बनगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील नरहरी बापूराव मुरमे यांनी सालगड्यापासून सुरवात करत फळबाग आणि आंतरपिकांच्या साह्याने आपली शेती ऊर्जितावस्थेत आणली आहे. आज त्यांच्याकडे चिकू, आंबा व डाळिंबाची फळबाग आहे. सालगडी ते प्रगतिशील शेतकरी असा हा प्रवास आता काटेकोर शेतीकडे चालला आहे. प्रदीप अजमेरा
बनगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील नरहरी बापूराव मुरमे यांच्याकडे पाच एकर हलकी ते मध्यम स्वरूपाची व उताराची शेती आहे. सुरवातीला ते पारंपरिक पिके घेत; मात्र, उत्पादन कमी होते. त्यातून कुटुंबाची गुजराण करणे शक्य होत नसल्याने, सालगड्यापासून ट्रॅक्टर चालवण्याची कामे करत असत. त्यातून बचत करीत एक विहीर खोदली. सुदैवाने विहिरीस पाणी भरपूर लागल्याने स्वतःच्या शेतीच्या विकासाकडे लक्ष दिले.
चिकूने वाढविले उत्पन्न, तर डाळिंबाने दिली स्थिरता
- पारंपरिक पिकाऐवजी फळबाग लावण्याचे निश्चित करून 2003 या वर्षी कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेतून नरहरी यांनी 50 गुंठे क्षेत्रावर काळी पत्ती या जातीच्या चिकूची 25 फूट बाय 25 फूट अंतरावर 80 रोपांची लागवड केली.
- त्यानंतर 2006 मध्ये 100 आंबा कलमांची 15 फूट बाय 15 फूट अंतरावर 40 गुंठ्यामध्ये लागवड केली. त्याच वर्षी डाळिंबाची एक एकरमध्ये 325 रोपांची 9 फूट बाय 13 फूट अंतरावर लागवड केली.
- चिकू व आंबा पिकामुळे आर्थिक उत्पन्न वाढण्यास सुरवात झाली, तर डाळिंबाने आर्थिक स्थिरता दिली. डाळिंबापासून तिसऱ्या वर्षी त्यांना एकरी चार टन डाळिंब उत्पादन मिळाले. त्यापासून वाढ होत मागील 2012-13 या वर्षी 40 गुंठ्यांतून 14 टन उत्पादन मिळाले आहे. हे सर्व उत्पादन नाशिक बाजारपेठेत विकले.
- उर्वरीत क्षेत्रात कापूस, गहू यांची पिके ते घेतात.
- मागील वर्षी डाळिंबाची कलमे घरीच तयार केली. त्या रोपांची आणखी एक एकर क्षेत्रावर 9 x 15 फूट अंतरावर लागवड केली आहे.
डाळिंबाचे व्यवस्थापन
- दर वर्षी ते डाळिंबाचा आंबे बहार धरतात. त्यासाठी डिसेंबर महिन्यात पाणी तोडून ताण दिला जातो. संजीवकाची फवारणी करून पाणगळ केली जाते. तत्पूर्वी झाडाची छाटणी केली जाते.
- या कालावधीत गादीवाफ्यामध्ये 25 ते 30 किलो चांगले कुजलेले शेणखत, 5 ते 7 किलो गांडूळखत, एक किलो लिंबोळी पेंड, 500 ग्रॅम डीएपी, 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये टाकली जातात.
- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रती झाड 4 लिटर पाणी दिले जाते. हळूहळू पाण्याची मात्रा 20 लिटरपर्यंत वाढवितात.
- दोन महिन्यांनी परत डीएपी 500 ग्रॅम व पोटॅश 100 ग्रॅम ही खते जमिनीतून दिली. फळांची निर्मिती व फुगवणीच्या काळात 35 ते 40 लिटर पाणी दिले जाते.
विद्राव्य खताचे व्यवस्थापन
सुरवातीचा एक महिना एक दिवसाआड 19-19-19 हे खत 5 किलो, फुले निघण्याच्या व फळे सेटिंगच्या काळात 12-61-0 प्रत्येक तीन दिवसांनंतर 5 किलो. त्यानंतर एक महिना किलो 13-40-13 ही खते एकूण 25 किलो, तर उर्वरित काळासाठी 0-52-34 व 0-0-50 ही विद्राव्य खते एकूण 50 किलो दिली जातात. या सोबतच अझोटोबॅक्टर, पीएसबी, तसेच पोट्याश विरघळवणारी जैविक खतेही हंगामातून दोन वेळा ठिबकद्वारा दिली जातात. गरजेनुरूप कीड व रोगांपासून पिकाचे संरक्षण केले जाते.
डाळिंबात कांदा व मेथी
- डाळिंबाच्या एक एकर क्षेत्रात आंतरपीक म्हणून कांदा लागवड केली होती. त्यातून 30 क्विंटल उत्पादन मिळाले. आता मेथी लागवड केली आहे.
- चिकूच्या रानातही गहू पेरला आहे. त्यामुळे दोन्ही पिकांची मशागत व व्यवस्थापन करणे सोपे जाते. आंतरपिकामधून फळबागेच्या खर्चाचा बराचसा भाग तोलला जातो.
टॅंकर आणि शेततळे
- शेताच्या डोंगराकडील बाजूलाच एक पाझर तलाव आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या दुष्काळामध्ये कोरडा राहिला. दोन्ही विहिरींचे पाणीही कमी पडले. त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागले. त्यासाठी पाच लिटर टॅंकर विकत घेतला मागील वर्षी वाहतूकखर्च सोडून नुसत्या पाण्यासाठी 300 रु. प्रतिटॅंकर देऊन 150 टॅंकर पाणी विकत घेतले. त्यावरच अधिक खर्च झाला.
- कृषी विभागाच्या शेततळे योजनेतून 45 मीटर बाय 30 मीटर आकाराचे दोन शेतकऱ्यांसह सामूहिक शेततळे केले आहे. त्यात या वर्षीपासून मत्स्यपालनाला प्रारंभ केला आहे.
- संपूर्ण फळबागेला ठिबकद्वारा पाणी दिले जाते.
संपूर्ण शेताची बांधबंदिस्ती
- नरहरी मुरमे यांनी मराठवाडा पाणलोट विकास मिशनमध्ये ग्राम समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी संपूर्ण शेताची बांधबंदिस्ती करून, शेताचे उतारानुसार टप्पे करून माती व पाण्याला अटकाव केला आहे.
- शेतातील काडीकचरा न जाळता त्याचे कंपोस्ट व गांडूळखत केले जाते. प्रती वर्षी ते 6 ते 7 टन गांडूळखत तयार करतात.
- बांधावर सागाची झाडे लावली आहेत.
उत्पादनात वाढ
या वर्षी एक एकर क्षेत्रातून कापसाचे 10 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. पूर्वी हलक्या जमिनीत ते चार ते पाच क्विंटल येत असे. त्याच शेतात आता गहू पेरला आहे. डाळिंबाच्या उत्पादनात सतत वाढ झाली. डाळिंबाच्या एक एकर क्षेत्राचे उत्पादन वाढत असून, चार टनांपासून चार वर्षांत 14 टनांपर्यंत पोचले आहे.
स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर आणि टॅंकरसुद्धा
एके काळी दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर काम करत होतो. आता स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी केला असल्याचे नरहरी अभिमानाने सांगतात. शेतातच राहण्यासाठी एक छोटेसे घरही बांधले आहे. दोन्ही मुले आता शिक्षकी पेशात स्थिरावली असून, आता वयोमानाप्रमाणे शेती जगन्नाथ व विठ्ठल या दोन मुलांवर सोपवली आहे. सध्या नातवांच्या शिक्षणासाठी ते औरंगाबादला राहतात.
कृषी विभागाची मदत
कृषी विभागाच्या ते कायम संपर्कात राहतात. त्यातून कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळण्यास मदत झाली. डाळिंबाच्या काटेकोर व्यवस्थापनाविषयी कृषी विभागातील विजय निकम, मंगेश निकम व आय. वाय. पठाण यांच्यासह तत्कालीन मंडळ कृषी अधिकारी कैलास पाडळे, कृषी अधिकारी अशोक अहिरे यांचेही मार्गदर्शन मिळाल्याचे नरहरी मुरमे यांनी सांगितले.
उत्पादन व उत्पन्न
महत्त्वाचे काही
- मुरमाड जमिनीचा कस कंपोस्टखत, गांडूळखत व पिकाची फेरपालट करून वाढविला.
- काटेकोर शेतीकडे वाटचाल.
- जमिनीची बांधबंदिस्ती करून माती व भूजलाचे संवर्धन.
- प्रत्येक निर्णयात मुलांना सोबत घेतात.
- काटेकोर शेती काळाची गरज असून, नरहरी मुरमे यांनी त्याचे तंत्र चांगल्या प्रकारे अवगत केले आहे. आपल्या हलक्या जमिनीचा कस वाढवत उत्पन्नातसुद्धा वाढ केली आहे.
- अशोक कोंडे, तालुका कृषी अधिकारी औरंगाबाद, मोबा- 9423985820.
संपर्क -
जगन्नाथ मुरमे मो. 8275524722
(लेखक अंबड जि. जालना येथे कृषी विभागात कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अग्रोवन