অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मासिक पाळीच्या तक्रारी

मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी असू शकतात – अगदी छोट्या व किरकोळ समस्यांपासून दीर्घकाळच्या कटकटी आणि आजारपणापर्यंत. अशा विविध तक्रारींची माहिती येथे दिली आहे.

डिस्मेनोरिया

मासिक पाळीदरम्यान पेटके किंवा क्रँप येण्याला डिस्मेनोरिया म्हणतात. ह्याचे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे मासिक पाळीच्या वेदना होणे.
मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया. ओटीपोटाशी संबंधित कोणताही आजार नसतानाही, पाळीच्या सुरुवातीलाच, ओटीपोटाच्या खालच्या भागात पेटके येतात. प्रायमरी व सेकंडरी डिस्मेनोरियामधील फरक आहे तो येथेच कारण सेकंडरी डिस्मेनोरिया एंडोमेट्रियोसिस सारख्या विकृतिचिकित्से मधून उत्पन्न होणार्याक वेदनामय मासिक पाळीशी संबंधित असतो.

ही समस्या सुमारे ९० टक्के स्त्रियांमध्ये आढळते. गंभीर स्वरूपाचा डिस्मेनोरिया चालूच राहिल्यास त्यातून अनेक धोके उत्पन्न होऊ शकतात, उदा. कमी वयापासून पाळी येणे, ती दीर्घकाळ चालणे, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचाही वेदनामय मासिक पाळीशी संबंध असतो मात्र शारीरिक हालचाली व व्यायामाचा नव्हे. मासिक पाळीच्या वेदना मूल झाल्यानंतर कमी होतात ह्या लोकप्रिय समजुतीस शास्त्रीय आधार नाही.
गर्भाशयाच्या अत्याधिक आकुंचनाने, अत्याधिक प्रोस्टॅग्लँडिन्स अथवा इतर काही आजारांमुळे सेकंडरी डिस्मेनोरिया होऊ शकतो.

ऍमेनोरिया

मासिक पाळी न येणे म्हणजे ऍमेनोरिया. ह्याचेही प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरीमध्ये स्त्रीला अजिबात पाळीच येत नाही तर सेकंडरीमध्ये ती किमान ६ महिने येत नाही. गर्भारपण हे सेकंडरी ऍमेनोरियाचे मुख्य कारण असते.

मेनोरेजिया

पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात किंवादीर्घकाळ रक्तस्त्राव होण्यास मेनोरेजिया म्हणतात. अर्थात जास्त रक्तस्त्रावाच्या परंतु सर्वसामान्य पाळीपेक्षा हा वेगळा असतो. ह्याचा संबंध सात दिवसांपेक्षाही जास्त काळ चालणार्या् अथवा अत्याधिक रक्तस्त्रावाशी आहे. ह्यामुळे रक्ताच्या मोठ्या गुठळ्याही दिसू शकतात. गर्भाशयीन तंतुयुक्त पदार्थ (युटेराइन फायब्रॉइड्स) अथवा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे बरेचदा मेनोरेजिया होतो.

एंडोमेट्रियल कॅन्सर

हा गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग असतो. ह्यामध्ये योनीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. हा आजार गंभीर असला तरी आधीपासून लक्षात आल्यास त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात. हा साधारणतः इस्ट्रोजनचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा ५० पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो.

फायब्रॉइड्स

गर्भाशयाच्या भिंतीच्या स्नायूमध्ये आढळणार्या वाढीस फायब्रॉइड म्हणतात. ही वाढ उर्फ गाठी लहान-मोठ्या असू शकतात. काही स्त्रियांमध्ये हे लक्षण मुळीच आढळत नाही तर काही स्त्रियांना ह्यामुळे जास्त रक्तस्त्रावाची दीर्घकालीन पाळी येते. ह्यामुळे ओटीपोटात किंवा संभोगाचे वेळी दुखू शकते, सारखे लघवीस जावेसे वाटते किंवा पोट जड वाटते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. जास्त मुले असलेल्या किंवा ३५ पेक्षाजास्त वयाच्या स्त्रियांना फायब्रॉइड्सचा धोका जास्त असतो.

ओटीपोटात जळजळणे उर्फ पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज

पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज उर्फ PID हा स्त्रियांच्या पुनरुत्पादक अवयवांत आढळणारा एक जंतुसंसर्ग आहे. PID चे एक लक्षण म्हणजे योनीतील स्त्रावास घाण वास येणे. ह्याचप्रमाणे अनियमित पाळी किंवा संभोगाचे वेळी दुखणे हीदेखील लक्षणे आढळतात. लैंगिक आजारांशी संपर्क होणे हे PID चे सर्वदूर दिसणारे लक्षण आहे. हा गंभीर आजार असून त्याने फॅलोपिन टयूबला इजा होऊन भावी काळात गर्भ राहण्यास अटकाव होऊ शकतो.

पाळीपूर्वीची लक्षणे उर्फ प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम

पुष्कळशा स्त्रियांमध्ये ही लक्षणे पाळीपूर्वीच्या सात ते चौदा दिवसांमध्ये दिसू शकतात आणि कधीकधी ती पाळी सुरू झाल्यानंतरही टिकून राहतात. मात्र काही स्त्रियांना ह्याचा भरपूर मानसिक तसेच शारीरिक त्रास होऊ शकतो.

पाळीपूर्वीच्या लक्षणांचे निदान करणे

पाळीपूर्वीच्या लक्षणांचे निदान करण्यासाठी डॉक्टराना चाचण्याची एक मालिकाच योजावी लागते. ह्यामध्ये ओटीपोटाची, रक्ताची व अल्ट्रासाउंड तपासणी करतात. पाळीशी संबंधित एकदाच उद्भवलेल्या किंवा दीर्घकाळपर्यंत न उद्भवलेल्या समस्या ह्या चाचण्यांमधून कदाचित दिसून येतही नाहीत. नंतर केव्हातरी किंवा त्यांचे स्वरूप गंभीर झाल्यानंतरच त्या लक्षात येतात.

मासिक पाळीच्या समस्यांवर उपचार कसे करावे

मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, उदाहरणार्थ -

  • नियमित व्यायाम;
  • संतुलित आहार घेणे;
  • आहारात जास्तीचे लोह, कॅल्शिअम आणि ब जीवनसत्वाचा समावेश करणे (अथवा पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे);
  • मासिक पाळीच्या वेदनांसाठी पॅरासिटेमॉल घेणे;
  • गरम पाण्याची बाटली वापरणे

मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही उपाय करू शकता, उदाहरणार्थ.

  • विशिष्ट पूरक वनौषधी घेणे
  • आल्याचा चहा पिणे
  • जंगली सुरणासारख्या पेटके-विरोधी भाज्या खाणे ;
  • ओटीपोटावर लव्हेंडर तेल चोळणे;
  • रास्पबेरीच्या पाल्याचा चहा पिणे;
  • जिंक्गो हे पूरक औषध घेणे
  • विशिष्ट पुष्पौषधी (फ्लॉवर रेमेडीज्) घेणे
  • मसाज करून घेणे
  • ऍक्युपंक्चर करून घेणे

मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टर खालील प्रकारची औषधे घेण्यास सांगू शकतात

  • सूज-विरोधी
  • संप्रेरके बदलणे (हार्मोन रिप्लेसमेंट)
  • नियमित पाळीसाठी तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या

फायब्रॉइड्स किंवा कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार दिसून आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. ह्याप्रकारच्या बर्याआच समस्या किरकोळ असतात व फार काळजीचे कारण नसते. मासिक पाळीवर विविध घटकांचा परिणाम होत असतो आणि पाळीच्या सुरुवातीच्या काही समस्या शरीरास त्यांची सवय होईपर्यंतच टिकतात. अर्थात पाळीजास्त दिवस चालल्यास, अत्याधिक रक्तस्त्राव असल्यास अथाव रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate