অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उद्योगातून दरवळतोय समृद्धीचा सुगंध

शेतीवर पूर्णपणे विसंबावे अशी आजची स्थिती नाही. कारभाऱ्याच्या मदतीसाठी घरची कारभारीण धीराने पुढे आली तर प्रत्येक घराचे आर्थिक चित्र बदलू शकते. त्यासाठी ग्रामीण भागात राहून करता येतील असे अनेक छोटे व्यवसाय आहेत. अनेक महिलांनी त्यामध्ये यश मिळवताना घरासाठी शाश्‍वत उत्पन्नाचे पर्याय तयार केले आहेत. अशा जिद्दी महिलांच्या यशकथा सर्वांनाच नवे काही तरी करायला, आपल्या कुटुंबाला सावरायला प्रेरणा देतील. आजपासून सुरू होणाऱ्या या साप्ताहिक पानाचा उद्देश महिलांना पूरक अर्थार्जनासाठी मार्गदर्शन करणे, त्यांचे मनोबल उंचावणे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे हाच आहे. "ऍग्रोवन'चा महिला वाचकवर्ग या पानाचे नक्कीच स्वागत करेल, असा विश्‍वास वाटतो.

शरीर वृद्धत्वाकडे झुकत असले तरी मनाने तरुण असलेल्या बाभूळगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील सुमनताई गवई यांनी महिला सक्षमीकरणाचा वसा जपत मसाला उद्योगाची पायाभरणी केली. सुमनताईंच्या या मसाला उद्योगाचा गंध आता सर्वदूर दरवळू लागला असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आज गावात तब्बल दहा समूहांची नव्याने उभारणी झाली आहे.
बोरगावमंजू (जि. अकोला) हे सुमनताईंचे माहेर. त्यांचे वडील गुणाजी वानखडे रेल्वेत नोकरीला होते. सुमनताईंचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी डी.एड. करावे, अशी वडिलांची अपेक्षा होती; परंतु काही कारणांमुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. याचदरम्यान त्यांचा विवाह पातूर तालुक्‍यातील बाभूळगावचे समाधान गवई यांच्याशी झाला.

समूहाची केली उभारणी

सुमनताईंचे पती समाधान गवई हे भारतीय वखार महामंडळातील कर्मचारी. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सुमनताईंनी कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा याकरिता शेतीपूरक व्यवसायाची चाचपणी सुरू केली. वयाच्या 67 वर्षी त्यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयाची 2004 साली अंमलबजावणी करीत महात्मा फुले महिला समूहाची उभारणी केली. समूहाच्या सुमन गवई अध्यक्षा, तर सचिव मंगला विलास गावंडे आहेत. समूहातील इतर सदस्यांमध्ये सुवर्णा राजेश गवई, कांचन प्रदीप गवई, वैष्णवी महेंद्र गवई, मनीषा अरविंद तायडे, विजया गजानन फाटकर, आरती विलास गावंडे, नर्मदा गजानन गोंडाणे, मानसी राजेश गवई यांचा समावेश आहे. 30 रुपये महिन्याकाठी बचतीचे उद्दिष्ट आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बाभूळगाव शाखेत समूहाचे खाते आहे.

उद्योगात भरारी

"आत्मा' यंत्रणेअंतर्गंत या समूहाची नोंदणी करण्यात आली. त्यासोबतच गटास प्रशिक्षण देऊन गटाची क्षमता बांधणी झाली. सुरवातीला समूहाच्या बचतीमधून 300 रुपये अंतर्गंत कर्ज काढत त्या रक्‍कमेतून कच्चा माल खरेदी करीत प्रायोगिक तत्त्वावर मसाला तयार केला. त्याची विक्री अकोला जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित "स्वस्ती' प्रदर्शनात करण्यात आली. घरच्या घरी उत्पादित मसाल्याला ग्राहकांची चांगली मागणी राहिली. त्यामुळे उत्साह वाढीस लागला आणि याच व्यवसायात पाय रोवण्याचा निर्णय घेतल्याचे सुमनताई सांगतात.

विक्रीकरिता प्रदर्शनाचा पर्याय

25 ते 200 ग्रॅम वजनाच्या पॅकिंगमध्ये मसाल्याची विक्री त्यांच्याद्वारे होते.

25 ग्रॅमकरीता 20 रुपये, 50 ग्रॅमकरिता 30 रुपये, 100 ग्रॅमकरिता 60 रुपये याप्रमाणे आकारले जातात. 100 किलो मसाला तयार करण्याकामी पाच हजार रुपयांचा खर्च होतो. धने, जिरे, लवंग, विलायची, मिरे, तेजपान, कलमी, बाजा, भेंडी इलायची, त्रिफळा, खोबरे अशा विविध घटकांचा मसाला तयार करण्याकामी उपयोग होतो. घरच्या घरी मिक्‍सरवरच दररोज सुमारे तीन किलो मसाला तयार होतो. विविध टप्प्यांवर समूहातील महिलांची मदत त्या कामी घेतली जाते. सद्यःस्थितीत स्थिर बाजारपेठ नसल्याने महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी असलेल्या प्रदर्शनात मसाला विकला जातो. कृषी विभाग व आत्मायंत्रणेमार्फत जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयांत दर वर्षी आयोजीत होणाऱ्या कृषी महोत्सवात गवईताईंच्या समूहाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पातूर तालुका कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, "आत्मा'चे तंत्रज्ञान व्यवस्थापक एम. यू. झांबरे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक रामेश्‍वर पाटील यांचे या समूहाला मार्गदर्शन लाभते आहे.

आरोग्याविषयी जाणीवजागृती

बाभूळगावात आता महिलांचे मोठे संघटन समूहाच्या माध्यमातून तयार झाले आहे. एका समूहात सरासरी दहा महिलांचा समावेश आहे. गावातील या समूहांची एकत्रित बैठक दरमहा होते. या बैठकीत सुमनताई सर्वांत ज्येष्ठ असल्याने मार्गदर्शन करतात. आरोग्याबाबत तेथे संवाद होतो. त्यासोबतच कौटुंबिक वादविवाद मिटविण्यासाठी त्या पुढाकार घेतात.

 

संपर्क : सौ.सुमन गवई :7776098892

स्त्रोत: अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate