অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्ताभिसरण संस्थेचे आजार

रक्ताभिसरण संस्थेचे आजार

हृदयविकाराचा झटका, अतिरक्तदाब, इत्यादी आजारांबद्दल आपण ऐकलेले आहे. भारतातही या आजारांचे प्रमाण वाढत आहे.  हे आजार बहुधा सुखवस्तू समाजात जास्त असतात. युरोप, अमेरिका तसेच आपल्याकडच्या शहरी सुखवस्तू समाजात हृदयविकार हे मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. गरीब वर्गात सांधेहृदय ताप हा आजार जास्त महत्त्वाचा आहे. मात्र आता ग्रामीण भागातही अतिरक्तदाब व मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत आहे. या सर्व आजारांना प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. पण त्यांची पाळे मुळे समाजजीवनात, राहणीमानात आहेत. शरीर श्रमाची कामे, नियमित व्यायाम व साधा आहार (चरबीयुक्त आहार कमी खाणे) या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशी जीवनपध्दती आपण स्वीकारली तर या आजारांचे प्रमाण कमी होईल. आज आपण आरोग्यशिक्षण करणे व आजार लवकरात लवकर शोधणे एवढे महत्त्वाचे काम करू शकतो. सांधेहृदयताप,अतिरक्तदाब व हृदयविकार या तीन्ही आजारांचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. या प्रकरणात या संस्थेच्या काही निवडक आजारांची चर्चा केली आहे. शरीररचना,कार्य, इत्यादी तपशील पहिल्या प्रकरणातच दिला आहे.

हृदयस्वास्थ्यासाठी किलेशन उपचार

आपल्या शरीरात सर्वत्र रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे पसरलेले असते. वयोमानानुसार म्हणजे तिशीनंतर शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये रक्तातील चरबी, चुना तसेच आणखी काही सूक्ष्म धातू जमून रक्तप्रवाहात अडथळे येऊ लागतात. या अडथळ्यांमुळे हळूहळू शरीरात निरनिराळे आजार - अतिरक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, फुप्फुसांचे काही रोग इ. निर्माण होतात. (या आजारांची इतर पण कारणे आहेत. हृदयविकाराचा झटका आला तर हृदयातल्या धमन्यांतला अडथळा काढण्यासाठी तातडीचे उपचार करावे लागतात हे आपल्याला माहीत आहे. त्यात काही जैवरासायनिक एंझाईमचे इंजेक्शन, एंजिओप्लास्टी किंवा कधीकधी बायपास ऑपरेशन करावे लागते. शिवाय रक्त पातळ ठेवण्यासाठी औषधेही घ्यावी लागतात. तरीही अडथळे तात्पुरते दूर होतात पण आजार तसाच राहतो. शरीरातल्या इतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असतातच तसेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्येही कालांतराने परत अडथळे निर्माण होतात. डायबेटिस-मधुमेह, वारंवार ज्यादा खाणे, लठ्ठपणा, व्यायाम-कष्टाचा अभाव, मानसिक ताणतणाव, धूम्रपान आणि वाढते वय या सगळ्या कारणांमुळे रक्तवाहिन्यातले अडथळे वाढतच राहतात.

हे अडथळे काढून त्यातला कचरा बाहेर टाकण्याचा एक उपाय प्रगत देशात केला जातो. या उपचारात ईडीटीए व इतर काही द्रव्ये वापरून अडथळे विरघळून लघवीवाटे बाहेर काढले जातात. याला किलेशन असे नाव आहे. वैद्यकीय गरजेनुसार किलेशनचा उपचार केला तर असलेला आजार सौम्य होऊ शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे भविष्यातला आजार बर्याच प्रमाणात टाळता येतो.

किलेशनचा उपचार म्हणजे शिरेवाटे ग्लुकोज सलाईन मधून किलेशनचे औषध सोडणे. याच बरोबर काही जीवनसत्वे आणि आवश्यक मूलद्रव्ये दिली जातात. किलेशनच्या संपूर्ण उपचारांसाठी आठवड्यास दोनदा याप्रमाणे १०-२० वेळा उपचार केले जातात. हे उपचार प्रशिक्षित डॉक्टरच्या उपस्थितीत करावे लागतात. उपचार सुरू करण्याआधी व्यक्तीची संपूर्ण तपासणी, काही रक्त तपासण्या व किडनी ठीक आहे याबद्दल खात्री करावी लागते. हे उपचार योग्य काळजी घेतल्यास पूर्णपणे निर्धोक असतात. अनेक रुग्णांना याचे चांगले परिणाम लवकरच जाणवतात. जगभर हजारो रुग्णांनी याचा फायदा घेतला आहे. याबद्दल अनेक संशोधन लेख उपलब्ध आहेत. हृदयविकारावर तर पूरक उपचार पद्धती म्हणून पण याचा उपयोग होतो.

किलेशनचा उपचार मुख्यत: हृदयविकार टाळण्यासाठी किंवा तो झाला असेल तर पुढे परत होऊ नये म्हणून करावा.अतिरक्तदाब, छातीमध्ये वारंवार विशिष्ट वेदना होणे यावरही हे उपचार काही प्रमाणात उपयोगी पडतात. पक्षाघात म्हणजे मेंदूमध्ये रक्तवाहिन्यातले अडथळे येऊन मेंदूचा काही भाग निकामी होणे. यावरही ३ महिन्यांच्या आत किलेशन उपचार घेतल्यास बरे होण्याची शक्यता वाढते. तसेच ज्यांना पक्षाघाताचा धोका आहे अशा व्यक्तींनी हा उपचार प्रतिबंधक म्हणून करून घ्यावा असे तज्ज्ञांचा सल्ला आहे.

श्वसन संस्थेत रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यांमुळे जे आजार होतात त्यावरही किलेशन प्रभावी उपाय आहे. चालताना पायात वांब किंवा वेदना होऊन बसावे लागणे हाही रक्तवाहिन्यांचा विकार आहे, त्यावर किलेशन उपयोगी ठरू शकते. वरील सर्व आजारांमध्ये ६०-७०% रुग्णांमध्ये किलेशनचा उपाय बर्याच प्रमाणात यशस्वी ठरतो असे अभ्यास आहेत. मात्र काही लोकांना किलेशनचा उपयोग झाला नाही तर योग्य ते पुढील वैद्यकीय उपचार करून घेण्याचा पर्याय असतोच. म्हणूनच चाळीशीच्या वयानंतर, विशेषत: अतिरक्तदाब किंवा हृदयविकार असणार्या स्त्री-पुरुषांनी किलेशनचे उपचार करून घ्यावेत हे चांगले.

 

लेखक: डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ: आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate