कोळी, विशिष्ट कीटक, काही मासे यांमध्ये ध्वनिग्रहण हे कंपनाच्या प्रवेगाच्या अभिज्ञानावर (ओळखण्यावर) आधारित असते, तर बहुतेक सर्व प्राण्यांत कंपन मार्गामध्ये अडथळ्याने दाब निर्माण होऊन श्रवणक्रिया घडून येते. प्राण्यांच्या दोन गटांतील सदस्य ध्वनिग्रहण करू शकतात. उदा., संधिपाद प्राणी ( कीटक, खेकडे ) व पृष्ठवंशी प्राणी ( सरीसृप, पक्षी व सस्तन प्राणी ). अधिक आद्य प्राण्यांच्या जातींमध्ये श्रवणक्रियेमुळे प्राण्याला धोका, अन्नाचे ठिकाण, जोडीदार शोधणे शक्य होते, तर अधिकतम उच्च दर्जाच्या प्राण्यांत श्रवणक्रिया ही संदेशवहन व मनोभावना व्यक्त करण्याच्या कामी महत्त्वाचे कार्य बजावतात.
दुसऱ्या प्रकारचे ध्वनिग्राही म्हणजे सेरकल अंगे झुरळे व रातकिड्यांमध्ये आढळतात. त्यामध्ये असंख्य पक्ष्माभिका असतात व त्या १००३,००० हर्ट्झच्या पल्ल्यातील ध्वनितरंगांना संवेदनक्षम असतात.
कर्णपटल प्रकारचा अवयव ( अंग ) हा दाब प्रकारचा कान असून तो पतंग, नाकतोडे व एका प्रकारच्या सिकाडा कीटकात आढळतो. अनेक स्कोलोफोर कर्णपटल व कीटकाच्या वक्षाचा स्थिर भाग या दोहोंना जोडलेले असतात. जेव्हा ध्वनितरंगामुळे कर्णपटल हलते तेव्हा स्कोलोफोरांच्या प्रक्षेपकांच्या अक्षदंडांवर दाब वाढतो व स्कोलोफोर केंद्रीय तंत्रिका तंत्राकडे आवेग वाहून नेतो.
अस्थिमत्स्याच्या श्रवण यंत्रणेत एक वक्र संरचना ( लॅजिना ) असून त्यात मॅक्युला असतो. तो लघुकोशाला जोडलेला असतो. मॅक्युल्यात रोम कोशिका असतात. त्या कोशिकांच्या पक्ष्माभिका प्रक्षेपित असतात. पक्ष्माभिका कर्णाश्माला जोडलेल्या असतात. जेव्हा ध्वनिकंपने पाण्यातून जातात तेव्हा कर्णाश्म सोडून बहुतेक ऊतके कंपन पावतात व अशा रीतीने कर्णाश्म व पक्ष्माभिका यांच्या दरम्यान सापेक्ष गती ( हालचाल ) निर्माण करतात व त्यामुळे श्रवण रोम कोशिकांचे उद्दीपन होते. काही अस्थिमत्स्यांत रोम कोशिका उद्दीपनाची क्षमता खूपच वाढलेली असते. त्यासाठी कर्ण कुहराजवळ वायुकोश असतात. ऑस्टॅरिओफायसी या माशांच्या एका गटात वायुकोश नसतो, पण वाताशय व कर्ण कुहर यांच्याशी संलग्न द्रायुकोष्ठ यांचा परस्परांशी संबंध असतो. वेबरिअन अस्थिका म्हणून ओळखली जाणारी छोट्या हाडांची शृंखला ही हवेने भरलेला वाताशय व कोटर यांच्यामध्ये असते. ती कर्ण कुहराशी जोडलेली असते. कानांची संवेदनशीलता ही घन (कर्णाश्म किंवा वेबरिअन अस्थिका) व वायू (वायुकोश किंवा वाताशय) यांच्यातील अखंडपणामुळे वाढलेली (उच्च पातळीवर गेलेली) असते.
बहुतेक उभयचर प्राण्यांच्या ध्वनिग्रहणाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याला काही बेडूक अपवाद आहेत. बहुतेक सर्व बेडकांत कूर्चा बिंबांनी आच्छादिलेली त्वचा कर्णपटल म्हणून कार्य करते व हाडांचा एक पातळ स्तंभ वायूने भरलेल्या पोकळीतून विस्तार पावून कर्ण संपुटात जातो. तेच आंतरकर्णाचे अस्थिमत्स्य कोटर होय. अंडाकृती गवाक्ष व गोलाकार गवाक्ष ( खिडकी ) हे एकमेकांना जोडले जाऊन दोन भाग एकत्र जोडलेले असतात. जेव्हा कानाच्या पोकळीतून हालचाल वाहून नेली जाते तेव्हा पदिका ( स्टेप्स ) अंडाकृती गवाक्षाच्या विरूद्ध हालचाल करते. आंतरकर्णातील द्रायूमधून कंपने जातात व आच्छादक पटल उद्दीपित होते.
आंतरकर्णात आढळणाऱ्या दोन प्रकारच्या श्रवण रोम कोशिका ह्या सर्व उभयचरांतील अंकुरक होत व काही उभयचरांत आढळणारे आधार अंकुरक होत. ह्या संवेदी रोम कोशिका आच्छादक पटलाने उद्दीपित केल्या जातात.
संरचना व जटिलता या बाबतींत सरीसृपांच्या कानांमध्ये खूपच विविधता आढळते. बहुतेक सर्वच सरडयंच्या बाबतीत मध्यकर्णात दोन भागांची अस्थिशृंखला असून ती विस्तार पावून मध्य पटल व कर्ण संपुट तयार होते. कर्णशंबूक हा कर्ण कुहराचा श्रवण विभाग असून त्यात आधार पटलाचा समावेश होतो व तो अनेक जातींत बुध्न म्हणून ओळखला जातो. तो मधला जाडसर भाग होय. बुध्नावर श्रवण रोम कोशिका व आधार कोशिका असतात. ह्या कोशिका काही मध्यस्थ संरचनेने उद्दीपित होतात. तिने आच्छादक पटल जोडलेले असते.
बहुतेक पक्ष्यांतील श्रवण संरचना सरीसृपांसारखीच असते. आखूड बाह्यमार्ग म्हणजे द्वार कर्णपोकळीत जाते. ती बहुधा दोन पटलांची तयार झालेली असते. बाह्यपोकळी संरक्षणाचे काम करते. अस्थिशृंखला कीलांची बनलेली असते व बाह्य कील कर्ण संपुटात जाते. कर्णशंबुकामध्ये आधार पटल असते.
सस्तन प्राण्यातील कान ही उत्तम प्रकारे प्रभेदन झालेली संरचना आहे. बाह्य कर्ण पाळीचा बनलेला असतो, तो डोक्याला जोडलेला असतो व तो ध्वनितरंग एकत्रित गोळा करतो किंवा त्यांचे परावर्तन करतो. मध्यकर्णात तीन श्रवण अस्थी ( घणास्थी, ऐरणास्थी, पदिका ), कर्णपटल व कर्ण संपुट यांच्यामधील कोटर हवेने भरलेले असते. कर्णशंबूक हा कर्णपटलाचा श्रवण विभाग असतो. कर्णशंबूक बहुधा गोगलगायीच्या शंखाच्या आकाराचे असून त्याच्या आतील भागात आधार पटलामध्ये कोर्टी अंग असते. कोर्टी अंगात रोम कोशिका व आधार कोशिका असतात. आधार कोशिका अशा तऱ्हेने मांडलेल्या असतात की, त्यामुळे भिन्न कंप्रतांच्या ध्वनितरंगांमुळे विभिन्न तंत्रिका अगांचे उद्दीपन होते. अशा रीतीने सर्वाधिक विशेषित श्राव्य संदेश केंद्रीय तंत्रिका तंत्राकडे वाहून नेला जातो. कोर्टी अंगाचे आकारमान व त्यातील दैशिक रचना यांत सस्तन प्राण्यांच्या जातीपरत्वे फरक असतात व त्यामुळे विशेषीकरणाच्या प्रमाणात फरक पडलेला असतो.
वटवाघळांच्या ठिकाणी श्रवणाची शक्ती असाधारणपणे विकास पावलेली असते. प्रतिध्वनीच्या मदतीने ती लक्ष्याची स्थाननिश्चिती करतात. त्यामुळे त्यांना भक्ष्याचे अंतर, त्यातील अडथळे आणि स्थान यांचे अचूक ज्ञान होते. [⟶ वटवाघूळ].
पहा : कान.
जमदाडे, ज. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/6/2020
बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे.
कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला...
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कान...
आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञ...