स्त्री व पुरुष जननसंस्थांमध्ये खूप फरक आहे. पुरुष जननसंस्था मुख्यतः शरीराच्या बाहेर तर स्त्रीमध्ये ती शरीराच्या आत असते. त्यामुळे स्त्रीजननसंस्थेची तपासणी 'आतून'करावी लागते.
योनी, गर्भाशय व बीजांडकोश हे जननसंस्थेचे मुख्य भाग आहेत. तपासणी करताना दोन पध्दती वापरतात.
धातूच्या एका उघडमिट करू शकणा-या नळीने (योनिदर्शक) योनीची व गर्भाशयाची पाहणी करता येते.
योनिमार्गाच्या आतल्या त्वचेचा दाह होत असल्यास ती लालसर दिसते व पांढरट पदार्थ दिसतो. हा पांढरा पदार्थ अंगावरून जात असला, की आपण त्याला 'पांढरे जाणे'असे म्हणतो. यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे चिकट दह्यासारखा घट्ट पदार्थ जाणे. हा एक प्रकारच्या बुरशीमुळे येतो. दुसरा प्रकार म्हणजे पांढरा द्रवपदार्थ जाणे. याची बरीच कारणे आहेत. (पाहा : योनिदाह).
गर्भपिशवीचे तोंड पाहताना त्याचे छिद्र व सभोवतालची त्वचा पाहावी. जिला अद्याप मूल झालेले नाही अशा स्त्रीच्या पिशवीच्या तोंडाचे छिद्र लहान व गोलसर असते. बाळंतपणामुळे हे छिद्र थोडे मोठे व चपटे होते. छिद्राभोवतालची त्वचा व आवरण निरोगी असेल तर गुळगुळीत व स्वच्छ दिसते. नाहीतर ते खरबरीत व लालसर दिसते.
योनिदर्शक तपासणीनंतर डॉक्टर हाताच्या दोन बोटांनी (रबरी हातमोजा घालून) तपासतात. या बोटांनी व पोटावर ठेवलेल्या दुस-या मोकळया हातामध्ये गर्भाशयाचा आकार, दिशा-ठेवण, इत्यादी तपासता येते. याचबरोबर गर्भाशयास सूज किंवा दुखरेपणा आहे काय,बीजांडकोश व्यवस्थित आहेत की दुखतात, इत्यादी बाबी कळतात.
गर्भाशयाचा आकार पाहून गर्भ आहे का व असल्यास किती आठवडयांचा आहे हे ठरवता येते. पाळी चुकल्यानंतर गर्भ असेल तर एक-दोन आठवडयांतच गर्भाशय मोठे होऊ लागते. गरोदरपणात गर्भाशयाचे तोंड मऊ पडायला लागते.
ओटीपोटात गर्भाशयाची ठेवण तीन प्रकारची असते. हे तीन प्रकार म्हणजे गर्भाशय पुढे झुकलेले, मागे झुकलेले किंवा मधोमध असे असतात. पिशवी मागे झुकलेली असेल तर काही स्त्रियांमध्ये ओटीपोटात दुखण्याचीही तक्रार आढळते.
आतून तपासणी करताना शक्यतोवर पाळीचे दिवस टाळावे. तसेच तपासणीआधी लघवी केली नसल्यास तपासणी नीट होत नाही; कारण गर्भाशय हे भरलेल्या मूत्राशयामागे झाकले जाते.
तपासणीत सर्वसाधारणपणे योनिमार्गाच्या भिंती व पिशवीचे तोंड हे सर्व आत खेचलेल्या अवस्थेत असतात. वारंवार झालेल्या बाळंतपणानंतर किंवा उतारवयात हे खेचून धरणारे स्नायू सैल पडून या भिंतीही सैल होतात. योनिमार्गाशीच लघवीचा मार्गही संबंधित असल्याने अशा वेळी लघवी थोडी थोडी व हळूहळू होते. तसेच सैलपणा फार झाला तर पिशवीचे तोंड किंवा पूर्ण गर्भाशय बाहेर पडते. यालाच आपण 'अंग बाहेर पडणे' असे म्हणतो.
जननसंस्थेची गरोदरपणातली तपासणी हा एक वेगळा विषय म्हणून या पुस्तकात अन्य ठिकाणी घेतला आहे.
स्तनांची वाढ पाळी सुरू होण्याच्या (न्हाण येणे, वयात येणे) वयात सुरू होते व गर्भधारणेनंतर चांगलीच वाढ होते. ही वाढ स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्समुळे (अंतःस्रावामुळे) होते. प्रसूतीनंतर बाळाच्या पोषणासाठी ही तयारी चाललेली असते. मूल अंगावर पीत असताना साधारण दीड वर्ष होईपर्यंत हा वाढलेला आकार राहतो व मग कमी होतो. अंगावर पाजल्यानंतर हळूहळू स्तन सैल होतात व थोडेफार लोंबतात. अंगावर पाजण्याच्या काळात ब-याच वेळा दुधाच्या (निचरा न झाल्यास) गाठी तयार होतात व नंतर त्यात पू होतो. अशा स्तनात ताण, दुखरेपणा, गरमपणा वगैरे चिन्हे दिसून येतात. कधी ही गाठ फुटते व पू बाहेर पडतो. पू झाला असेल तर काखेतल्या गाठी सुजतात. हे गळू शस्त्रक्रियेने फोडून पूर्ण निचरा करणे चांगले.
हाताने दोन्ही स्तन चाचपून पाहिले तर सगळीकडे सारखाच मऊपणा आढळतो. घट्ट किंवा कठीण गाठी लागल्या तर मात्र लगेच तज्ज्ञाकडून तपासून घेतले पाहिजे. कदाचित कर्करोग असू शकेल. विशेषतः चाळीशीनंतर स्तनांची तपासणी वारंवार करावी हे चांगले. गाठ असेल तर वेळीच तपासून घ्यावे.
स्तन तपासताना बोंड व भोवतालची लालसर काळी त्वचाही तपासावी. मूल अंगावर पीत असताना त्याला दुखरेपणा, जखम असू शकते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/27/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...