त्याच्या पाच वेचण्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी कापसाला ठिबक केले होते. तेव्हा ठिबकच्या दोन्ही बाजूंनी कापूस लावून एकरी झाडाची संख्या 14 हजारांपर्यंत वाढविली होती. वेचणीसाठी खूप त्रास झाला. शिवाय उत्पादनातही फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे आता ठिबक नळीच्या एकाच बाजूस पण 5 x 1 फूट अंतरावर कापूस घेतला आहे. कंपोस्ट व रासायनिक खतांवर तो पोसला आहे. सलग कापूस पिकाचे उत्पादन एकरी 18 ते 20 क्विंटलपर्यंत घेण्यातही शेळके यापूर्वी यशस्वी झाले आहेत. कापूसवेचणीसाठी मजुरांची फार मोठी चणचण निर्माण होते. त्यामुळे पाच रु. प्रति किलोप्रमाणे तो वेचून घ्यावा लागतो. एकरी कापूसवेचणीसाठी 7,500 ते 8,000 रु. खर्च येतो. कापूसवेचणीसाठी सुलभ यंत्राची गरज शेळके यांनी व्यक्त केली आहे. मोसंबीतील कपाशी पिकातून त्यांना 10 एकरांतून सुमारे 100 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
मोसंबीच्या सुमारे 660 झाडांनी त्यांना यंदा उत्पादन दिले. सुमारे दहा टन उत्पादनाची त्यांनी नुकतीच विक्री केली आहे. प्रति टन दहा हजार रुपये दर त्यांना मिळाला आहे.
या वर्षी कोबीचेही घेतले आंतरपीक
नवीनच लागवड केलेल्या मोसंबी बागेत सुमारे साडेसहा एकर क्षेत्रावर आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार कट्टे (प्रति कट्टा 40 किलो) मालाची विक्री झाली आहे. अजून काही कट्टे मालाची अपेक्षा आहे. कोबीसाठी औरंगाबादच्या तुलनेत अकोला बाजारपेठ चांगली आहे. नांदेड गेवराई (जि. बीड) येथेही कोबी पाठवला आहे. प्रति कट्टा कमाल 380 रुपयांपासून ते 110 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
कोबीतून एकूण सुमारे साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी खर्च सुमारे पावणेदोन लाख रुपये आला आहे.
सिंचनासाठी विहीर पुनर्भरण व शेततळे
नाल्याला खेटूनच जुनी विहीर व अन्य दोन विहिरी आहेत. फेब्रुवारीपर्यंत त्यात पाणी असते. नाल्याला खेटूनच (150 फूट अंतरावर) असलेल्या विहिरीचे नाल्यातील पाण्यातून पुनर्भरण करून घेतले. त्यासाठी नाल्यात एक मोठा खड्डा खोदून त्यातून विहिरीत 150 फूट पाइप टाकला. खड्ड्याच्या समोरच्या बाजूने थोडा बांध टाकला. त्यामुळे नाल्यात पाणी वाहत असेल तोपर्यंत विहिरीत पाणी येतच राहते. विहिरीतील पाण्याचा अंदाज लागत नाही. त्यामुळे तीन शेततळी केली. त्यात एकूण जवळपास दीड कोटी लिटर पाणी साठवता येईल. दोन शेततळ्यांना प्लॅस्टिक अस्तरीकरण केले आहे. विहिरीतून पाणी उपसा करून शेततळ्यात साठविले जाते. मोबाईल संचाद्वाराच विद्युत मोटारी चालू व बंद केल्या जातात. कारण "लोडशेडिंग'मुळे प्रत्येक वेळी विहिरीकडे जाऊन मोटार चालू करणे शक्य होत नाही. पिकांना सिंचन करण्यासाठी 25 एकर क्षेत्रावर ठिबक केले आहे. उर्वरित क्षेत्रावरही ठिबक या वर्षी करणार आहेत. शेतापासून केवळ अर्धा किलोमीटरवर असलेल्या सिमेंट बधाऱ्यातील गाळ यंदा सामुदायिकरीत्या काढला. त्याचा फायदा विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यामध्ये झाला.
फळबागेकडे जास्त कल
जुनी मोसंबी बाग तुटल्यानंतर शेळके यांनी दोन वर्षे हे पीक घेतले नाही. मोसंबीच्या माहेरघरात राहून आपल्याकडे मोसंबी नाही, याची खंत त्यांना होती. त्यामुळे आठ एकरांवर मोसंबी लावली. याशिवाय कमी पाणी लागणाऱ्या सीताफळाची सुमारे 1040 झाडे लावली आहेत. साडेबारा एकरांवर डाळिंब आहे. पुढील वर्षापासून सीताफळ व दोन वर्षांनंतर काही क्षेत्रातील मोसंबीचे उत्पादन सुरू होईल.
दीड एकरातील नऊ टन उत्पादनाची विक्री त्यांनी केली असून, सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
फळबागेसाठी मजूर कमी लागतात, शिवाय व्यवस्थापनही हंगामानुसार करावे लागत असल्याने एकाच वेळी सर्व ठिकाणी लक्ष देण्याची गरज भासत नाही.
जमिनीची बंदिस्ती महत्त्वाची
शेंद्रा परिसरातील जमीन विकून कुंभेफळ शिवारात जमीन घेतल्यानंतर शेळके यांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे टप्पे पाडून बांध घालून घेतले. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी कंपोस्ट खत व पीक फेरपालटाकडे विशेष लक्ष दिले. जमिनीतील पिकांचे अवशेष पुन्हा जमिनीलाच देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जमिनीचे पोषण व्यवस्थित केले. सर्व जमिनीचे व्यवस्थित सिंचन होईल असे व्यवस्थापन केले.
घरापासून बंगल्यापर्यंत प्रवास
पूर्वी गावात दुमजली घर होते. शेतातही आता राहण्यासाठी घर बांधले असून, शेतीतील उत्पादनातून टुमदार बंगला बांधला आहे. चारचाकी गाडी घेतली आहे.
कै. श्री. श्री. लोध यांचे मार्गदर्शन व प्रेरणा
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील (परभणी) शास्त्रज्ञ कै. श्री. श्री. लोध यांना तत्कालीन कृषिसहायक कमलाकर पेरे यांनी खास आग्रहास्तव कुंभेफळला भेट देण्यास सांगितले. तेव्हापासून त्यांची प्रेरणा व त्यांचे मार्गदर्शन यातून शेळके यांनी आपल्या शेती विकासाला चालना दिली. कृषी विभागाशी सतत संपर्कामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांना जलद होते. परममित्र अप्पासाहेब शेळके यांचे सतत सहकार्य त्यांना लाभते.
अभ्यासू वृत्ती जोपासली
ऍग्रोवनच्या प्रदर्शनाचे श्रीराम शेळके हे दर वर्षीचे वारकरी आहेत. शेतकरी मेळावे, चर्चासत्रे यांनाही त्यांची आवर्जून उपस्थिती असते. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेताला दिलेल्या भेटीतून नवीन गोष्टी शिकावयास मिळाल्याचे ते सांगतात. ऍग्रोवनचे नियमित वाचन व त्यातील प्रसिद्ध झालेल्या यशोगाथांतील शेतकऱ्यांशी चर्चा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. कृषितज्ज्ञांच्या ते नियमित संपर्कात असतात.
(लेखक अंबड (जि. जालना) येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)
श्रीराम शेळके - 9657154563
माहिती संदर्भ : अॅग्रोवन