रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मुचरी हे साधारण अडीच हजार वस्तीचे गाव. गावाचा विस्तारही मोठा आहे. गावातल्या गोसावीवाडीतील महिलांनी गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून दिली. बचतगटाच्या माध्यमातून अळंबी उत्पादनासारखा वेगळा व्यवसाय करून या महिलांनी गटाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.अश्विनी आणि जयश्री सोलीम यांच्या मार्गदर्शनाखाली 2006 मध्ये सुरू झालेल्या वाघजाई महिला बचतगटाने सुरूवातीला झालेल्या बचतीतून भाजीपाला उत्पादन सुरू केले. तयार झालेली भाजी जवळच्या वाड्यांमधून विकण्याचा व्यवसाय पावसाळ्यानंतर होत असे. अशात बाळकृष्ण सोलीम आणि ग्रामसेवक टी.एम.तडवी यांनी महिलांना अळंबी उत्पादनाची माहिती दिली आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले.ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून 2010 मध्ये 25 हजार रुपयांचे कर्ज मिळाल्यावर प्रथमच या महिलांनी अळंबी उत्पादनाकडे लक्ष दिले. कोकणात पावसाळ्यात नैसर्गिकरित्या अळंबी मिळते. तीला दरही चांगला मिळतो. मात्र पावसाळ्यानंतर बाहेरच्या गावातील अळंबी काही प्रमाणात जिल्ह्यात येते. अळंबीला चांगला बाजार असल्याने महिलांनी कृत्रीम शेड तयार करून अळंबी उत्पादन सुरू केले. उत्पादनाची पद्धत बरीच कष्टप्रद असली तरी महिलांनी ती सहजपणे केली.
पहिल्याच वर्षी चांगला लाभ झाला. 150 रुपये किलोप्रमाणे अळंबी विक्री झाली.गतवर्षीदेखील महिलांनी हा प्रयोग यशस्वीपणे पुढे नेला. अनेक ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन त्यांनी अळंबीची विक्री केली. त्याचबरोबर घरगुती तयार केलेले पदार्थ बनविणेही जोडधंदा म्हणून सुरूच ठेवले. गटातील प्रत्येक महिला वर्षाकाठी पाच ते दहा हजार रुपये मिळवित आहेत. पावसाळ्यात भातशेतीची कामेही महिला करतात. आता आत्मविश्वास वाढल्याने अळंबीचे मोठे युनिट उभारण्याचे स्वप्न घेऊन या महिला पुढे जात आहेत. घरच्या मंडळींची साथ असल्याने त्यांचा उत्साहदेखील वाढला आहे.नुकतेच या बचतगटाला जिल्हास्तरावरील प्रथम आणि विभागीय स्तरावरील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. संगमेश्वर परिसरातील हॉटेल्समधूनही मुचरीच्या अळंबीला मागणी येऊ लागली आहे. नेहमीपेक्षा वेगळा व्यवसाय करून या महिलांनी मिळविलेले यश इतर महिला बचतगटांनाही मार्गदर्शक ठरले आहे.
लेखक - डॉ.किरण मोघे
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/8/2020
प्रशासन खऱ्या अर्थाने त्याच्या घरात पोहोचविण्याचा ...
रत्नागिरी म्हटले की हापूस आंबा, काजू, फणस, सुपारी ...
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे य...
कोकणात साहिवाल गोवंशाचे संवर्धन करण्याबरोबरच तूपनि...