অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनौपचारिक आरोग्य शिक्षण

अनौपचारिक आरोग्य शिक्षण

औपचारिक वैद्यकीय शिक्षण आणि भारतातल्या आरोग्यसेवांचा यक्षप्रश्न


डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वातंत्र्यानंतर भारतातली आरोग्यसेवा "विकसित' झाली आहे. जोसेफ भोर कमिटीच्या शिफारशीनंतर बेतलेल्या या आरोग्यसेवांमधे गावपातळीवरच्या वैद्यकीय सेवांचा विचार करायचा राहून गेला होता. परिणामी आज डॉक्टर वर्गाने ग्रामीण आरोग्य सेवांकडे पाठ फिरवल्यावर देशभर ग्रामीण लोकांना बोगस डॉक्टर्स सोडून पर्यायच शिल्लक नाही. ग्रामीण भारतातल्या 70-80% गावांमधे स्थायी आरोग्यसेवा नाहीत.

औपचारिक वैद्यकीय शिक्षणाने "उच्च गुणवत्ते'च्या नावाखाली ग्रामीण जनतेची एक मोठी वंचना केली आहे. म्हणूनच ग्रामीण आरोग्यसेवेचा प्रचंड अनुशेष अनौपचारिक वैद्यकीय (आरोग्य) शिक्षणाचा मुख्यत: आधार आहे. तथापि प्रचलित कायद्यांमुळे अनौपचारिक शिक्षणाचा बराच भाग "बोगस' किंवा बेकायदेशीर ठरला आहे. इकडे अनौपचारिक शिक्षणाची कक्षा तंत्रज्ञानामुळे रोज उंच उंच जात आहे, तर दुसरीकडे जनरल प्रॅक्टीससारखी एकेकाळची स्थित व्यवस्थाही (आता ढासळती) "अनौपचारिक' शिक्षणातून सावरली जात आहे. म्हणूनच आरोग्याच्या बाबतीत अनौपचारिक शिक्षण "किरकोळङ्घ नाही तर "दमदार' पर्यायी प्रवाह म्हणून वाहतो आहे. मात्र हे बरेचसे अनौपचारिक शिक्षण "स्वयंसेवी' कक्षेतले नाहीतर चक्क खाजगी क्षेत्रातले असल्याने त्याच्याकडे काहीसे दूषित नजरेने पाहण्याची पद्धत आहे. आपण आपला दृष्टीकोन रुंदावला तर हे जास्त पटेल.

सर्वांसाठी आरोग्य, डॉक्टर नसेल तेथे, आणि वेअरफूट डॉक्टर्स


भारताप्रमाणे जगभर (अगदी अमेरिकेतही) ग्रामीण आणि वस्तीपातळीवर प्राथमिक आरोग्यसेवांचा प्रश्न कमी अधिक प्रमाणात अवघड झाला आहे. डॉक्टस, नर्स हे बहुश: नागरी व काहीसे रुग्णालयकेंद्री असल्यामुळे यावर पर्यायी विचार फार पूर्वीपासून सुरु आहे. महात्मा गांधींनी 1940 च्या आसपास ग्रामीण वैद्यकीय सेवांसाठी "होम अँड व्हिलेज डॉक्टर' नावाचे पुस्तक लिहून घेतले व प्रशिक्षणाचा विचारही केला होता. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जाता जाता हे ही काम करावे असा त्यांचा विचार होता. त्याच काळात हिमालयाच्या भिंतीपलिकडे डॉ. कोटणीस वगैरेंच्या मदतीने माओच्या लालसेनेने बेअरफूट डॉक्टर्सचा अत्यंत यशस्वी आणि टिकाऊ प्रयोग केला.

राजकीय पाठबळ असल्यामुळे हा अनौपचारिक प्रयत्न योग्य प्रमाणावर यशस्वी झाला आणि 1978 च्या "सर्वांसाठी आरोग्य' या जागतिक कार्यक्रमासाठी प्रेरणादायक ठरला. आजही चीनमधे असे दशलक्षभर डॉक्टर्स आहेत. अर्थात मूळ कल्पनेत आणि तपशीलात आता पुष्कळ बदल झाला आहे. 1977 मधे डेव्हिड वेर्नरचे जगप्रसिद्ध "व्हेअर देअर इज नो डॉक्टर' हे पुस्तक आले. अनौपचारिक आरोग्य-वैद्यकीय शिक्षणाची ही गीताच म्हणायला हवी. जगभर ऐंशीवर भाषांमधे हे पुस्तक रुपांतरीत झाले आहे. आजही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायक आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाती वैद्यकसेवा राहण्यासाठी, सहभागी लोकशाही आणि स्वातंत्र्याची मूल्ये सांगत, हसत खेळत आणि चित्रमय शिकवणारे हे पुस्तक थोरच आहे.

स्वयंसेवी आरोग्य चळवळीसाठी तर हे पुस्तक "मॉडेल'च ठरले आहे. या एकूण प्रयत्नांतून अनौपचारिक आरोग्यशिक्षणाचा एक आकृतीबंध आणि संवाद जगभर पसरला. मात्र भारतात स्वयंसेवी क्षेत्रापलिकडे हा प्रवाह पोहचू शकला नाही. सरकारीकरणाच्या वाळवंटात ही सरस्वती बरीचशी लुप्त झाली आहे. 1978 चे "सर्वांसाठी आरोग्य' हे स्वप्न 1985-90 या काळात भारतापुरतेतरी मृगजळासारखे लुप्त झाले आहे. बोगस डॉक्टर्सची समस्या वाढली ती मुख्यत: 80 च्या दशकात - ग्रामीण आरोग्य रक्षकांची सरकारी योजना गुंडाळल्यावर.

शासकीय क्षेत्रातले "अनौपचारिक' शिक्षण


शासकीय तरीही अनौपचारिक आरोग्य शिक्षण हा एक प्रकारे वदतोव्याघात आहे. 1978 नंतर ग्रामीण आरोग्यरक्षकाची देशव्यापी योजना झाली. या काळात मी नुकताच चाकण (पुणे) इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून लागलो होतो. आणिबाणीनंतर जनता राजवटीचा काळ म्हणून (आणि राजनारायण हे आरोग्यमंत्री होते). या योजनेला एक "सार्वत्रिक राजकीय बदलाचा' भाग म्हणून पाहणे अपरिहार्य होते.

सुरुवातीला आम्हाला तरी याबद्दल प्रचंड उत्साह होता. पण सरकारी खात्यातून या योजनेची प्रचंड ससेहोेलपट झाली. पैसे कमीच (50रु.मानधन), औषधांची चणचण, उपेक्षा आणि अवहेलना या सर्वांतून 1985 नंतर अनौपचारिक शिक्षण आणि सेवांचा हा प्रचंड प्रयत्न बंद पडला. सरकारने याच्या शैक्षणिक व्यवस्थापनाची कोणतीही धड व्यवस्था केली नाही. सरकारच्या डोक्यात कुटुंबनियोजन ही एकच गोष्ट कर्करोगाच्या गाठीसारखी वाढली होती. त्याच्यापुढे सरकारी अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेतृत्वाला दुसरे काही सुचतच नव्हते.

पावलो फ्रेअरी, डेव्हिड वेर्नर, महात्मा गांधी किंवा डॉ. कोटणीस वगैरे असले काी सरकारी खात्याच्या पचनी पडले नाही. सुमारे 6-7 लाख ग्रामीण स्त्री-पुरुष आरोग्य कार्यकर्ते या आरोग्य चळवळीतून बाद केले गेले. सरकारकडे कल्पना आणि सदिच्छा असती तर या प्रचंड योजनेला अनौपचारिक निरंतर शिक्षणाची जोड देऊन एक नवा पर्याय प्रवाहित झाला असता. "अनौपचारिक य असणे हाच इथे आरोग्यरक्षकांचा गुन्हा ठरला. या झटक्यातून अजूनपर्यंत ग्रामीण आरोग्यसेवा सावरली नाही. आता डॉक्टर मंडळींनी या सरकारी सेवेतून बहुसंख्येने अंग काढून घ्यायचे ठरवल्यावर आरोग्यसेवांचे मूळ दैन्य उघड पडले आहे.

अंगणवाडी योजना ही देशभर पसरलेली आणि दृढमूल झालेली एक प्रचंड योजना आहे. महाराष्ट्रात सुमारे 75 हजार अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच मदतनीस आहेत. या सर्वांना थोडेसे शिक्षण-प्रशिक्षण मिळालेले आहे. मात्र त्यातल्या शिक्षणाचा भाग प्रथमपासून दुबळा राहिला. महाराष्ट्र व दक्षिण भारतात त्यातल्या त्यात परिस्थिती बरी म्हणावी लागेल. पण एकूणच या क्षेत्रात अनौपचारिक शिक्षणाला मोठा वाव आहे.

महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांनी केलेले अनौपचारिक आरोग्य शिक्षण


सरकारी "चळवळी'चा अंत झाला तरी महाराष्ट्रात स्वयंसेवी आरोग्य चळवळीनेे बऱ्यापैकी मूळ धरलेले होते. पूर्वीपासून वारदेकर, आरोळे, अंतिया, दयालचंद, अनंत फडके, बंग दांपत्य, उल्हास जाजू, लोहिया, मंकड, अहंकारी, दंडारे, गोगुलवार, दिप्ती चिरमुले, अभय शुक्ल, मारी डिसोझा, मधुकर गुंबळे, मोेहन देशपांडे यांचे प्रयत्न चालू होतेच. 70 च्या दशकात व नंतर इतर अनेक कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी अनौपचारिक आरोग्य शिक्षण आणि चळवळींचा छोटासा प्रवाह वाहता ठेवला; नवनवीन प्रयोग केले आणि आजतागायत त्यातले अनेक प्रयोग टिकून आहेत. यातील बहुतेकांना संस्थागत आधार होता/आहे. शहरांमधेही असे काही लक्षणीय प्रयत्न झाले.

1992 मधे मीही "भारतवैद्यक' नावाचे यासाठी एक पुस्तक लिहून प्रकाशित केले. या एकूण आरोग्य चळवळीत छापील पुस्तकांची भूमिका मर्यादित आणि पूरक होती. कधी स्थानिक प्रश्नानुरुप तर कधी फंडींग एजन्सीच्या प्राधान्यक्रमांस अनुसरुन या संस्थांनी विविध विषय, पद्धती, साधने वापरली. यात "शिक्षणापेक्षा' "प्रशिक्षण' थोडे जास्त होते असे आता मला वाटते, कारण कौशल्य-विकसनावर थोडा जास्त भर होता. अर्थात थोडेफार "जाणीवजागृती'चे प्रयत्न होतेच. मात्र या छोट्या छोट्या क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रयोगांची महाराष्ट्रात मोठी नदी झाली नाही. कारण यासाठी बहुतेक कार्यकर्त्यांनी सरकारकडेच नजर लावली होती. सरकारचे हात आरोग्यरक्षक योजनेत आधीच "पोळले' असल्याने याला प्रतिसाद मिळणे अवघडच होते. आता 2008 मधे मात्र राष्टी्रय ग्रामीण आरोग्य अभियानात स्वयंसेवी प्रयत्नांंना पुन्हा एकदा थोडीशी अंधुक आशा दिसते आहे.

राष्ट्रीय आशा (Accredited Social Health Activist)) योजनेच्या एकूण प्रयत्नात महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थांचा लक्षणीय सहभाग होता. "आशा'साठी एकूण शैक्षणिक आकृतीबंध आणि पाठांचे लेखन आमच्या एका गटाने 2005 मधे नाशिकमधे बसून केले. अर्थातच असल्या राष्ट्रीय स्वरुपाच्या कामात फार तडजोडी व ताणतणाव असतात. त्यामुळे आमच्या गटाने केलेल्या पाठांपैकी फक्त 70-80% वापरले गेले. हे इथे सांगण्याचा उद्देश असा की महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी आरोग्यशिक्षण चळवळीचे एकूण आकलन व अनुभव राष्ट्रीय आशा योजनेच्या शैक्षणिक व्यवस्थापनात थोडेफार तरी उपयुक्त ठरले आहे.

मुक्त विद्यापीठ आणि अनौपचारिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण


पर्यायी आरोग्य-वैद्यकीय चळवळीची,गरज इतकी मोठी असूनही तसे व्यापक स्वरुप असलेली शैक्षणिक व्यवस्था आरोग्य शिक्षणाला (खरे म्हणजे वैद्यकीय शिक्षण) मिळत नव्हती. शासनाने तर यातून अंग काढून घेतलेले. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणाचा भाव इतका भरमसाठ की दरवर्षी संप, कोर्ट कचेऱ्या, हेडलाईन्स ठरलेल्याच. खेड्यापाड्यातल्या आरोग्य चळवळीचे कोणाला काय असणार? मात्र 2003 साली मी सहज म्हणून मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री. बाबुराव साबळे यांना भेटायला गेलो. त्यांना भारतवैद्यक हे पुस्तक भेट दिले. पुस्तक पाहून थोडा विचार करून त्यांनी मलाच आरोग्य विद्याशाखा सुरु करण्याचे आवाहन केले. मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेपासून मी प्रत्येक नव्या कुलगुरुंना भेटत आलो होतो. प्रा. ताकवले, प्रा. प्रधान, प्रा. भोईटे आणि आता डॉ. साबळे. नाशिकमधेच 1998 साली स्वतंत्र वैद्यकीय विद्यापीठ झाल्याने मुक्त विद्यापीठ या क्षेत्रात शिरायला तयार नव्हते. विद्यापीठाच्या प्रचलित आराखड्यात अशी विद्याशाखा सुरु करणे अवघडच होते. मात्र डॉ. साबळे यांनी एकूण आरोग्यक्षेत्राची गरज, मुक्त विद्यापीठाची लवचिक व्यवस्था आणि माझी उमेद यांची बेरीज करून आरोग्य विद्याशाखा सुरु करण्याचे पाऊल उचलले. आता 2008 मधे याला पाच वर्षे पूर्ण झाली.

एवढ्या पाच वर्षात आमच्या पाच जणांच्या टीमने अनेक नवीन प्रयोग केले. मुक्त विद्यापीठ म्हटले तर तसे शासकीय कायद्यानुसार विद्यापीठच; म्हणजे शिक्षणाची काही एक चौकट मानणारे. पण त्यातली लवचिकता अनेकविध आहे. प्रवेशासाठी एकतर बारावीच नाही तर कोणतीच शिक्षणाची अट नसणे, छोट्या अभ्यासक्रमांपासून डॉक्टरेटपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षणक्रम, गाठीशी विविध विद्याशाखांचा मोठा अनुभव आणि महाराष्ट्रातले एकूण विस्तारीत जाळे, अभ्यासकेंद्रे उघडण्याची, जोडण्याची लवचिक पद्धती, एकूण खर्च कमी असणे या सर्व गोष्टींचा मला उपयोग करता आला.

आधी आम्ही दाई प्रशिक्षणासाठी प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु केला. निरक्षर किंवा अल्पशिक्षित दाई, ग्रामीण, निर्ध, दूरस्थ, एकूण परंपरांचे ओझे अशी एकूण परिस्थिती. त्यात शासनाला एक टक्काही उत्साह नाही. हाही प्रयोग त्यामुळे मुख्यत: स्वयंसेवी क्षेत्रातच करावा लागला. यात आम्ही बरेच शिकलोही. या शिक्षण क्रमाच्या तीन पुस्तकांमधे अत्यंत सोपी चित्रमय मांडणी होती. प्रत्येक डाव्या पानावर चित्रे तर उजव्या पानावर मजकूर. ही पद्धत पॉवरपॉइन्टच्या स्वरुपाची होती. त्यामुळे आम्हाला पाठोपाठ पुस्तकांबरोबरच सर्व पाठ असे पॉवरपॉइंटमधे करता आले.

आमच्या टीमपैकी मंजिरी जोशीने यात रंग भरले; व्हिडीओ क्लिप्स टाकल्या. हा पॉवर पाईंटचा फॉर्म शैक्षणिकदृष्ट्या अत्यंंत यशस्वी झाला. या नमुन्यावर काम करण्याचा मोठा फायदा असा की पॉवरपॉइंट शो मधली रचना, क्रम बदलता येत होते; त्यातल्या स्लाईड्स दुरुस्त करता येत होत्या. वाटल्यास त्याला संगीत-शब्दांची जोड देता येत होती. हा प्रयोग एकूणच आम्हाला खूप आवडला, आणि हे साधन-तंत्रज्ञान अनौपचारिक शिक्षणासाठी (पुस्तकांपेक्षा) खूप ताकदवान ठरेल असे आमचे मत आहे. 2006 मधे याचा वापर करायला नगर जिल्हा परिषदेच्या 90 परिचारिकांना आम्ही तासाभरातच शिकवू शकलो. परंतू भारतातला एकूणच दाई प्रशिक्षण शिक्षणक्रम केंद्र शासनाच्या अशास्त्रीय धोरणांमुळे (सर्व बाळंतपरे रुग्णालयात करण्याच्या अट्टाहासामुळे) कचराकुंडीत गेला आहे हा भाग वेगळा.

2006-07 मधे आमच्या टीमने "आरोग्यमित्र' (आशा) हा आरोग्यकार्यकर्त्यांसाठी 16 श्रेयांकाचा शिक्षणक्रम सुरु करून आता वर्षभर झालेले आहे. राष्ट्रीय आशा योजनेचा मूळ (पूर्ण इंग्रजी) आकृतीबंध आम्हीच तयार केला असल्याने त्याचे मराठीकरण करून आम्ही 5 पुस्तके केली. त्यातही एका बाजूला चित्रे, दुसरी बाजू मजकूराची अशी रचना केली आहे. अनौपचारिक आरोग्यशिक्षणाची भाषा, व्याकरण, मांडणी, चित्रे याबद्दल आम्ही यात आणखीन बरेच काही शिकलो आणि हे शिक्षण चालूच आहे. मुक्त विद्यापीठात एक विशिष्ट पाठरचना वापरली जाते. त्यात काही सोपेकरण करून आम्ही 98 पाठ तयार केले. राष्ट्रीय "आशा' कार्यक्रम करताना यावर आम्ही (विस्तारीत गटाने) खूप विचार केला होता.

सर्व 98 पाठ 4-5-6 पानांचे, यात निम्मी पाने चित्रांचे, मोठ्या फॉन्टचा वापर आणि (deconstruct) तुकड्या तुकड्यांनी बनलेला (गोधडीप्रमाणे) एकूण शिक्षणक्रम. यात पहिली 28 पाठांची कडी अगदी आवश्यक, गावाच्या दृष्टीने बहुजिनसी अशी होती. या पहिल्या पुस्तकाचा वापर देशभर विविध भाषांमधे 5 लाख आशांच्या प्रशिक्षणात झाला आहे. आता नुकतीच दुसऱ्या पुस्तकाची फेरी सुरु झाली आहे. (यातील राष्ट्रीय पातळीवर झालेल्या मतभेदांचे शैक्षणिक विवरण करणे एक स्वतंत्र प्रकरण होईल.) आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे सर्व पाठ वेबसाईटवर/सीडीवर उपलब्ध करणे, त्यातले हवे ते पाठ हव्या त्या क्रमाने अभ्यासकेंद्रांनी लवचिकपणे वापरणे व शिक्षणक्रम पूर्ण करणे असे होते. मुक्त विद्यापीठाच्या आरोग्यमित्र (आशा) शिक्षणक्रमात पाच पुस्तकांबरोबर आता आम्ही अशी सीडी देणार आहोत.

1(Footnotes) 1 यात मी, डॉ. दीप्ती चिरमुले (आता हयात नाहीत), डॉ. शशि अहंकारी, डॉ जगन्नाथ दिक्षित, डॉ. रत्ना अष्टेकर, वै. विजय कुलकर्णी, डॉ. धृव मंकड असे सातजण होतो. सर्व पाठ वेबवर उपलब्ध करणे, त्यात गरजेनुरुप बदल-भर क रून लवचिकता ठेवणे हे एक उद्दिष्ट आहेच.

मुक्त विद्यापीठाच्या आरोग्यमित्र शिक्षणक्रमात जानेवारी 2007 मधे महाराष्ट्रात सुमारे 700 कार्यकर्ते 35 अभ्यासकेंद्रातून सामील झाले. यात प्रामुख्याने स्वयंसेवी संस्थांचे जास्त, पण काही (बोगस? डॉक्टर्स) पुरुष कार्यकर्तेही होते. यवतमाळ-वणी मधल्या घटत्या आदिवासी जमातीतल्या 8 जणीही होत्या. वर्कबुक, कार्यपुस्तिका आणि बहुपर्यायी प्रश्न वापरून आम्ही त्यांची परीक्षा घेतली. यात सुमारे 80% विद्यार्थी पास झाले. विद्यापीठाचे एक प्रमाणपत्र त्यांच्या हाती आले. परीक्षा सोपी होती, पण परीक्षा असणे हाच एक वेगळा शैक्षणिक अनुभव व चालना असते.

आता या शैक्षणिक प्रयोगावर आधारीत असा एक प्रस्ताव आम्ही राष्टी्रय ग्रामीण आरोग्य मिशनसमोर मांडणार आहोत. देशभरच्या 5 लाख (यात आणखी 3-4 लाखांची भर पडेल) आशांसाठी श्रेयांक आधारीत प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु करण्याचा विचार चालू आहे. मुळात ASHA चे पहिले अक्षर A हे Accredited म्हणजे शैक्षणिक दर्जा-प्रमाणाबद्दलचे आहे. या सर्व विषयावर, अनौपचारिक शिक्षणावर आणि दर्जा वाढवण्यावर आमचा एक मसूदा आता जवळजवळ लिहून तयार आहे.

खाजगी रुग्णालयातील लाखभर कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत फारशी शिक्षणाची सोय नव्हती, होती ती स्थानिक पातळीवर थोडीफार होती. आम्ही यासाठी संपूर्ण मराठीतून 24 श्रेयांकाचा एक शिक्षणक्रम तयार केला आहे. महाराष्ट्रात हा आमचा सर्वात लोकप्रिय शिक्षणक्रम आहे. रुग्णालयात काम करणारे कर्मचारी (यात बहुतेक स्त्रिया) थोड्याफार मदतीने हा शिक्षणक्रम पूर्ण करू शकतात. याची पुस्तके, शिक्षणपद्धती, परीक्षा वगैरे गोष्टी आमच्या दृष्टीने उद्बोधक ठरल्या. * यातील पहिले पुस्तक "गृहरुग्णसहायक' हे केवळ कौटुंबिक पातळीवर लागणाऱ्या आरोग्य सेवेसाठी आहे. स्वयंरोजगारही यातून निर्माण होणार आहे. इथुन पुढे घरगुती आरोग्यसेवकांची मोठी गरज असेल. याच धर्तीवर आता आम्ही "अंगणवाडी' सेविकेच्या शिक्षणक्रमाची तयारी करीत आहोत.

मुक्त शिक्षण पद्धतीत मुख्य मुद्दा लवचिकतेचा आणि विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक प्रयत्नांचा असतो. स्वयंशिक्षण हे तत्व असते आणि अंतिमत: शैक्षणिक श्रेय (प्रमाणपत्र) मिळवणे हे एक ध्येय असते. यापैकी सगळ्याच गोष्टी एकत्र घडतात असे होत नाही. यात व्यावहारिक अडचणी येत राहतात. शेवटी विद्यापीठाची एक चौकट, एक वेळापत्रक असतेच. परीक्षा ही औपचारिक गोष्ट राहते (अर्थातच परीक्षा न देण्याचा एक पर्याय असतोच). या सर्व घटकांमधे (अध्"न, साहित्य, समंत्रण, परीक्षा) लवचिकता आणण्याचे काम चालूच असते. माहिती तंत्रज्ञानामुळे अध्"न-साहित्य/पद्धती मूल्यमापन तसेच प्रशासनात क्रांती होईल. मराठी भाषेतून, मी म्हणतो आहे त्या लक्ष्यगटांपर्यंत याचे फायदे पोहचवणे हे एक मोठे आव्हान आहे. त्याची एकेक पायरी आपण चढत आहोत. आणखी 5-10 वर्षात प्राथमिक आरोग्याच्या अनौपचारिक शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव असेल असे मला वाटते. तंत्रज्ञानामुळे एकूणच अनौपचारिक शिक्षणाच्या अंगणात अनेकविध प्रयोग एकदम भर बाजारात आणि ऐन मैदानात आल्या आहेत. मुक्त शिक्षणात त्यामुळे एक क्रांती होऊ शकेल अशी मला खात्री आहे. औपचारिक शिक्षणाची "सत्ता व मत्ता' यातून बरीच कमी होऊ शकते.

अनौपचारिक आरोग्यशिक्षणाचे बहुविध प्रवाह


केवळ ग्राम-आरोग्यरक्षक किंवा दाई हाच अनौपचारिक आरोग्यशिक्षणाचा केंद्रबिंदू नाही. आरोग्य हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने लहानमोठ्या अनेक प्रयोग-प्रकल्पात निरनिराळे प्रयत्न होत आहेत. आजीबाईच्या बटव्यापासून फॅमिली डॉक्टर (सकाळ समूह) पर्यंत विविध गरजा भागवल्या जात आहेत.

स्वयंसेवी संस्थंानी "बाजारपेठ' ही बहुश: शत्रुस्थानी मानली असली तरी बाजारपेठ हाच पर्यायी आरोग्यसेवा आणि आरोग्यशिक्षणाचा ब्रह्मपुत्र नद झाला आहे. त्यात चांगल्याबरोबर गदळही वहात असते, पण ते एक प्रकारे अपरिहार्य आहे. सर्वव्यापी बाजारपेठ हे आर्थिक लोकशाहीचे वाहन आहे. अनौपचारिक आरोग्यशिक्षण हे केवळ मर्यादित संस्थात्मक व्यवहार राहणे ठीक नाही. यासाठी 1970 च्या दशकात स्वयंसेवी कार्यकर्ता (नेता) व आरोग्य कार्यकर्ते (अनुयायी) एवढाच परीघ होता. आता अनौपचारिक आरोग्यशिक्षणाची गरज आणि शक्यता रोज वाढत असल्याने त्याची बाजारपेठ तयार झाली आहे. वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधून कायम चूर्णापासून लैंगिक शक्तीवर्धकांपर्यत जाहिराती येतात तसे सकस आरोग्य लेखनही झाले आहे. फॅमिली डॉक्टर्स सारखे साप्ताहिक लक्षावधी कुटुंबांपर्यंत पोचते. (त्यातले वैद्य तांबे यांचे लेखन हा अशास्त्रीय गदळ लेखनाचा नित्य नमुना आहे, पण इतर चांगले लेखही असतात.)

रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, सीडी वगैरे अनेक माध्यमातून पर्यायी आरोग्य-वैद्यकीय स्वयं शिक्षणाची गंगा घरोघरी पोचली आहे. यात धोके असणारच, पण शक्यताही असंख्य आहेत. मुक्त विद्यापीठाच्या पूर्वीच्या "दूर' शिक्षणाची पद्धत ही आता एज्युसॅटमुळे बदलत आहे. तंत्रज्ञानाचा हा वापर भूमितीश्रेणीने वाढू शकतो. दूरस्थ विद्यार्थी आणि समंत्रक-शिक्षक समोरासमोर आणण्याची किमया एज्युसॅटने शक्य झाली आहे. अनौपचारिक आरोग्य-वैद्यकीय शिक्षणासाठी ही मोठी संधी आहे. पुणे विद्यापीठातले सी-डॅक ने आरोग्य-माहितीचा एक मोठा प्रयत्न नुकताच हाती घेतला आहे. यातून रोज नवनव्या वाटा तयार होतील.

सारांश

औपचारिक वैद्यकीय शिक्षणातून देशाची, विशेषत: इंडिया सोडता भारताची बहुतकरून वंचनाच झाली हे आता स्पष्ट झाले आहे. हे मॉडेल युरोपियन चीनने जसे नाकारले तसे भारतात राजकीय परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. उलट या "वरून खालीङ्घ व्यवस्थेमुळे वैद्यकीय सेवा रुग्णालयीन व शहरकेंद्री झाल्या. परंतु तसेच अनौपचारिक आरोग्य शिक्षणाचे जगभरचे प्रयोगही भारतात कल्पनाशून्य सरकारीकरणामुळे कुंठित झाले आहेत. ग्रामीण व वंचित जनतेची वैद्यकीय सेवांची गरज मुख्यत: "पर्यायी' वैद्यकीय शिक्षणाने भागवली, भले त्याला "बाजारु' म्हणून आपण हिणवत असलो तरी. स्वयंसेवी संस्थांचे अनौपचारिक आरोग्यशिक्षणाचे अभिजात (क्लासिकल) प्रयोग भारतात अत्यंत सीमित व फंड-अनुरोधी झाले आहेत. मात्र त्यातली सकस बीजे पसरवण्याचे काम मुक्त विद्यापीठासारख्या संस्था करु शकतात.

माध्यम क्रांती, त्याची बाजारपेठ, माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क व्यवस्था या सगळ्या घटकांमुळे अनौपचारिक आरोग्य-वैद्यकीय शिक्षण एक समांतर मोठा प्रवाह म्हणून वहात आहे. त्यात गदळ आहेच, पण त्याला निश्चित असा इलाज नाही. अनौपचारिक आरोग्यशिक्षण हे आता "अंगणवाडी' च्या (मूळ अर्थाने) परिघात राहू शकत नाही. त्याची एक वाढती बाजारपेठ आहे. पण आरोग्य वैद्यकीय ज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी याचा कल्पक वापर करणारे आणखी गटवार व संस्थात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. स्वयंसेवी संस्था यात मूल्यवान भर टाकू शकतात. 

डॉ. शाम अष्टेकर
27.05.०८

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate