परिफुप्फुसशोथाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात. (अ) तीव्र आणि (आ) चिरकारी (दीर्घकालीन). तीव्र प्रकारात (१) शुष्क परिफुप्फुसशोथ आणि (२) आर्द्र किंवा लसी-तंत्वात्मक परिफुप्फुसशोथ असे दोन उपप्रकार आहेत. शुष्क प्रकारात दाहयुक्त सूज येते आणि गुहेत द्रवसंचय नसतो तर आर्द्र प्रकारात द्रवसंचय हेच प्रमुख लक्षण असते. ज्या वेळी हा द्रव पू असतो त्या वेळी या विकृतीला पूयपरिफुप्फुस म्हणतात.
ही तीव्र स्वरूपाची विकृती बहुधा फुप्फुसाच्या न्यूमोनिया, विद्रधी (पूयुक्त पोकळी), क्षय, श्वासनलिकाविस्फार, अभिकोथ (रक्तपुरवठा कमी पडून ऊतकनाश-पेशीसमूहाचा नाश-होणे) किंवा मारक अर्बुद (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी व शरीरक्रियेस निरुपयोगी असणारी गाठ) यांसारख्या विकृतींचा दुय्यम परिणाम म्हणून उद्भभवते. प्राथमिक स्वरूपाचा शुष्क परिफुप्फुसशोथ बहुतकरून क्षयरोगजन्यच असतो. उदरगुहेतील यकृत विद्रधी, पर्युदरशोथ (उदरगुहेच्या पटलमय अस्तराची दाहयुक्त सूज) यांसारख्या विकृतींमुळे मध्यपटलाशी संलग्न असलेल्या परिफुप्फुसातही विकृती होऊ शकते. कधीकधी हा रोग व्हायरस संक्रामणाचा परिणाम असू शकतो. उदा., बॉर्नहॉल्म रोगातील (बॉर्नहॉल्म या डॅनिश बेटाच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या रोगातील) बी-कुक्सॉकी व्हायरसामुळे होणारी विकृती, मूत्रविषरक्तता (मूत्रातील घटकांचा रक्तात प्रवेश झाल्याने निर्माण होणारी अवस्था), तीव्र संधिज्वर यांसारख्या सार्वदेहिक विकृती या रोगाचे मूळ कारण असू शकतात. छातीवरील आघातही या रोगाचे कारण असू शकते.
छातीतील वेदना, ज्वर व खोकला ही लक्षणत्रयी बहुधा आढळते. खोकताना व श्वास खोल घेताना वेदना वाढतात. रोग्यास बोलण्याची व खोल अंतःश्वसनाची भीती वाटते. ज्वर साधारणपणे ३७.८0 से. ते ३८.३0 से. असतो. लक्षणत्रयीची सुरुवात एकदमच होते. खोकला कोरडा असतो. स्टेथॉस्कोपने छाती काळजीपूर्वक तपासल्यास ज्या जागी वेदना अधिक असतात त्या ठिकाणी 'परिफुप्फुस घर्षणध्वनी' (सुजलेल थर एकमेकांवर घासल्याने उत्पन्न होणारा विशिष्ट आवाज) ऐकू येतो. हे चिन्ह निदानात्मक स्वरूपाचे असते. ज्वर दोन दिवस ते एक आठवडा टिकतो. वेदना हळूहळू कमी होतात व रोगी दोन आठवड्यांत बरा होतो. पुष्कळ वेळा शुष्क प्रकाराचे आर्द्र प्रकारात रूपांतर होऊन गुहेत द्रवसंचय होतो. द्रवसंचयाबरोबरही वेदना कमी होतात. प्राथमिक स्वरूपाच्या विकृतीनंतर क्षयरोग उद्भवण्याचा नेहमी धोका असतो. तीव्र स्वरूपात तात्काळ करावयाच्या इलाजामध्ये छाती शेकणे, अँस्पिरिनासारखी वेदनाशामके देणे, खोकल्यावर कोडिनाचे चाटण देणे आणि प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देणे यांचा समावेश होतो. अज्ञानहेतुक शुष्क परिफुप्फुसशोथानंतर वर्षभर क्षयरोग प्रतिबंधक इलाज चालू ठेवणे, मधून मधून छातीची क्ष-किरण तपासणी आणि रक्ततपासणी करून घेणे हितावह असते. दुय्यम स्वरूपाच्या रोगात मूळ कारण शोधून त्यावर इलाज करतात.
आर्द्र परिफुप्फुसशोथ ज्या परिफुप्फुसशोथात परिफुप्फुस गुहेत द्रवसंचय झाल्याचे साध्या वैद्यकीय तपासणीत वा क्ष-किरण तपासणीत लक्षात येते त्या विकृतीला आर्द्र परिफुप्फुसशोथ म्हणतात.
कोणत्याही प्रकारच्या शुष्क परिफुप्फुसशोथाचे रूपांतर या विकृतीत होण्याची शक्यता असते. किंबहुना प्रत्येक आर्द्र परिफुप्फुसशोथ सुरुवातीस शुष्कच असतो. ज्या वेळी इतर सर्व अंतस्त्ये (छाती व उदरगुहेतील इंद्रिये) निरोगी असतात व या विकृतीस अज्ञानहेतुक संबोधितात त्या वेळी ती बहुतकरून क्षयरोगजन्य असते. सर्वसाधारणपणे न्यूमोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस आणि मायकोबॅक्टिरियम ट्युबर क्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू या विकृतीचे कारण असतात व त्यांपैकी ८० ते ९० % शेवटच्या सूक्ष्मजंतूमुळे (क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूमुळे) होतात. १५ ते ३५ वयोगटातील स्त्री-पुरूषांत ही विकृती सारख्याच प्रमाणात आढळते. चाळीशीच्या पुढे फुप्फुस, स्तन, जठर इ. अवयवांच्या कर्करोगाचा दुय्यम फैलाव म्हणूनही हा रोग उद्भवतो. स्त्रियांमध्ये क्वचितच अंडाशय अर्बुदाबरोबरच आर्द्र परिफुप्फुसशोथही आढळतो व या विकृतीला मेग्ज लक्षणसमूह (जे. व्ही. मेग्ज या अमेरिकन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून) म्हणतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर...
काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या म...
नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा बंबल बी या मधमाश्यांवर ...
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर ...