অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाळंतपण

प्रस्तावना

बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणात आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो व दर हजार प्रसूतीमागे ३-४ माता मृत्युमुखी पडतात व अनेक आजारी होतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आई व बाळासाठी बाळंतपण निर्धोक करणे हे महत्त्वाचे आहे. बाळंतपण व्यवस्थित पार पडेल याची काळजी गरोदरपणापासूनच घ्यावी लागते.

बाळंतपण कसे होते याची माहिती घेऊ या.

साधारणपणे दिवस पूर्ण भरले की बाळंतपण होते. बाळंतपण सुरु झाल्याचे खालील चिन्हांवरून ओळखता येते.

बाळंतपणाची सुरुवात

१. पोटात नियमित कळा येणे  -: या कळा बरगड्यांच्या खाली पाठीवरून चालू होतात व ओटीपोटाकडे येतात. ठरावीक वेळाने त्या येतात व ओटीपोटात संपतात. पोटातल्या इतर दुखण्यांपासून त्यावेगळ्या आहेत हे कळते. शंका असेल तर एनिमा देतात. बाळंतपणाच्या खऱ्या एनिमानंतरही चालूच राहतात.

२. अंगावरून पांढरा द्राव (चिकटा) जाणे -: बाळंतपणाच्या सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडावरचा चिकट पांढरा भाग (चिकटा) सुटून बाहेर येतो आणि कधीकधी त्यात किंचित रक्ताचा अंश असतो. ही बाळंतपण सुरु झाल्याची महत्त्वाची खुण आहे.

३. गर्भाशयाचे तोंड उघडणे -: आतून तपासणी केली असता गर्भाशयाचे तोंड उघडले आहे किंवा बंद हे कळते. पहिलटकरणीत हे तोंड फक्त बाळंतपणाच्या वेळी उघडते. मात्र पुढच्या खेपेच्या मातांच्या बाबतीत हाताचे एक बोट जाईल इतका सैलपणा नेहमीच असतो. बाळंतपण चालू असेल तर गर्भपिशवीचे तोंड उघडायला लागते.

बाळंतपणाच्या आधीची धोकादायक लक्षणे

  • गरोदरपणात आनिमिया / अशक्तपणा असेल तर
  • आधीचे बाळंतपण सुरक्षित झाले नसेल तर
  • डिलीव्हरी आधी रक्तस्त्राव व्हायला लागला तर
  • अचानक कला बंद झाल्यावर
  • नाडीचा वेग वाढला तर
  • हाता-पायावर, चेहऱ्यावर सूज येत असेल तर
  • विश्रांती घेताना सुद्धा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर
  • आकडी येणे, नीट न दिसणे, उलटया, गंभीर स्वरुपाची डोकेदुखी
  • डिलीव्हरीच्या कळा १२-२४ तासांपेक्षा जास्त वेळ येत असतील तर त्यामुळे बाळ आत गुदमरू शकते.
  • डिलीव्हरीनंतर वार जर पूर्णपणे बाहेर आली नाही तर वार आत राहिली तरी जंतूसंसर्ग होऊ शकतो.
  • बाळंतपणानंतर न थांबणारा रक्तस्त्राव झाला तर
  • बाळंतपणा नंतर सतत ताप असेल तर
  • अति उच्च रक्तदाब इ.

जर बाळंतपण काही कारणांमुळे घरीच करावे लागणार असेल तर नर्सबाई, प्रशिक्षित दाई कडूनच बाळंतपण करून घ्यावे.

बाळंतपणाच्या आसपास आहार कसा असावा ?

बाळंतपणाच्या वेळी दवाखान्यात जाताना आहाराबद्दल काळजी घ्यावी. पोटभर मुळीच जेवू नये. अगदी थोडा, हलका-फुलका आहार घ्यावा. फळे, खीर, रसाहार घ्यावा. तेलकट, तुपकट काही खाऊ नये. कळा येण्याच्या वेळी उलटी होण्याची शक्यता असू शकते. भूल देण्याचा प्रसंग आला तर जेवण घेतलेले असल्यास त्रास होतो, हेही लक्षात असू दयावे.

बाळंतपणात कळा का येतात ?

बाळ आईचं गर्भाशय सोडायला लागले की, आईचे शरीर बाळाला बाहेर ढकलू लागते. या नैसर्गिक प्रक्रियेतूनच कळा निर्माण होतात. या कळा पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून येतात. कळा येत गेल्या की, गर्भाशयाचा वरचा भाग कठीण होत जातो व गर्भाशयाचे तोंड उघडले जाते.

बाळंतपणाच्या कळा कशा ओळखायच्या ?

बाळंतपणाच्या कला या बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास सुरु होतात. त्या सुरुवातीला १० ते १५ मिनिटाच्या अंतरा-अंतराने व पुढे पुढे लवकर लवकर येऊ लागतात. त्या पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून आतून येतात. पोटदुखीच्या वेळी जे पोट दुखते ते वेगळे असते. त्याच्या कळा अंतराअंतराने येत नाही. तसेच त्या वेदना पोटाच्या बाजूला असतात. हा फरक नीट लक्षात घ्यावा.

बाळंतपणाच्यावेळी कळा सुरु झाल्यावर वैद्यकीय मदतीची गरज केव्हा लागते ?

लघवी करताना त्रास होणे, अंगात जास्त ताप असणे, बेशुद्ध पडणे किंवा आकडी येणे, वर बाहेर पडण्यापूर्वी रक्तस्त्राव होणे, बाळंतपणाचा काळ १२ तासापेक्षा अधिक लांबणे. अशावेळी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काहीवेळा वरीलप्रमाणे त्रास होऊ शकतो.

 

स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate