অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मध्यकर्णाचे आजार

मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो

आकस्मिक कान सुजणे - कारणे

मध्यकर्णसूज हा आजार बहुतेकदा कान-नाक-घसा नळीतून (कानाघ नळी) येणा-या दूषित स्त्रावामुळे होतो. सर्दीपडसे किंवा घसादुखी यानंतर दोन-चार दिवसांनी कान दुखायला लागणे हे या आजाराचे नेहमीचे चित्र आहे. (मात्र दर वेळेस सर्दीपडशानंतर कान सुजतोच असे नाही). लहान वयात कानाघ नळी जास्त सरळ व कमी लांबीची असते. त्यामुळे मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात येतात. मध्यकर्णाचा जंतुदोष बहुधा 'पू' निर्माण करणा-या जंतूंमुळे होतो. सुरुवातीस कान गच्च होणे, जड होणे, मंद दुखणे, त्यानंतर ठणकणे, पडदा फुटून पू येणे व ठणका बंद होणे या क्रमाने हा आजार चालतो.

लक्षणे

काही वेळा ठणका लागून पडदा फुटण्याची पाळी न येता आपोआपही हा आजार थांबतो. कान फुटल्यावर चार-पाच दिवस पू वाहून कान कोरडा होतो. यानंतर कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येईपर्यंत 2-3 आठवडे त्या कानाने कमी ऐकू येते. लवकर बरा न झाल्यास कानात सूज व पू कायम राहतात. याने कान खराब होतो. लहान बालकांमध्ये या आजारात ताप, उलटया व कधीकधी जुलाब होतात. कान दुखल्याने मूल कानाकडे हात नेते.

उपचार

काही वेळा कानदुखी ही विषाणूंमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून

(अ) 5 दिवस कोझाल व मेझोल जंतुविरोधी गोळया द्याव्यात.

(ब) ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्या.

(क) दिवसातून 4-5 वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.

(ड) कोरडया स्वच्छ कापसाने कानातला पू दर दोन-तीन तासांनी टिपून घेण्यास नातेवाईकांना शिकवा. कापसाचा बोळा ठेवून तो भिजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे. नळीने पू शोषून घेता आले तर जास्त चांगले. यासाठी सलाईनच्या नळीचा टोकाचा भाग कापून वापर करता येई

(इ) चार-पाच दिवसांत पाणी/पू येणे न थांबल्यास किंवा दुखणे कायम राहिल्यास किंवा मेंदूसुजेची चिन्हे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना,चामोमिला, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल,नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

कानाची जुनाट सूज

काही जणांच्या बाबतीत फुटलेला कान पूर्णपणे बरा न होता परत परत कानदुखी-सूज येत राहते. यामुळे कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येत नाही. पडद्याचे भोक कायम राहते. हा कान कायमचा अधू होतो. यातही एक वाईट प्रकार म्हणजे मध्यकर्णाच्या मागे वरच्या बाजूला हाडाच्या पोकळीत सूज-गाठ कायम राहते. यातून हळूहळू मेंदूपर्यंत जखम-सूज वाढत जाते. या प्रकारात कानाचा पडदा भिंगाने तपासल्यावर तो वरची कड सोडून इतर भागात अखंड असतो. वरच्या कडेच्या बाजूला उघडी फट दिसते व त्यातून पाणी व घाण वास येत राहतो. या प्रकारात मेंदूसूज होण्याचा मोठा धोका असतो.

म्हणूनच कान फुटल्यावर दोन आठवडयांत पूर्ण बरा झाला नाही तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. तसेच आकस्मिक कानसूज झाल्यावर जंतुविरोधी गोळयांची पुरेशी मात्रा सात-आठ दिवस देणे कानसुजेच्या बाबतीत आवश्यक असते. उपचार मध्येच सोडल्यास कानातला जंतुदोष टिकून जास्त नुकसान होण्याचा धोका असतो.

- हाडसूज दीर्घकाळ चालणा-या मध्यकर्णाच्या सुजेचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे कानाच्या मागे असलेल्या हाडाच्या टेंगळामध्ये सूज पसरणे. या टेंगळावर दुखरेपणा आणि वेदना आढळल्यास जंतुविरोधी औषधांनी जोरकस उपचार करावे लागतात. मात्र तरीही आजार न थांबल्यास शस्त्रक्रिया करून त्यातला पू काढून टाकावा लागतो.

- धनुर्वात: कानदुखी, सूज यानंतर धनुर्वाताचा धोकाही असतो. कारण पूयुक्त जागी धनुर्वातातल्या जंतूंसाठी आदर्श परिस्थिती असते. हल्ली मात्र लसीकरणामुळे धनुर्वाताचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही हैड्रोजन पेरॉक्साईडच्या फेस येणा-या औषधाचे दोन थेंब कानात टाकणे केव्हाही चांगले.

- बहिरेपणा: मध्यकर्णाचा दाह व पू दीर्घकाळ चालल्यानंतर कानाचा पडदा व हाडांची ध्वनिवाहक साखळी यांत बिघाड होऊन बहिरेपणा येतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून पडदा व हाडांची साखळी यांची दुरुस्ती (शरीरातील इतर ठिकाणचे भाग वापरून) करावी लागते. ही शस्त्रक्रिया अवघड व खर्चीक आहे.

- ध्वनिशंखदाह: मध्यकर्णाच्या जुनाट आजारानंतर अंतर्कर्णापर्यंत सूज जाऊन ध्वनिकोष, शंख, इत्यादी नाजूक भागांचे नुकसान होते. यामुळे त्या कानापुरता बहिरेपणा येऊ शकतो. या बाबतीत काहीही उपाय करता येत नाही. अशावेळी मध्यकर्णाची शस्त्रक्रियाही निरुपयोगी ठरते; कारण ध्वनिसंदेशवहनाचे कामच बंद पडते.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate