महिला बचत गट हे एव्हाना सर्वांच्या परिचयाचे शब्द झाले आहेत. शासनाने बचत गटांच्या उत्पादनांसाठी विविध ठिकाणी प्रदर्शन व विक्री सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांची उत्पादने शहरी भागातही सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यातही नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे उत्पादन असल्यास ग्राहकही आवर्जून खरेदी करतात, याचा अनुभव सध्या मुंबईत वांद्रे (पश्चिम) येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात वर्धा जिल्ह्यातील वायगावच्या ‘जयदुर्गा महिला बचत गट’ घेत आहे. त्यांच्या टेराकोटा (भाजलेल्या मातीच्या) दागिण्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बचत गटांची चळवळ सुरू झाल्यानंतर राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो महिला आपला उंबरठा ओलांडून संसाराला हातभार लावण्यासाठी या छत्राखाली पहिल्यांदाच बाहेर पडल्या. असाच तयार झालेला एक बचतगट म्हणजे वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपाणीचा जयदुर्गा महिला बचत गट होय.
वर्ध्यापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या वायगावच्या ११ महिला सदस्यांनी एकत्र येऊन ३० रूपये प्रति महिना बचत करीत सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००६ साली या बचत गटाची स्थापना केली. कुंभार व्यवसायातील महिला असल्याने साहजिक म्हणून त्यांनी माठ विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार २० हजार रूपयांचे खेळते भांडवल मिळवून त्यांनी माठाचा हा व्यवसाय सुरू केला. चाकावर माती फिरवून माठ बनविणे हे थोडे ताकदीचे आणि म्हणून कठीण काम आहे. त्यामुळे त्यांनी माठ स्वत: न बनविता विकत घेऊन त्यांची विक्री सुरू केली.
थोड्या कालावधीत त्यांना त्यात पाच हजारांचा नफाही झाला. परंतु माठ विक्री हा काही वर्षभर चालणारा व्यवसाय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच कालावधीत त्यांची गाठ वर्धा येथील तेव्हाच्या प्रकल्प संचालक लीना बनसोड यांच्याशी पडली आणि बचत गटाला व्यवसायाची नेमकी दिशा सापडली.
विविध बचत गटांच्या महिलांसोबत काम केल्याने श्रीमती बनसोड यांना त्या महिलांमधील कलाकार शोधण्याची कला साध्य झाली होती. महिला मेहनतीचे काम करू शकणार नाहीत परंतु त्यांना प्रशिक्षण दिले तर त्या कलाकुसरीचे काम उत्तम रितीने करू शकतील हे त्यांनी हेरले आणि तालुका समन्वयक उज्ज्वला गुजर यांना मातीचे दागिने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी करारबद्ध केले.
त्यांनी जयदुर्गाच्या महिलांना वर्धा येथील केंद्र सरकारच्या महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थेत प्रशिक्षण दिले. सुरूवातीस महिलांना हे काम करू शकू याबाबत अजिबात विश्वास नव्हता, परंतु दिवसागणिक प्रगती साधत त्यांनी ही कला साध्य केली. आता हे दागिने आपणच बनवतोय याचे त्यांना आश्चर्य वाटण्याएवढे सफाईदारपणे त्या ते बनवताहेत.
बचत गटाच्या टेराकोटा दागिण्यांचे पहिले प्रदर्शन थेट दिल्लीच्या प्रगती मैदान मधील भारतीय औद्योगिक मेळ्यात आयोजित करण्यात आले. तेथे मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर बचत गटाने स्वत:ची भट्टी तयार केली. दागिने बनविण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना गटाच्या मार्गदर्शक आणि प्रशिक्षक उज्ज्वला गुजर यांनी सांगितले की, यासाठी लागणारी माती वायगाव येथे मिळत नाही. त्यासाठी सुरूवातीला आम्हाला काही किलोमिटरमधील परिसराचा शोध घ्यावा लागला. चांगल्या मातीची ठिकाणे निश्चित करून तेथून माती आणण्यात येऊ लागली.
माती कालविणे, साचे बनविणे, साच्यातून बाहेर पडलेल्या दागिण्यांवर नक्षी तयार करणे, ती भाजणे अशी सर्व कामे गटातील महिला आता स्वत: करू लागल्या आहेत.
विक्रीला आलेली दागिणे पाहिली तर ती हाताने बनविलेली आणि मातीची आहेत यावर सांगितल्याशिवाय कोणाचाही विश्वास बसणार नाही. माती भाजलेली असल्याने हे दागिणे टिकाऊ आहेत.
विशेष म्हणजे यातील काही दागिण्यांसाठी वापरण्यात येणारे रंग देखील नैसर्गिक आहेत. हे रंग आणि काही दागिण्यांवर केलेली वारली पेंटींग दागिण्यांच्या आकर्षणात अधिक भर घालत आहेत. भारतात केवळ बंगाल आणि दक्षिणेच्या काही राज्यात ही कला होती, आता आपल्या राज्यातही याची निर्मिती होऊ लागल्याने त्यांना मोठा प्रतिसाद लाभत आहे.
गटाच्या प्रगतीचा आलेख चढताच आहे. सुरूवातीस प्रत्येकी ३० रूपये असणारी बचत वाढत जाऊन आता १०० रूपये महिना झाली आहे. २००८ साली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वायगाव शाखेने दिलेल्या एक लाख ६० हजार रूपयांच्या कर्जाची गटाने तीन वर्षात नियमित हप्त्यांमध्ये परतफेड केली आहे. त्यानंतर स्वत:चे भांडवल तयार झाल्याने व्यवसायासह स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी देखील अंतर्गत कर्जव्यवहार सुरू झाले आहेत.
गटाच्या अध्यक्ष लिलाबाई वेलतूरकर या असून सचिव वनिता ठाकूर या उज्ज्वला गुजर यांच्यासह प्रदर्शन व विक्रीची जबाबदारी सांभाळत आहेत. आतापर्यंत दिल्ली आणि मुंबई सह कोलकाता, भूवनेश्वर, बेंगलुरू अशा विविध ठिकाणी गटाने प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
२००९ पासून महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहभागी होत असलेल्या या गटाने दोन वेळा तालुका व जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, २०१२ साली वेगळ्या उद्योगासाठीचा केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण कमळ पुरस्कार अशा पुरस्कारांसह विविध प्रमाणपत्रेही मिळविली आहेत.
शासनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २०१० साली मुंबईत शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनात देखील या गटाने सहभाग घेतला होता. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तत्कालिन महासंचालक प्राजक्ता लवंगारे यांनी देखील जयदुर्गा महिला बचत गटाला प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.
एकूणच मातीलाही अनमोल बनविण्याचे काम करणाऱ्या आणि त्याद्वारे आपला चरितार्थ चालविणाऱ्या जयदुर्गा महिला बचत गटाचे काम इतरांनाही प्रेरणादायी ठरावे, असेच आहे.
लेखक: ब्रिजकिशोर झंवर, सहायक संचालक (महान्यूज)
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 8/27/2020
प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन ज...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...