অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाह्यकर्णाचे आजार

बाह्यकर्णाच्या त्वचेवर पुळी होणे आणि कान चिडणे

कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात. हे  लहान वयात विशेषकरून आढळते. अस्वच्छ सुईने कान टोचल्यावर ब-याच मुलांना हा त्रास होतो.

कधीकधी पुळी बाह्यकर्णाच्या आतल्या अरुंद भागात होते. अशा वेळी ती बाहेरून सहज तपासणीत दिसत नाही. अशा वेळी कान दुखतो व पुळी फुटल्यावर पू येतो. असा पू आल्यावर कानात पुळी असण्याची  शंका येणे साहजिक आहे. अशा वेळी कानातला पू स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने टिपून घ्यावा.  यानंतर  कानाची तपासणी करावी. ब-याच वेळा पुळीचे तोंड स्पष्ट दिसते. लहान मुलांच्या कानाची दिशा प्रौढांपेक्षा सरळ असते. म्हणून मुलांच्या कानाची पाळी  मागे ओढून प्रकाशझोत टाकल्यावर पडदा स्पष्ट दिसतो. फुटलेली पुळी नसल्यास 'पूपडद्यामागून म्हणजे मध्यकर्णातून येत असला पाहिजे.

प्रौढांच्या बाबतीत एका साध्या दुर्बिणीने  ही तपासणी करता येते.  या तपासणीत कानाच्या पडद्याला भोक आहे किंवा नाही याची खात्री करता येईल. पू बाह्यकर्णातून येत असल्यास मध्यकर्ण सुरक्षित आहे असा अर्थ असतो.

उपचार

बाह्यकर्णात पुळी असल्यास किंवा कान चिडला असल्यास कानात जंतुनाशक थेंब (दिवसातून तीन-चार वेळा) टाकावेत. याबरोबर पोटातून  (1) कोझाल आणि(2) ऍस्पिरिन या गोळया दिल्यास चार-पाच दिवसांत आराम पडेल. लहान मूल असेल तर ऍस्पिरिन ऐवजी पॅमॉल द्यावे. कोझाल ऐवजी ऍमॉक्सी हे औषधही चांगले असते. कान चिडलेला असल्यास वरील उपचाराबरोबरच रोज साबणाच्या कोमट पाण्याने धुऊन,कोरडा करून जंतुनाशक मलम लावावे.

होमिओपथी निवड

कल्केरिया कार्बहेपार सल्फमर्क्युरी सॉलपल्सेटिलासिलिशियासल्फर

कानाची बुरशी

बाह्यकर्णात पू किंवा जखम झाली असल्यास कधीकधी त्यावरच बुरशीची बाधा होते. अशा वेळी कान दुखतो व घाण वासही येतो. तपासल्यानंतर कानामध्ये कागदाच्या लगद्यासारखा करडया रंगाचा थर आढळतो. ही बुरशी असते. निस्टॅटिन नावाची बुरशीनाशक पावडर किंवा जेंशनचे औषध कानात बुरशीवर सोडावे. याने बुरशी आठ दिवसांत नष्ट होते. याबरोबर मूळ आजारावरही उपचार करणे आवश्यक आहे.

कानात मळ

आपल्या त्वचेत तेलकट द्रव पाझरणा-या ग्रंथी असतात. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. अशाच ग्रंथी कानातही असतात. त्यातून पाझरणा-या स्निग्ध पदार्थाचाच मळ तयार होतो. (या स्निग्ध पदार्थामुळे) कानात गेलेली धूळकचरा,त्वचेतून जाणा-या पेशीइत्यादी पदार्थ चिकटून एकत्र राहतात. त्यामुळे कान एकंदरीत स्वच्छ राहतो. काही जणांमध्ये मळ तयार होण्याचे प्रमाण जास्त असू शकते.

ब-याच व्यक्ती स्वत: अधूनमधून कानातला मळ काढून टाकतात. यासाठी पुढे गोल वाटीसारखा आकार असलेले 'कान कोरणेवापरले जाते. गोलसर भाग असल्याने याने सहसा इजा होत नाही. काडी किंवा पिन वापरणे मात्र धोक्याचे आहे. यात थोडी चूक किंवा अतिरेक  झाल्यास पडदा फूटू शकतो. काडीच्या टोकास कापूस गुंडाळल्यास इजा टळू शकते. कोरताना कान कोरणे किंवा काडी कानाच्या पडद्याला स्पर्श करताच कानात विशिष्ट संवेदना होते. परंतु कानातला मळ स्वत: काढून टाकताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना असे करू देणे निश्चितपणे धोक्याचे आहे.

आपल्या जबडयाच्या हालचालीमुळे कानातील मळ आपोआप बाहेर ढकलला जातो. पण काही जणांच्या बाबतीत मळ कानातच अडकून राहतो. अशा व्यक्तींना कानात मळ कडक होऊन कान दुखणेमळामुळे कान भरून ऐकू न येणेइत्यादी त्रास होतो. ऐकू न येणे - (विशेषत:लहान वयात) या तक्रारीमागे ब-याच वेळा कानातला मळ हे एक कारण असते. मळाचा रंग दाट तपकिरी किंवा काळा असतो. कानात प्रकाशझोत पाडून तो सहज ओळखता येतो. मळ काढण्याचा एक सोपा उपाय करण्यासारखा आहे. आधी एक-दोन दिवस कानात ग्लिसरीन किंवा लसूण घालून गरम केलेले खोबरेल तेल किंवा मळ मऊ करणारे कानाचे औषध 1-2 थेंब टाकावे. आपण जखमेवर वापरतो ते हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचे फसफसणारे औषध एक-दोन थेंब या कानात टाकले तर मळ लगेच मऊ होतो व सुटतो. सुटलेला आणि मऊ झालेला मळ सहज निघेल तेवढा काळजीपूर्वक काढून टाकावा. मळ आत कानाला किंवा पडद्याला घट्ट चिकटला असल्यास जोर लावू नये. त्यामुळे कानाला इजाच होईल. असा 'खडाझालेला मळ कानाच्या डॉक्टरने काढलेला बरा. यासाठी पाण्याच्या पिचकारीचा वापर केला जातो.

खडा होऊ नये म्हणून झोपताना कानात तेल टाकण्याची घरगुती पध्दत   अधूनमधून उपयुक्त आहे. लसूण घालून गरम केलेल्या खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब कानात टाकण्याची पध्दतही  चांगली आहे. पण रोज तेल टाकण्याची पध्दत अयोग्य आहे. यामुळे कानात बुरशीची लागण होऊन खाज सुटण्याची शक्यता असते.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate