भारतीय वनस्पती सर्वेक्षण (बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या संस्थेची स्थापना दि. १३ फेब्रुवारी, १८९० मध्ये झाली. या संस्थेच्या स्थापनेस नुकतेच सव्वाशे वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ही संस्था कशासाठी स्थापन करण्यात आली, ही संस्था नेमके काय करते, अशा विविध बाबींसह या संस्थेची ओळख करून देण्याचा प्रयास या लेखातून केला आहे...
भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की, ज्यामध्ये मोठी भौगोलिक विविधता आढळते. उत्तरेकडे उत्तुंग बर्फाच्छादित हिमालय आहे, तर दक्षिणेकडे शेवटचे टोक असलेल्या कन्याकुमारीपर्यंत विशाल सागरी किनारा लाभलेला आहे. पूर्वेकडील भाग अतिपावसाचा आहे, तर पश्चिमेकडील प्रदेश वालुकामय आहे. मध्य भारतात अनेक पठारे, डोंगर-दर्या, गंगा-ब्रह्मपुत्रेचे खोरे, पश्चिम घाट असल्याने विविध वनस्पती आणि जंगलांनी समृद्ध असा हा भूभाग आहे. देशाअंतर्गत आणि बाहेरील देशांना भारतातील वनसंपदेचे अतिप्राचीन काळापासून आकर्षण होते. भारताचा अनेक देशांशी वनांवर आधारित व्यापार होता. अरब, तुर्की, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश व्यापारी वनांवर आधारित पदार्थांच्या व्यापारासाठी भारतात येत होते.
‘सजीव आणि शुष्क वनस्पती उद्याना’ची (हर्बेरियनची)कल्पना सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रत्यक्षात आली. उत्तर इटलीमध्ये या उद्यानाचा उपयोग वनस्पतींचे औषधी उपयोग यासंदर्भातील शिक्षणासाठी होऊ लागला. या शुष्क उद्यानात (हर्बेरियम) झाडांच्या विविध भागांचे वाळलेले नमुने (पाने, फूले इत्यादी) विशिष्ट पद्धतीने कागदावर चिकटवून ठेवले जात असत. सोबत त्याची सर्व शास्त्रीय माहिती, त्याचे उपयोग, स्थान अशा सर्व बाबींची नोंद ठेवली जात असे.
सन १५३४ मध्ये ‘गार्सिया दी ओर्टा’ (Garcia de Orta) हे नामवंत पोर्तुगीज डॉक्टर भारतात आले होते. त्यांनी स्थानिक वनस्पतींच्या औषधी उपयोगाची माहिती आणि नमुने संकलित केले. त्यांनी गोव्यातील आपल्या बागेत आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या औषधी वनस्पतींची रोपे तयार केली.
सन १५९९ मध्ये इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ (पहिली) हिने ब्रिटिश व्यापार्यांना भारतासोबत व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याची परवानगी दिली. त्याची परिणती कंपनी सरकारने भारतावर राज्य करण्यात झाली. वनआधारित उद्योग, त्यांचा उपयोग आणि त्या उद्योगांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवस्थापन करण्यासाठी निश्चित असे धोरण ठरविणे आवश्यक होते. असे धोरण ठरविण्याकरिता आणि भारताच्या या अमूल्य आणि वैविध्यपूर्ण अशा वनसंपदेचे सर्वेक्षण करण्याकरिता एखादी संस्था स्थापन करावी, या कल्पनेस चालना मिळाली. ज्याप्रमाणे पोर्तुगीजांनी भारतातील वने आणि वनस्पतींसदर्भात विविध उपक्रम राबविले, त्याप्रमाणेच ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या डॉक्टरांना मद्रासजवळील औषधी वनस्पती शोधण्याच्या कामास लावले. डॉक्टरांनी गोळा केलेल्या वनस्पतींची लागवड ब्रिटनमध्ये करण्याचा प्रयत्नदेखील ईस्ट इंडिया कंपनीकडून झाला.
सतराव्या शतकामध्ये मलबार येथील डच वसाहतीचे राज्यपाल ‘हेण्ड्रिक वॉन र्हीडे’ (Hendrik Von Rheede) यांनी स्थानिक वनस्पतींचा अभ्यास करून माहिती गोळा केली. तसेच त्यांनी स्थानिक वैद्यमंडळींना औषधी वनस्पतींची माहिती गोळा करण्यास उद्युक्त केले. त्यांनी शुष्क वनस्पतींच्या नमुन्याचा मोठा संग्रह केला. हेण्ड्रिक वॉन र्हीडे यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘हॉरटस मलबारिकस’ (Hortus Malabaricus) (१६७८-१७०३) हा १२ खंडाचा आणि ७९४ प्रतिमा समाविष्ट असलेला प्रबंध होय. भारतीय वनस्पती संपदेची सर्वांगीण माहिती देणारा हा प्रबंध आहे. स्विडिश वनस्पतीतज्ज्ञ कार्ल लिनिअस (Carl Linnaeus: 1707-1778) म्हणतो की, “हेण्ड्रिक वॉन र्हीडे यांचा ‘हॉरटस मलबारिकस’ हा ग्रंथ वनस्पतींविषयी अतिशय अचूक माहिती देणारे एक साधन आहे.”
१८ व्या शतकात म्हणजेच ब्रिटिशांचे भारतावर साम्राज्य निर्माण झाल्यानंतर भारतातील वनस्पती संग्रह करण्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. या काळात भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वनस्पती संपदेचा अभ्यास करून माहिती आणि नमुने संकलन करण्याकडे निरनिराळ्या संस्था वळू लागल्या. ईस्ट इंडिया कंपनीतील सेवकांनी यात मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
यात प्रामुख्याने डॉ. जोहन कोईंग (Dr. Johann Koenig), विल्यम रॉक्सबर्ग (William Roxburgh), फ्रेड्रिक हायेन (Friedrich Hayne), रॉबर्ट विग्ट (Robert Wight), डगलस कॅम्पबेल (Douglas Campbell), कार्ल पिटर थुनबर्ग (carl peter thunberg), डॉ. फ्रान्सिस बचनन-हॅमिल्टन (Dr. Francis Buchnan - Hamilton) आणि नॅथनिल अॅलिच (Nathaniel Wallich) यांचे योगदान उल्लेखनीय असे आहे. याच काळात वनस्पतींच्या अभ्यासाबरोबरच उद्यान शास्त्रास महत्त्व प्राप्त झाले. नवीन उद्यानांची उभारणी करून त्यात दुर्मीळ वनस्पतींची लागवड आणि त्यांचे जतन करण्यास सुरुवात झाली. कर्नल रॉबर्ट किड यांच्या शिफारशीनुसार, सन १७८७ मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने कोलकातामधील ‘सिबपूर’ येथे दुर्मीळ वनस्पतींचे उद्यान साकारले. स्थानिक लोकांमध्ये या उद्यानाची ओळख ‘कंपनी उद्यान’ म्हणून होऊ लागली. नंतरच्या काळात मुंबई, सहारणपूर, मद्रास आणि इतर ठिकाणीसुद्धा अशी दुर्मीळ वनस्पतींची उद्याने साकारली गेली. या सर्व उद्यानात स्वत:ची हर्बेरियम विकसित झाली. याच काळात औषधी उद्यान, वनोपयोग आणि संरक्षण यांच्या अभ्यासास एक अनिवार्य साधन म्हणून वनस्पती वर्गीकरण/नामावली (टॅक्सोनमी) पद्धती विकसित झाली.
१८५८ मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची सूत्रे इंग्लंडच्या राजघराण्याकडे गेली आणि सिबपुर उद्यानाचे नाव ‘रॉयल बोटॅनिक गार्डन’ असे झाले. १८७१ मध्ये ‘रॉयल बोटॅनिक गार्डन’चे प्रमुख म्हणून लेफ्टनंट कर्नल सर जॉर्ज किंग यांची निवड झाली. त्यांच्याच पुढाकारातून हर्बेरियमचा नव्या इमारतीत प्रवेश झाला. त्यावेळी पाच लाखांहून अधिक शुष्क नमुने संग्रहात होते. १८९७ मध्ये जेव्हा जॉर्ज किंग यांनी प्रमुख पदाची सूत्रे खाली ठेवली, तेव्हा हर्बेरियममधील नमुन्यांची संख्या दहा लाखांच्या वर गेली होती. त्यावेळी कंपनी सरकार उत्तर-पश्चिम पंजाब, सेंट्रल प्राव्ंिहन्सेस (जबलपूर, नागपूर, छत्तीसगड आणि नेरबुदा या विभागांनी बनलेले संस्थान), सेंट्रल इंडिया, राजपुताना, आसाम, बर्मा आणि अंदमान या भागातील वनसंपदेची माहिती गोळा करून वनस्पतींचा शोध घेत होते. आता वेळ आली होती, ती अशा एका मध्यवर्ती संस्थेची, जी सर्व उपलब्ध माहिती एकत्र करून वनस्पतींच्या संशोधनात, अभ्यासात एकसूत्रीपणा आणू शकेल.
अशा प्रकारची एक सर्वंकष संस्था स्थापन करण्याची योजना सरकारकडे सादर केली गेली आणि त्यास जुलै १८८७ मध्ये मान्यता मिळाली. दि. १३ फेब्रुवारी, १८९० रोजी सर्वेक्षण संस्थेची अधिकृत स्थापना झाली आणि त्याचे नामकरण ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ अर्थात ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण’ असे केले गेले. या नव्या संस्थेेच्या कार्यक्षेत्राची निश्चितीही त्याच काळात केली गेली. भारताच्या सर्व भागांतील वनसंपदेची माहिती, नमुन्यांचे संकलन करण्यासाठी संपूर्ण भारताच्या पूर्व, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण या चार विभागीय क्षेत्रात संस्थेची विभागणी केली गेली. पूर्वेस कोलकाता (सिबपूर), उत्तरेस सहारणपुर, पश्चिमेस (पुणे) आणि दक्षिणेस मद्रास येथे या संस्थेची केंद्रे उभारण्यात आली. कोलाकाता (सिबपूर) येथील उद्यानास ‘मध्यवर्ती केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले. सर जॉर्ज किंग यांनी मध्यवर्ती केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली.
वनस्पती सर्वेक्षणाच्या मौल्यवान वारशास १८ व्या, १९ व्या आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात नामवंत वनस्पतीशास्त्रज्ञ आणि निसर्ग अभ्यासकांचे मोलाचे योगदान लाभले. यामध्ये थॉमस हेन्री कोलेब्रुक (Thomas Henry Colebrooke), डॉ. एफ. फाल्कोनेर (Dr. F. Falconer) विल्यम ग्रिफीत (William Griffith), डॉ. फ्रान्सिस बचनन-हॅमिल्टन (Dr. Francis Buchnan-Hamilton), विल्यम रॉक्सबर्ग (William Roxburgh), नॅथनिल अॅलिच (Nathaniel Wallich), डेव्हेड प्रेन (David Prain), जे. एफ. डुथी (J. F. Duthie), आर. स्ट्रॅचे (R. Strachey), जे. इ. विंटरबॉटम (J. E. Winterbottam), डब्ल्यू. मूरक्राफ्ट (W. Moorcroft) आणि जे. एफ. रॉयल (़J. F. Royle) या सर्वांचा समावेश होता. ब्रिटिशांचे साम्राज्य असलेल्या दक्षिण आशिया, दक्षिण- पूर्व आशियातील देशांमध्ये जैविक संपदेचा शोध आणि त्याच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला जात होता. ब्रिटिश राजवटीमध्ये या शोधात आणि अभ्यासात लक्षणीय वृद्धी झाली होती.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय सीमांमध्ये मोठा बदल झाला. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी देशातील वनसंपदेचा सर्वंकष अभ्यास आणि त्याची नोंद करण्यास प्रथम प्राधान्य दिले गेले. या कामासाठी दि. १४ ऑक्टोबर १९५२ रोजी डॉ. इ. के. जानकी अम्मल यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक झाली. दि. १९ मार्च, १९५४ रोजी भारत सरकारने वनस्पती सर्वेक्षणाच्या आराखड्यास मंजुरी दिली आणि कोलकाता हे भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय म्हणून जाहीर केले. भारतातील वनस्पती संपदेचा शोध घेऊन त्यांचे शास्त्रीय आणि आर्थिक गुणांच्या आधारावर वर्गीकरण करणे या उद्देशाने ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण’ ही संस्था स्थापन करण्यात आली. कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेची १९५४ मध्ये पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार या संस्थेची काही नवी उद्दिष्टे ठरविण्यात आली. ती पुढीलप्रमाणे-
वनस्पती सर्वेक्षणाच्या कोलकाता येथील प्रधान कार्यालयाकडे असलेल्या कामाची प्रचंड व्याप्ती पाहून कामास गती देण्याकरिता चार विभागीय कार्यालये स्थापन केली.
विभाग |
ठिकाण |
स्थापना |
दक्षिण विभाग |
कोइंबतूर |
१० ऑक्टोबर, १९५५ |
पूर्व विभाग |
शिलाँग |
१ एप्रिल, १९५६ |
पश्चिम विभाग |
पुणे |
१२ डिसेंबर, १९५५ |
उत्तर विभाग |
डेहराडून |
१ ऑगस्ट, १९५६ |
केवळ वनस्पतींच्या माहिती संकलनापुरते मर्यादित न राहता वनस्पतींच्या प्लांट बायोलॉजीसंदर्भातील सायटोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, प्लांट केमिस्ट्री, सीड बायोलॉजी आणि इकॉलॉजी यांच्या अभ्यासासाठी डिसेंबर १९५७ मध्ये लखनऊ येथे मध्यवर्ती वनस्पती प्रयोशाळेची (Central Botanical Laboretory) स्थापना केली गेली. १९५७ मध्ये ‘रॉयल बोटॅनिक गार्डन’चे नामकरण ‘इंडियन बोटॅनिक गार्डन’ असे केले आणि ते पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या अधिपत्याखाली काम करू लागले. दि. १ जानेवारी, १९६३ रोजी या उद्यानाचे हस्तांतरण ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षणा’कडे करण्यात आले. कामाचा वाढता व्याप आणि देशातील वनस्पतींतील विविधता यामुळेकामास गती देण्यासाठी आणखी सात मंडळांची स्थापना केली. ती पुढीलप्रमाणेः
विभाग |
ठिकाण |
स्थापना |
सेंट्रल सर्कल |
अलाहाबाद |
१९६२ |
एरिड झोन सर्कल |
जोधपूर |
१९७२ |
अंदमान-निकोबार सर्कल |
पोर्ट ब्लेअर |
१९७२ |
अरुणाचल प्रदेश सर्कल |
इटानगर |
१९७७ |
सिक्कीम हिमालयन सर्कल |
गंगटोक |
१९७९ |
बोटॅनिक गार्डन ऑफ इंडियन रिपब्लिक |
नोयडा |
२००२ |
डेक्कन सर्कल |
हैद्राबाद |
२००५ |
देशाच्या आर्थिक विकासात व वनसंपदेच्या सर्वांगीण माहिती संकलनात भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे मोलाचे योगदान आहे अशा या संस्थेने आपली शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल नुकतीच १३ फेब्रुवारी २०१५ रोजी पूर्ण केली आहे.
लेखक : विजय देवधर / निवृत्त ग्रंथपाल
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे
संपर्क:- deodharvg@yahoo.co.in
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 8/23/2020
पाणथळ प्रदेशांचे मानवी जीवनातील स्थान सर्वांना सम...
वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्या विका...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या...