ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी योग्यप्रकारे मार्गदर्शन केले की, आत्मनिर्भर होण्यास वेळ लागत नाही. प्रशिक्षण आणि प्रोत्साहनातून ग्रामीण भागातील महिला आज स्वावलंबी होत आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ घेत स्वावलंबी झालेल्या महिलांची उद्यमशीलता पाहिली की, गोंदिया सारख्या राजधानी मुंबई पासून दूर पूर्वेकडील टोकावर असलेल्या जिल्ह्यातही शासकीय योजना उत्तमरित्या राबविल्या जात असल्याची साक्ष मिळते.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी हा आदिवासी बहुल, दुर्गम आणि नक्षलग्रस्त तालुका. देवरी तालुक्यातील आमगाव येथील आदिवासी महिला श्रीमती उषाबाई तवाडे या कृषी विभागाकडून मिळालेल्या आळंबी (मशरूम) प्रशिक्षणातून आळंबीचे उत्पादन घेऊन स्वावलंबी तर झाल्याच, सोबत आळंबी उत्पादनाचे मार्गदर्शन करुन बचतगटातील महिला व किशोरींना स्वावलंबी करण्यास हातभार लावला.
आपल्या कुटुंबाच्या अर्थोत्पादनात आपलाही हातभार लागला पाहिजे असे वाटल्याने सन 2005 मध्ये उषाबाईने देवरी तालुका कृषी विभागामार्फत आळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घरीच आळंबी उत्पादनाला सुरुवात केली.
धानाच्या तणसाचा उपयोग आळंबीच्या बिया टाकण्यासाठी केला. 24 तास तणस पाण्यात भिजवून ते मोठ्या पॉलीथीन पिशव्यांमध्ये भरले. ओल्या पॉलीथीन पिशव्यांमध्ये आळंबीच्या बिया टाकल्या. घरातील एका बंद खोलीत 175 पॉलीथीन पिशव्या बांधल्या. बंद खोलीत फार्मोलीनची फवारणी केली. खोली जंतूविरहीत करण्यात आली. यासाठी उषाबाईला केवळ तीन हजार रुपये खर्च आला. 24 दिवसात त्यांना उत्पादन मिळू लागले. दरवर्षी उषाबाई घरीच मशरुमचे जवळपास एक लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत. कृषी विभागाकडून मशरुम तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे उषाबाईला तर रोजगार मिळालाच, त्याचबरोबर कुटुंबालाही आर्थिक हातभार लागला. घरीच आळंबी तयार करण्याचा उद्योग सुरु करुन उषाबाईने इतर महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 1/30/2020
शेतीपूरक उद्योगांविषयीची माहिती येथे देण्यात आलेली...
कृषी व पूरक उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागाती...
औषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशी...
शेतीवर पूर्णपणे विसंबावे अशी आजची स्थिती नाही. कार...