किरणोत्सर्गामुळे होणारे कर्करोग
अणुप्रकल्पात काम करणा-यांना व शेजा-यांना अणुकिरणांपासून कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. या लोकांमध्ये इतर जनतेपेक्षा जास्त कर्करोग आढळतात. केरळमध्ये याबद्दल प्रकल्प नजीकच्या जनतेत खूप असंतोष आहे.
रासायनिक धोके
रासायनिक कारखाने आरोग्यदृष्टया सर्वात धोक्याचे असतात.या रसायनांचा शरीरावर हळूहळू परिणाम होतोच पण अपघातही होऊ शकतात. भोपाळ इथली विषारी वायू दुर्घटना हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रत्येक रसायनाचा विशिष्ट धोका असतो. याची माहिती देणारी पुस्तके मिळतात. कारखाना निरीक्षकांकडेही ही माहिती मिळू शकते. इंटरनेटवर आता अनेक प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते.
विशिष्ट धूळ/तंतू श्वसनसंस्थेत जाणे
काही कारखान्यांत विशिष्ट प्रकारची धूळ/तंतू हवेत तरंगत असतात. ही धूळ/तंतू सतत फुप्फुसात जाऊन आजार होतो. या आजारात मुख्यत: फुप्फुसांची श्वसनक्षमता कमी होणे,खोकला, इ. त्रास होतो. नंतर दम लागण्याचाही त्रास होतो. धूळ/तंतू श्वसनात जाण्याचे थांबेपर्यंत हा आजार क्रमाने वाढतच जातो. हे आजार क्षयरोगाप्रमाणे लक्षणे निर्माण करीत असल्याने अनेकांना क्षयरोगाचे उपचार केले जातात पण उपयोग होत नाही. धूळ-तंतूमुळे होणा-या फुप्फुसाच्या आजारांचे निदान करताना क्ष-किरण चित्रांचा चांगला उपयोग होतो.
धूळ-तंतूपैकी एक विशेष प्रकार म्हणजे ऍसबेस्टॉस पत्र्यांचा. ऍसबेस्टॉस सिमेंट पत्र्यांच्या कारखान्यात हे तंतू तरंगत असतात. हे तंतू फुप्फुसात कॅन्सर निर्माण करतात. यामुळे खोकला, खोकल्यात रक्त पडणे, दम लागणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे इ. लक्षणे दिसतात. क्ष-किरण चित्राने स्पष्ट निदान करता येते.
दगड खडी सिमेंट, कोळसा-खाण, पिठाच्या गिरण्या, हळद-कामगार या सर्व व्यवसायात फुप्फुसात धूळ जाऊन आजार होतात.
ध्वनिप्रदूषण
काही कारखान्यांत जास्त गोंगाट असतो. विशेषत: लोखंडाच्या वस्तूंच्या कारखान्यात विशेष ध्वनिप्रदूषण असते. ध्वनिप्रदूषणामुळे मेंदू व कानांवर परिणाम होतो. अस्वस्थता,चिडकेपणा, बहिरेपणा, इत्यादी त्रास होतो. बहिरेपणा वेळीच लक्षात येण्यासाठी खास श्रवणतपासणी करावी लागते. अशा कारखान्यांत कानात बसवण्यासाठी रबरी बुचे मिळतात ती कामगारांनी वापरणे आवश्यक असते. याचबरोबर आता वाहनांमुळेही ध्वनिप्रदूषण वाढले आहे. सार्वजनिक उत्सव हे ही ध्वनिप्रदूषण वाढवतात.