অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पूयरक्तता

जंतुविषरक्तता

(पायेमिया). ज्या विकृतीत रक्तप्रवाहात पूयजनक सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होऊन त्यांचे पुंजके, दूषित अंतर्कील (जो रोहिणीत किंवा नीलेत अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पाडतो असा पदार्थ) किंवा संक्रामित अंकुर रक्तप्रवाहातून वाहताना छोट्या रक्तवाहिनीत अडकतात व त्या जागी नंतर विद्रधी (पूमय गळू) उत्पन्न करतात, त्या विकृतीला ‘पूयरक्तता’ म्हणतात. प्राकृतिक (सर्वसामान्य) अवस्थेत रक्तामध्ये हे पदार्थ कधीही नसतात. सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व प्रयोगशाळेतील रक्तसंवर्धन परीक्षेत सिद्ध झाल्यास त्या अवस्थेला जंतुरक्तता म्हणतात. जंतुरक्तता असलेल्या सर्व रोग्यांत पूयरक्तता असतेच असे नाही; परंतु पूयरक्तता असलेल्या रोग्यांत जंतुरक्तता निश्चितपणे असते. जंतुरक्तता लक्षणविरहित असू शकते; परंतु जंतुरक्ततेबरोबरच जेव्हा जंतूंच्या विषापासून उद्‌भवणारी विशिष्ट लक्षणेही दिसतात तेव्हा त्या अवस्थेला जंतुविषरक्तता म्हणतात.

पूयरक्तता या संज्ञेचा अगदी सोपा अर्थ ‘रक्तात पू होणे’ असा आहे. हा पू जेव्हा सूक्ष्मरक्तवाहिन्यांतून वाहतो तेव्हा त्यांमध्ये तो अडकून राहण्याचा संभव असतो. ज्या ठिकाणी असे सूक्ष्मजंतू अडकतात त्या ठिकाणी ते वृद्धिंगत होण्याची पराकाष्ठा करतात. परिणामी शरीरात निरनिराळ्या जागी विद्रधी तयार होतात. कधीकधी सांध्यातूनही विद्रधी तयार होऊन सांधा हळूहळू विसंघटित होतो. क्वचित वेळा हृद्‌स्नायू व मेंदू यांसारख्या महत्वाच्या अवयवांत विद्रधी तयार होऊन मृत्यू संभवतो.

प्रकार

पूयरक्ततेचे स्थानपरत्वे तीन प्रकार आहेत.

सार्वदेहिक

पू होत असलेल्या किंवा पू झालेल्या जखमा, अस्थिमज्‍जाशोथ, मध्यकर्णशोथ [® कान] यांसारखी मूळ विकारस्थाने असलेल्या ठिकाणापासून झालेल्या सूक्ष्मजंतुसंसर्गामुळे हा प्रकार उद्‌भवतो. विकारस्थानापासून निघणारे दूषित व क्लथित (साखळलेल्या) रक्ताचे छोटे छोटे तुकडे रक्तप्रवाहातून जाताना शरीरात कोठेही अडकून पडतात व तेथे विद्रधी तयार होतात. वृक्क (मूत्रपिंडे), अस्थी, सांधे वगैरे ठिकाणी विद्रधी होतात. या प्रकारची पूयरक्तता बहुधा पुंजगोलाणू (स्टॅफिलोकॉकस) व मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस) या सूक्ष्मजंतूमुळे उद्‌भवते. कधीकधी प्रमेह गोलाणू (गोनोकॉकस) व आंत्र दंडाणूही (बॅसिलस कोलाय) कारणीभूत असतात.

यकृत पूयरक्तता

प्रवेशिका नीला ही उदरगुहेतील आंत्रमार्ग (आंतड्याचा मार्ग), प्लीहा (पानथरी), अग्निपिंड आणि पित्ताशय या अवयवांतील अशुद्ध रक्त यकृताकडे वाहून नेते. या भागात कोठेही पूयजनक विकृती उत्पन्न झाल्यास, तेथून दूषित क्लथित रक्तभाग या नीलेच्या शाखांतून यकृतात वाहून नेण्याची शक्यता असते. ⇨ आंत्रपुच्छशोथ (ॲपेंडिसायटीस) आणि आंत्र-अंधवर्धशोथ (आतड्याच्या भित्तीमध्ये तयार झालेल्या व आतड्यात उघडणाऱ्या पिशवीसारख्या भागाची दाहयुक्त सूज) या विकृतींमध्ये यकृत पूयरक्तता होण्याचा अधिक संभव असतो. या प्रकारात इतर लक्षणांबरोबरच कावीळ आणि यकृतवृद्धी ही लक्षणे आढळतात.

रोहिणीवाहित पूयरक्तता

हृदयाच्या अंतःस्तरात सूक्ष्मजंतुसंसर्ग होऊन हृदंतस्तरशोथ (हृदयाच्या अंतःस्तरीय पटलाची दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो. त्या ठिकाणी वृद्धिंगत झालेले पूयजनक सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहात सहज प्रवेश करू शकतात. हृदयाच्या डाव्या बाजूस अशी विकृती असल्यास रोहिणीद्वारा वाहून नेले गेलेले सूक्ष्मजंतू शरीरात कोठेही विद्रधी उत्पन्न करू शकतात. हृदयाच्या उजव्या बाजूची अशी विकृती फुप्फुस किंवा परिफुप्फुस (फुप्फुसावरील पटलीय आवरण) या ठिकाणी विद्रधी उत्पन्न करते.

लक्षणे व निदान

थंडी भरून वारंवार ताप येणे, प्लीहा आणि यकृत यांची वृद्धी, तसेच ज्या अवयवांत विद्रधी तयार होतात त्यासंबंधी लक्षणे उद्‌भवतात. उदा., फुप्फुसातील विद्रधीमध्ये खोकला व पूमिश्रित कफ पडणे. पृष्ठभागाजवळील विद्रधी बहुतकरून वेदनारहित असतात. कधीकधी निरनिराळ्या जागी स्पर्शासह्य (स्पर्श केल्यास असह्य होणाऱ्या) वेदनायुक्त गाठी (विद्रधी) येतात. वेदनारहित विद्रधी रोगाची गंभीर अवस्था दर्शवितात व ती मुद्दाम लक्ष ठेवून शोधावी लागतात.

निदानाकरिता रक्तसंवर्धन परीक्षा उपयुक्त असते. तपासणीत घ्यावयाचे रक्त रोग्यास थंडी वाजत असताना किंवा त्यानंतर ताबडतोब घेतल्यास ५०% रोग्यांमध्ये विकृतीचे अस्तित्व दर्शविणारा निष्कर्ष मिळतो.

चिकित्सा

प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा वापर सुरू झाल्यापासून पूयरक्तता या विकृतीचे प्रमाण फार कमी झाले आहे. रक्त तपासून सूक्ष्मजंतूचा प्रकार कळण्यापूर्वीच म्हणजे पूयरक्ततेची शंका येताच बहुजीवरोधी (अनेक सूक्ष्मजंतूंविरूद्ध गुणकारी असलेले) प्रतिजैव औषधे उदा., एमॉक्सिसिलिन, जेन्टामायसीन वगैरे अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. जंतुप्रकार समजताच विशिष्ट गुणकारी प्रतिजैव औषधे ताबडतोब देतात, उदा., बॅक्टिरॉइडे (गोल टोक असलेले सूक्ष्मजंतू) आढळल्यास मेट्रोनिडॅझोल, क्लिन्डामायसीन व लिंकोमायसीन ही विशिष्ट औषधेच उपयुक्त असतात. पुंजगोलाणू संक्रामणाकरिता क्लोक्सासिलीन गुणकारी असते. रोग्यास रुग्णालयात ठेवणे हितावह असते. पुष्कळ वेळा रक्ताधान (बाहेरून रक्त देण्याची क्रिया) करावे लागते. विद्रधीकरिता योग्य त्या शस्त्रक्रियेचा उपाय करावा लागतो.

 

संदर्भ : Rains, A. J. H.; Ritchie, H. D., Ed. Bailey and Love's Short Practice of

Medicine, London, 1977.

अभ्यंकर, श. ज.; भालेराव, य. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate