नवजात अर्भकाचा मेंदू विकसनशील असतो. पहिल्या वर्षात मेंदूतल्या पेशींची संख्यावाढ आणि इतर विकास साधला जातो. दोन वर्षात मेंदूची वाढ पूर्ण होते, पण व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला वयाच्या विशीपर्यंत आकार मिळत राहतो. मानसिक वैशिष्टये घडण्यासाठी अनेक घटकांचा हातभार लागतो. हे घटक म्हणजे आनुवंशिकता, पोषण, आईवडिलांचे प्रेम व चांगली वागणूक, सभोवतालची सामाजिक परिस्थिती, इत्यादी.
मुलांना मानसिक वैशिष्टयांचा काही प्रमाणात वारसा असतो. मानसिक आजारही (विशेषतः गंभीर प्रकारचे) काही प्रमाणात आनुवंशिक असतात. पण सगळेच मानसिक आजार आनुवंशिक नसतात. मानसिक स्वास्थ्यासाठी पुढील इतर घटकांनाही महत्त्व आहे.
बालपणात आईवडिलांचे प्रेम मिळणे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. मूल प्रेमाने सांभाळणे, हिडीसफिडीस न करणे, त्याला समजून घेणे आणि समजावून सांगणे, मारझोड न करणे, शांतपणे शिकवणे, आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवायला शिकवणे, इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. लहानपणी असुरक्षितपणाची, भीतीची भावना राहिली किंवा प्रेम मिळाले नाही तर मुलांवर मानसिक दुष्परिणाम होतात. यांचे पडसाद पुढच्या आयुष्यात उमटतात. मानसिक दौर्बल्य,आत्मविश्वास नसणे, गुन्हेगारी स्वभाव हे काही अंशी अशा दुर्दैवी घरांमधून येतात. म्हणून'कुटुंब' ही संस्था मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
पहिल्या दोन वर्षात मेंदूच्या वाढीच्या काळात प्रथिने व उष्मांक योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. प्रथिनांचा पुरवठा कमी झाला तर मेंदूची वाढ कमी होते. विशेषतः बौध्दिक वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. कुपोषणाने तसे अनेक दीर्घकालीन परिणाम होतात. शारीरिक दुबळेपणाबरोबर मानसिक दुबळेपणा किंवा असंतुलित स्वभाव होण्याची शक्यता असते. कुपोषित मुलांची भविष्यात शारीरिक,मानसिक क्षमता कमी राहते.
सामाजिक विषमता, बेकारी, आर्थिक असुरक्षितता या सर्व गोष्टींमधून नैराश्य, आत्महत्त्येची प्रवृत्ती, आक्रमकता, गुन्हेगारी,मानसिक असंतुलन, इत्यादी अनेक मनोविकार निर्माण होतात. मानसिक आजार निर्माण होण्यामध्ये या घटकांचा मोठा वाटा आहे. शेतकरी आत्महत्या हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
कुपोषणाशिवाय इतर काही शारीरिक आजार मानसिक आजारांना कारणीभूत ठरतात. यांत मेंदूच्या आवरणाचा दाह, मेंदूसूज, मातेला गलगंड झाल्यामुळे संततीमध्ये बौध्दिक क्षमता कमी असणे, जन्माच्या वेळी किंवा अपघातात मेंदूला इजा व सिफिलिस यांचा समावेश होतो. अल्झायमरचा आजार हे एक दीर्घायुषीपणासमोर आव्हानच आहे.
दारू व इतर अंमली पदार्थाचे व्यसन हळूहळू मानसिक विकृती निर्माण करते. दारुचे व्यसन हे आपल्या समाजात मनोविकाराचे अगदी महत्त्वाचे कारण आहे. मानसिक आजारांची निर्मिती ही अशी अनेक गुंतागुंतीच्या कारणांमधून होत असते. यातला दोष त्या व्यक्तीबरोबर थोडासा समाजाचाही असतो हे लक्षात ठेवून मनोरुग्णांकडे पाहिले पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी ...
या व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता, तणा...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम कर...