অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोथ


शरीराच्या एखाद्या भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागला म्हणजे त्या भागाचा ‘कोथ’ झाला असे म्हणतात. कोथ होण्याला दोन कारणे अवश्य असतात : (१) रक्तप्रवाह बंद पडणे आणि (२) जंतुसंसर्ग.

कोथाचे दोन प्रकार आहेत : (१) शुष्क कोथ आणि (२) आर्द्र कोथ.

शुष्क कोथ

एखाद्या भागाच्या रोहिणीतील रक्तप्रवाह बंद पडला आणि नजीकच्या भागांतून रक्ताचा पुरवठा पार्श्व परिवहनाने (आजूबाजूच्या वाहिन्यांच्या शाखांमधून रक्तपुरवठा पुनश्च चालू होण्याने) होऊ शकला नाही, तर त्या भागाचा मृत्यू होता. अशा मृत भागांत मृतोपजीवी (कुजणाऱ्या पदार्थावर जगणाऱ्या) जंतूंची वाढ होते; त्या जंतूंच्या क्रियेमुळे मृत भागाचा रंग बदलतो. रोहिणी हळूहळू निरुंद होत गेली, तर त्या भागाचा रक्तप्रवाह हळूहळू कमी होत जातो; मृत भाग उघडा राहिल्याने त्यातील द्रवभाग उडून जाऊन तो भाग कोरडा पडतो; म्हणून त्याला ‘शुष्क कोथ’ असे म्हणतात. वार्धक्यात रोहिणी जाड होत जाते व त्यामुळे तीतून रक्त कमीकमी वाहू लागून शेवटी रक्तप्रवाह पूर्णपणे बंद पडतो; या कोथाला ‘वार्धक्यजन्य कोथ’ असे म्हणतात. रेनो रोग (हातापायांची बोटे यांसारखे अंत्यावयव आळीपाळीने फिके व निळे पडणे अशी लक्षणे दिसणारा रेनो या फ्रेंच शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा रोग) किंवा अरगट या औषधाचा वारंवार उपयोग झाला, तर रोहिणीचा संकोच होत जाऊन होणारा कोथही याच प्रकाराचा असतो. अतितीव्र थंडीमुळे होणाऱ्या ⇨ हिमदाहामुळेही शुष्क कोथ होतो.

शुष्क कोथ झालेला भाग वाळलेला, सुरकुतलेला असा दिसू लागतो. ग्रस्त भागात असलेल्या अवशिष्ट रक्तातील रंजकद्रव्यावर मृतोपजीवी जंतूंचा परिणाम होऊन तो भाग काळा दिसू लागतो. शुष्क कोथ हातापायांच्या बोटांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो कारण तेथील रक्तप्रवाहाला पार्श्व परिवहन नसते. रक्तप्रवाह जेथवर चालू असतो, त्या भागाची व ग्रस्त भागाची मर्य़ादा दर्शविणारी रेघ लाल रंगाची असून ती रेघ हळूहळू खोलवर जात जात ग्रस्त भाग वेगळा होऊन गळून पडतो.

आर्द्र कोथ

या प्रकारात ग्रस्त भागातील रोहिणीबरोबरच तेथील नीलेतील रक्तप्रवाह बंद पडल्यामुळे ग्रस्त भागात रक्त साठून राहते व त्या रक्तावर मृतोपजीवी जंतूंचा परिणाम होऊन दुर्गंधीयुक्त, लालसर रंगाचा पूमिश्रित द्रव पदार्थ वाहू लागतो. हा द्रव पदार्थ त्वचेखाली साठून राहिल्यामुळे तेथे भाजल्यावर उठतात तसे फोड दिसतात. रक्तातील रंजकद्रव्याचे रूपांतर होऊन तो भाग हिरवा, निळा काळसर दिसू लागतो. जंतूंच्यापासून विषारी पदार्थ उत्पन्न होऊन ते रक्तातून शरीरभर पसरल्यामुळे ज्वर आणि विषरक्ततेची (रक्त प्रवाहामध्ये विष मिसळल्यामुळे होणारी) इतर लक्षणेही दिसतात. हे विषारी पदार्थ फार प्रभावी असल्यास व्यक्तीचा मृत्यूही संभवतो. या प्रकारात मृत भाग निराळा दर्शविणारी रेषा उत्पन्न होण्याला वेळच मिळत नाही इतक्या झपाट्याने कोथाची वाढ होत जाते. हा प्रकार ⇨ आंत्रपुच्छशोथ (अ‍ॅपेंडिसायटीस), पाशग्रस्त वर्ध्म (तिढा पडलेला अंतर्गळ), फुफ्फुस वाहिनी क्लथन (फुफ्फुस वाहिनीतील रक्ताची गुठळी बनणे), मधुमेहजन्य कोथ वगैरे विकारांत दिसतो. तसेच अम्ल आणि क्षार (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणारे पदार्थ) यांसारख्या दाहक पदार्थांमुळेही होतो.

शय्याव्रण

फार दिवस निजून रहावे लागणाऱ्या अशक्त आणि रोगी माणसाच्या पाठीवर, टाचेच्या मागच्या भागात आणि श्रोणी भागात (धडाच्या शेवटी हाडांनी वेष्टित असलेल्या पोकळीच्या भागात) उत्पन्न होणारा व्रण (जखम) हा आर्द्र कोथाचाच एक प्रकार आहे. त्या भागातील अस्थी व शय्या यांमध्ये तो भाग दाबला जातो आणि तेथील रक्तप्रवाह बंद पडल्यामुळे ‘शय्याव्रण’ होतो. हा व्रण कित्येक वेळा खोलवर गेलेला असून त्याच्या तळाचे हाडही दिसू लागते.

वायु-उत्सर्गी कोथ

(वायू उत्पन्न होणारा कोथ ). हाही आर्द्र कोथाचाच एक प्रकार आहे. या प्रकारात जगण्यासाठी ऑक्सिजनाची जरूरी नसलेल्या मृतोपजीवी विशिष्ट जंतूंचा संसर्ग झाल्यामुळे जखमेला सूज येऊन ती झपाट्याने पसरत जाते. या जंतूंपासून दुर्गंधीयुक्त वायू तयार होतो. तो वायू त्वचेखाली आणि विशेषतः स्नायूमध्ये साठल्यामुळे त्वचा हाताला स्पंजासारखी लागते. ताप, ग्लानी, भ्रांती, वात वगैरे लक्षणे दिसू लागून त्वरित उपाय न झाल्यास मृत्यू येतो. युद्धजन्य जखमांमध्ये व रुग्णालयातील एका रुग्णाच्या संसर्गामुळे दुसऱ्या रुग्णात अशा तऱ्हेचा कोथ होतो.

चिकित्सा

प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे, प्रतिरक्षक रक्तरस (रक्त गोठल्यावर उरणारा पिवळसर न गोठणारा पेशीविरहित द्रव पदार्थ) शक्य तितक्या त्वरेने दिल्यास काही वेळा गुण येतो, परंतु ग्रस्त भाग शक्य तितक्या लवकर कापून काढला तरच रोगी जगण्याचा संभव असतो.

ढमढेरे, वा.रा.

आयुर्वेदीय चिकित्सा

वातभूयिष्ठ कोथ गंभीर वातरक्तामध्ये समाविष्ट होतो. वाताधिक्य असेल तेव्हा बोटे व संधी ही थंड व संकुचित होतात आणि काळा तांबडा (अरुण) असा रंग होतो. त्यावर थोडेथोडे शोध विशेषतः थोडा थोडा रक्तस्त्राव करणे जरूर असते. स्त्रोतस शोधन करणारी वातनाशके वातरक्तात द्यावी. हिरडा, तीळ, गूळ आणि बिब्बा ह्यांचा योग अतिशय उपयुक्त ठरला आहे. पित्तभूयिष्ठ किंवा सन्निपातज कोथ यांवर कुष्ठ रोगात सांगितलेले नागरसायन उपयुक्त होईल. वातरक्तात सांगितलेले क्षीर शतपाकी बलातेल इ. वयःस्थापन योगांचा उपयोग करावा. कडू कवठीचे (तुवरकाचे) तेल चांगले उपयुक्त होईल. कुष्ठ व गंभीर वातरक्तांचे दोषदूष्यांना अनुसरून आहारौषध, पान, लेप इ. उपचार करावे.

जोश, वेणीमाधवशास्त्री

पशूंतील कोथ

मनुष्यामध्ये आढळणारे शुष्क कोथ, आर्द्र कोथ, शय्याव्रण आणि वायु-उत्सर्गी कोथ हे सर्व कोथाचे प्रकार पशुंमध्ये आढळतात. त्यांची कारणमीमांसाही वर वर्णन केल्याप्रमाणेच असते. पशुंच्या काही संसर्गजन्य रोगांत वायु-उत्सर्गी कोथ प्रामुख्याने दिसून येतो.

रोहिणीतील रक्तप्रवाह बंद पडल्यामुळे होणारा शेपटीचा शुष्क कोथ गाडीचे बैल व रेडे यांमध्ये विशेषकरून दिसतो. गाडीवानाने शेपटी वाकडी तिकडी पिळल्यामुळे शेपटीतील रक्तवाहिन्यांना अपाय पोहोचतो व रक्तप्रवाह खंडित होतो. त्यापुढील शेपटीच्या भागाचा मृत्यू होतो. प्रदीर्घ आजार किंवा पायाचा अस्थिभंग झाल्यामुळे पडून राहणे भाग पडते अशा वेळी शय्याव्रण दिसतात.

पशूंमध्ये तारांचे तुकडे, खिळे, शेतीची अवजारे, जू व खोगीर यांमुळे होणाऱ्या जखमा नेहमीच आढळून येतात. जगण्यासाठी ऑक्सिजनाची जरूरी नसलेल्या विशिष्ट मृतोपजीवी जंतूंमुळे अशा जखमा दूषित होतात. तेथेच त्यांची वाढ होत राहते व ही होत असताना ते दुर्गंधीयुक्त वायू उत्पन्न करतात. जखमेच्या भोवताली त्वचेखाली वायू साचल्यामुळे जखम सुजल्यासारखी दिसते व सुजलेल्या भागावर बोटांनी दाबल्यास विशिष्ट चरचरणारा आवाज येतो, जखमेतून फेसाळ व दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो. अशा वेळी जखमेभोवतालच्या बऱ्याचशा भागाचा वायु-उत्सर्गी कोथ झालेला असतो. जंतूपासून उत्पन्न झालेले विषारी पदार्थ रक्तात मिसळल्यामुळे विषरक्ततेची लक्षणे दिसतात व काही वेळा २४ ते ४८ तासांत मृत्यू येतो.

कोथ झालेला भाग कापून काढणे, प्रतिजैव औषधे किंवा रोगकारक जंतुविरुद्धचा प्रतिरक्षक रक्तरस शक्य तितक्या लवकर दिल्यास गुण येतो. जखमांची काळजी घेणे व जंतुनाशकांचा वापर हे प्रतिबंधक उपाय आहेत.

 

गद्रे, य.त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate