অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बोब्बी

बोब्बी

(पून; क. इरई, किरिहोन्ने; इं. पूनस्पार ऑफ त्रावणकोर; लॅ. कॅलोफायलम एपेटॅलम; कॅ. वाइटियानम; कुल-गटिफेरी). हा सु. २०-३० मी. उंच, सदापर्णी वृक्ष ⇨ उंडण व ⇨ नागरी यांच्या वंशातील असून भारतात व श्रीलंकेत आढळतो. बोबी : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) कळी, (३) किंजमंडल, (४) फूल, (५) केसरदल, (६) फळाचा आडवा छेद.बोबी : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) कळी, (३) किंजमंडल, (४) फूल, (५) केसरदल, (६) फळाचा आडवा छेद. पश्चिम घाट, उ. कारवार, कोकण व म्हैसूर ते त्रावणकोरपर्यंत दक्षिणेस (सु. ३०० मी. उंचीपर्यंत) गर्द जंगलात आणि नद्या व ओढे यांच्या काठाने हा आढळतो. साल जाड व पिवळी; शाखा सोंडेप्रमाणे गोलसर व कोवळ्या; फांद्या चौधारी व गुळगुळीत; पाने साधी, उंडण व नागरीपेक्षा लहान; टोकाकडे खोलगट फुलोरा व त्यावरील पांढरी फुले त्यांच्याप्रमाणे पण लहान व प्रदलहीन (बिनपाकळ्यांची) असून ती डिसेंबरात व फळे मार्चमध्ये येतात. आठळीयुक्त फळ लहान व करवंदाएवढे आणि पिकल्यावर लाल होते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरीमध्ये (कोकम कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड टणक, लालसर, सागापेक्षा कठीण आणि टिकण्यास व वजनात मध्यम व पृष्ठभाग थोडा चिरणारा असतो; ते कापण्यास व रंधण्यास सोयीचे असून घरबांधणी, पूलबांधणी व इतर अभियांत्रिकी कामांस उपयुक्त असते; नावा, तेल घाणे वगैरेसाठीही हे वापरतात. सालीतून निघणारी राळ स्वच्छ पिवळी, ठिसूळ व गंधहीन असून भिन्न प्रकारच्या रंगकामात व कापडास ताठपणा आणण्यास उपयुक्त असते. ती वेदनाहारक व सूज कमी करणारी आहे; दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात. बियांचे तेल (४५ - ५०%) चर्मरोग व कृष्ठ यांवर गुणकारी असते. बियांचा फांट [विशिष्ट प्रकारे बनविलेला काढा; ⟶ औषधीकल्प] मधाबरोबर खरुज आणि संधिवात यांवर देतात.

 

लेखक - मु. का. महाजन

स्रोत- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate