प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम
देशाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीमध्ये आरोग्यास अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वांगीण आरोग्य सेवांचा दर्जा हा संख्यात्मकच न राहता तो गुणात्मकरीत्या वाढविणे तसेच सेवा सहजसाध्य होऊन समाजातील सर्व घटकांना विशेषत: तळागाळांतील लोकांपर्यंत पोहचविणे यासाठी संपूर्ण देशात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा पहिला टप्पा सन 2005 पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून आजतागायत अर्भक मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे व जननदर कमी करणे ही तीन प्रमुख उद्दीष्टे साध्य केली जात आहेत. नांदेड जिल्ह्यातही या तीन कार्यासाठी अथक प्रयत्न करुन प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम राबविला आहे.
गरोदरपण व प्रसुतीत मातांचे मृत्यू टाळण्यातही जिल्ह्याने प्रगती केली असून भारतात एक लाख लोकसंख्येमागे 212 माता मृत्यू होतात तर नांदेड जिल्ह्यात हे प्रमाण 41.7 टक्के इतके आहे. मातेची मासिक पाळी चुकताच नाव नोंदणी करणे सोयीचे असल्याने मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम ही ऑनलाईन गरोदर माता व बालकांची नोंदणी पद्धती सुरु करण्यात आली आहे. या नोंदणीचे फलीत म्हणजे नांदेड जिल्ह्यात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात 97 टक्के मातांची प्रसुती ही संस्थेत होत आहे. जिल्ह्यात 77.99 टक्के मातांची नोंदणी करण्यात आली आहे. या सोबतच जन्मलेल्या प्रत्येक बालकांची नोंदणी करुन त्याला पुढे दोन वर्षापर्यंत द्यावयाच्या सेवांची नोंद करण्यात येते.
गरोदर मातेची प्रसुती सुरक्षित होऊन माता व बालकांना कमीत कमी 72 तास निगराणीखाली ठेवता यावे यास्तव जिल्ह्यात डिलेव्हरी पॉईंट्सचे बळकटीकरण करण्यात आले आहे. 428 ठिकाणी डिलीव्हरी केंद्र असून याठिकाणी 24 तास प्रसुतीची व्यवस्था आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात मागील चार वर्षाचा संस्थात्मक प्रसुतीचा आलेख पाहिल्यास तो 90 टक्क्यांच्यावर गेला आहे. सन 2012-13 मध्ये जिल्ह्यात एकूण 51 हजार 885 प्रसुती झाल्या त्यापैकी 50 हजार 455 प्रसुती या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व शासकीय रुग्णालय आणि खाजगी मानांकित रुग्णालयात झाल्या आहेत. एकूण संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण हे 97 टक्के इतके आहे.
राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्राम पातळीवर ग्राम बाल विकास केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र व जिल्हास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात माहे डिसेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तीव्र कमी वजनाची (सॅम) व कमी वजनाची (मॅम) 2905 बालके होती. त्यापैकी 2290 बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आले यापैकी 2209 बालकांच्या वजनात वाढ झाली असून त्याचे श्रेणीवर्धन झाले आहेत.
कुपोषित सॅम व मॅम बालकांपैकी अंदाजे 10 टक्के बालकांमध्ये गंभीर व अतीगंभीर स्वरुपाचे आजार दिसून येतात. त्यांना विशेष करुन तयार करण्यात आलेल्या बाल उपचार केंद्रामध्ये 21 दिवसाच्या उपचाराकरीता दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये बाल उपचार केंद्र हे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे कार्यान्वित आहेत. सन 2012-13 या वर्षात एकूण 198 बालकांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार देण्यात आला असून त्यांच्यामध्येही सुधारणा झाली आहे.
ज्या बालकांचे बाल उपचार केंद्रात सीटीसी श्रेणीवर्धन होत नाही अशा बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात येऊन पुढील उपचार केले जातात. या केंद्रामध्ये दाखल बालकांना 14 ते 21 दिवस आहार व उपचार संहितेपोटी 5200 रुपये व बुडीत मजुरी पोटी पालकांना प्रती दिन 50 रुपये 14 ते 21 दिवसांपर्यंत देण्यात येतात.
भारतात 55 टक्के पेक्षा जास्त किशोरवयीन मुला-मुलींमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. राज्यातील 23 टक्के लोकसंख्या ही 10 ते 19 वयोगटातील असून योग्य पोषण व रक्तक्षय याची काळजी घेतल्यास बरेच निर्देशांकाचा विकास होऊ शकतो. शालेय व शाळाबाह्य मुलांसाठी केंद्र शासनाने यावर्षी पासून हा कार्यक्रम (विकली आयर्न अँड फॉलिक ॲसीड सप्लीमेंटेशन प्रोग्रॅम) सुरु केला असून याअंतर्गत 11 ते 19 वयोगटातील शालेय मुला-मुलींना दर आठवड्याला सोमवारी लोहाची 1 गोळी असे वर्षातील 52 आठवडे व सहा महिन्यातून एक वेळ जंतनाशक औषधी शाळेतील शिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. तसेच शाळाबाह्य किशोरवयीन मुलींना, विवाहीत पण गरोदर नसलेल्या किशोरवयीन मुलींना अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत या गोळ्या देण्यात येणार आहेत.
|