औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेले पोखरी हे छोटेसे गाव. गावात भाजीपाला व फुलशेती करणाऱ्या युवा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बाजारपेठ औरंगाबादच असल्याने बाजारासाठी फार काही त्रास घेण्याचा प्रश्न येत नाही. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत भाजीपाला व फुलशेतीसाठी पुरेसे पाणीच शिल्लक राहिले नाही. तरीही पोखरी गावच्या सुखदेव पुंजाजी विखे या तरुण शेतकऱ्याने फुलशेती व भाजीपाला याबरोबर शेवग्याचीही लागवड केली होती. तीच आता दुष्काळात आर्थिक मदतीचा हातभार लावीत आहे. आठवड्यातून दोन वेळा शेवगा शेंगांच्या विक्रीतून बऱ्यापैकी पैसा मिळत असल्याने दुष्काळाची तीव्रता काहीशी कमी झाल्यासारखी वाटते. शेवग्याचा आधार नसता तर या वर्षी फार काही उत्पन्न हाती लागले नसते.
पोखरी येथील सुखदेव विखे यांची एकूण नऊ एकर शेती. त्यात कापूस, तूर, मका ही महत्त्वाची पिके. शेवंती, गलांडा व झेंडू ही फुलपिके व दीड एकर मोसंबी ही नेहमीची पीक पद्धती. मोसंबी हे वार्षिक तर कापूस, तूर, मका ही हंगामी पिके. पाऊस चांगला झाला व हवामान चांगल्यापैकी असले तर उत्पन्नाचा मेळ जमणार. फुलशेतीतून मात्र चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत होते. अनेक वर्षांपासून फुलशेती करीत असल्याने उत्पादनाचे व विक्रीचे तंत्र याबाबतचे बारकावे चांगलेच समजले होते. त्यामुळे ही शेती परवडत होती. मात्र या वर्षी पाऊसमान खूपच कमी झाल्याने सगळीच पिके हातची गेली. मोसंबीसारखे पीकही काढून टाकावे लागले. नुकतीच मोसंबीच्या उत्पादनाला सुरवात झाली होती. मात्र पाण्याअभावी मोसंबीचे पीक काढण्याशिवाय पर्यायच नव्हता. छातीवर दगड ठेवून मोसंबीची 300 झाडे तोडली.
शेवगा लागवडीचे पहिलेच वर्ष -
विखे यांनी आपले मित्र इलियास बेग यांच्या सततच्या सांगण्यावरून व गावातील दोन शेतकऱ्यांच्या शेवगा लागवडीच्या अनुभवावरून या वर्षी 20 गुंठे क्षेत्रावर या पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला. जमीन हलकी, थोडीशी मुरमाड, पण पाण्याचा चांगला निचरा होणारी आहे. जून महिन्याच्या सुरवातीलाच 5 x 6 फूट अंतरावर 1 x 1 x 1 फूट आकाराचे 800 खड्डे खोदले. त्यात शेणखत व चांगल्या मातीचे मिश्रण भरले. यामुळे त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली. त्याचा फायदा शेवगा पिकासाठी झाला. सुरवातीलाच ठिबक सिंचन करून घेतले. पीक उगवून आल्यानंतर त्यास डायअमोनिअम फॉस्फेट खताचा डोस दिला. पोटॅशिअम हे खत ठिबकद्वारे दिले. सुरवातीला दररोज ठिबकद्वारे दोन ते तीन तास पाणी दिले. प्रति झाड किमान 12 लिटर पाणी दिले जात होते. मात्र पाणी जसजसे कमी पडू लागले तसतसे पाण्याचे तासही कमी केले. सुरवातीला तीन तासांचा अवधी कमी करीत पुढे फक्त अर्धा ते पाऊण तासच ठिबकद्वारे पाणी दिले. सध्या प्रति झाड फक्त तीन ते चार लिटर पाणी प्रति दिवशी दिले जाते.
आंतरपीक मेथी -
शेवगा लागवड केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पाच गुंठे क्षेत्रात मेथीचे आंतरपीक घेतले. त्याला मोकाट पद्धतीनेच पाणी दिले. पाच गुंठ्यांतून दीड ते दोन महिन्यांत 10 हजार रुपयांची मेथी झाली. त्यासाठी खर्च फक्त 1500 रुपये आला. मात्र मेथीमुळे आर्थिक चणचण भासली नाही. सायंकाळी मेथी काढली की सकाळीच औरंगाबादच्या बाजारात विक्रीस नेण्यात येत होती. आलेल्या पैशातूनच शेतीच्या निविष्ठा विकत आणण्यात येत होत्या. पाण्याअभावी फुलांचा हंगाम सुरवातीच्या दोन-तीन तोड्यातच संपला. त्यातून खर्चाची बरोबरी होऊन थोडेसे पैसे मिळाले. पण म्हणावा तसा फायदा मात्र झाला नाही.
शेवगा छाटणी -
शेवग्याची दोन महिन्यांत वाढ जोमदार झाली. कृषी सहायक प्रदीप निंबाळकर व अन्य शेतकऱ्यांच्या अनुभवावरून शेवग्याची छाटणी जमिनीपासून दोन ते अडीच फूट अंतरावर केली. छाटणीमुळे झाडाची वाढ तर थांबलीच; पण त्यास नवीन धुमारे खूप फुटले. धुमाऱ्यांना फूलधारणाही होऊ लागली. कीडनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या व एक वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्र दिली. एक निंदणी व एक कोळपणी केली. याशिवाय अन्य कोणते जास्तीचे व्यवस्थापन केले नाही.
शेवगा काढणी -
लागवडीपासून आठव्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात शेवग्याचा पहिला तोडा काढला. त्यानंतर मात्र आठवड्यातून दोन वेळेस शेवगा बाजारात नेला. एका वेळेस साधारण 150 किलो शेंगा निघतात. 800 झाडांपैकी शेवग्याची 250 झाडेही पाण्याअभावी सोडून दिली होती. केवळ 550 झाडांपासून दर आठवड्याला 300 किलो शेंगा मिळत होत्या. सर्व शेवग्याची औरंगाबादच्या बाजारातच विक्री केली. या वर्षी शेवग्याला भाव मागील वर्षीच्या (60 ते 75 रुपये प्रति किलो) तुलनेत फारच कमी म्हणजे 25 ते 30 रुपये असा मिळाला. मात्र खर्च इतर पिकांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने आर्थिक घडी सावरता आली. सुमारे 12 तोड्यांमधून 20 क्विंटल शेवगा निघाला. आणखीही दोन ते तीन तोडे अपेक्षित आहेत.
खर्च व उत्पादन -
अ.क्र. +खर्च +उत्पादन +दर +रक्कम
1 +झालेला एकूण खर्च +उत्पादन 20 क्विंटल +प्रतिक्विंटल 2700 रु. +54,000
+11,000 +यापुढे अपेक्षित उत्पादन 5 क्विंटल +प्रतिक्विंटल 2700 रु. +13,500
+11,000 +एकूण + +67,५००
2+खर्च वजा जाता मिळालेले निव्वळ उत्पन्न +56,500
मार्गदर्शन व सहकार्य -
कृषी विभागाचे प्रदीप निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप सोळंके यांचे मार्गदर्शन विखे यांना मिळाले आहे. "आत्मा' योजनेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत शेवगा विक्रीसाठीही त्यांना मदत झाली आहे.
शु. रा. सरदार, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद
या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत बहुतांश पिकांबाबत शेतकरी अडचणीत आले. मात्र थोडीशी वेगळी वाट शोधणारे व एकाच पिकावर अवलंबून न राहणारे सुखदेव विखे हे युवा शेतकरी मात्र काही प्रमाणात तरी चांगल्या प्रमाणात तगू शकले ते शेवगा पिकामुळे. दुष्काळी परिस्थितीत स्वतःची आर्थिक घडी विस्कटू न देता स्वतःला सावरू शकले. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची जोड अन्य नेहमीच्या पिकांना दिल्यास आर्थिक फायदा निश्चित होतो हे त्यांनी दाखवून दिले.
अशोक कोंडे, तालुका कृषी अधिकारी, औरंगाबाद
पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच विखे यांना थोडेफार उत्पादन घेणे शक्य झाले आहे. आपले शेत चहूबाजूने बंदिस्त केल्यास जलसंवर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारे उपायांची अंमलबजावणी करावी.
संपर्क - सुखदेव विखे - 99225263279922526327
प्रदीप निंबाळकर - 94227921959422792195
माहिती संदर्भ :अॅग्रोवन