जळगावपासून १०० किलोमीटर तर बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)पासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर अंतुर्ली गाव आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून १९८३ मध्ये स्थापन झालेल्या येथील सहकारी दूध सोसायटीने अनंत अडचणींचा प्रवास पार केला. २७ वर्षांच्या या प्रवासात सोसायटी बंद पडण्याचे अनेक प्रसंग आले. जवळपास मरणासन्न अवस्थेत गेलेल्या या सोसायटीला १९९५ मध्ये प्रभावी स्थानिक तसेच "एनडीडीबी'चे अधिकारी, त्यांचे कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधून प्रगतीची दिशा मिळाली. फिनिक्स भरारी घेतलेल्या सोसायटीची वार्षिक उलाढाल आता एक कोटीपेक्षाही अधिक झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मात्र महाराष्ट्राच्या सीमेवरील व मध्य प्रदेशच्या लगत असलेले अंतुर्ली हे गाव! गावापासून अवघ्या काही अंतरावर तापी नदी वाहते. तापीतील मुबलक पाणी व सुपीक गाळामुळे हा प्रदेश सुजलाम् सुफलाम् बनला. केळीच्या लागवडीवरच येथील शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. अशातच जळगाव जिल्हा दूध संघ स्थापन झाल्यावर अंतुर्ली येथेही १७ मे १९८३ ला अंतुर्ली दूध उत्पादक सहकारी सोसायटीची स्थापना झाली. परिसरातील गोपालकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. यामुळे सुमारे हजार लिटर दूध संकलन सुरू झाले; परंतु जळगावला म्हणजे १०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करेपर्यंत दूध अनेकदा खराब होऊ लागले.
अर्थात त्याचा फटका दूध उत्पादकांना बसू लागला. खराब दुधाचे पैसे मिळत नसल्याने दूध उत्पादकांनी त्यांचे दूध खासगी ठिकाणी किंवा २० किलोमीटर अंतरावरील बऱ्हाणपूर येथे नेऊन विकण्यास सुरवात केली. याची परिणती सोसायटीतील दूध संकलन कमी होत जाऊन अखेर ती बंद पडण्यात झाली. संचालकांनीही अनेक वेळा सोसायटी सुरू करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. चांगदेव (मुक्ताईनगर) येथील कै. रामदास परशुराम महाजन यांनीही दूध संघाच्या संचालकपदी असताना बरेच प्रयत्न सुरू ठेवले होते.
जळगाव जिल्हा दूध संघ अनेक कारणांमुळे तोट्यात गेला. अखेर तो राष्ट्रीय दूध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) ताब्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यानंतर "एनडीडीबी'ने कडक पावले उचलत दूध उत्पादकांच्या सोयीचे अनेक निर्णय घेतले. त्याचा परिणाम म्हणून दूध संघाकडील संकलन पुन्हा वाढीस लागले. बंद पडलेल्या दूध सोसायट्यांच्या पुनरुज्जीवनासाठी योजना आखण्यात आली. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. यातीलच एक भाग म्हणून अंतुर्ली येथील सोसायटीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय झाला. त्यासाठी शरद महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम करण्याची तयारी दाखविली. "एनडीडीबी'च्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर सोसायटीच्या तत्कालीन संचालकांची बैठक घेऊन त्यांना याची कल्पना दिली. तसेच होतकरू तरुणांना यामध्ये संधी देण्याची विनंती केली. त्याचा मान राखत जुन्या संचालकांनी राजीनामा दिला व नवीन संचालकांची निवड झाली आणि अशारीतीने सोसायटीचे पुनरुज्जीवन झाले.
केवळ सोसायटीचे पुनरुज्जीवन करून मार्ग सुटणार नव्हता. कारण या मार्गात अनेक अडचणी, समस्या होत्या. त्याचे निराकरणही गरजेचे होते. दूध उत्पादकांचा कमी झालेला विश्वास संपादन करणे, त्यांना सोसायटीत दूध घालण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे होते. जळगाव हे ठिकाण लांब अंतरावर असल्याने संकलित दूध वाहतुकीत खराब न होण्यासाठी ५० कि.मी.च्या परिघात "एनडीडीबी'च्या साह्याने चिलिंग सेंटर उभारणे, गावातील खासगी व्यापाऱ्यांशी स्पर्धा असणे अशा अडचणी होत्या. याबाबत चर्चा झाल्यानंतर "एनडीडीबी'चे विभागीय अधिकारी दीपक रेलन (जे कालांतराने कार्यकारी संचालक झाले) तसेच दूध संकलन अधिकारी डॉ. सी. एम. पाटील, फैदपूरच्या चिलिंग सेंटरचे अधिकारी बी. के. पाटील यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे निश्चित केले. याविषयी शरद महाजन यांनी सांगितले, की सोसायटीच्या पुनरुज्जीवनानंतरही दूध संकलन फक्त २० लिटर होते.
गावात आमचे हसे होण्याची वेळ आली होती. अनेकदा सांगूनही पूर्वानुभवामुळे कोणीच दूध घालण्यास तयार होत नव्हते. मात्र सोसायटीच्या विकासासाठी पुढाकार घेतलेले हे सर्व अधिकारी नियमितपणे अंतुर्लीला येत होते. आमचा उत्साह व आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे प्रमुख काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर बैठकांमधून त्यांनी दूध उत्पादकांचाही विश्वास संपादन केला. दूध संकलनात वाढ होण्यासाठी ऊन-पावसाची पर्वा न करता ते आमच्यासोबत खेडोपाडी फिरले. दूरवरच्या पाड्यांवर राहणाऱ्या काठेवाडीकडेही दूध संकलनासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट त्यांना करावी लागली. खुद्द श्री. रेलन यांनी तर काठेवाडीशी त्यांच्या स्थानिक भाषेत बोलून त्यांना या प्रक्रियेत वळवून घेण्याचे महत्त्वाचे काम केले. या सर्व प्रयत्नांना अखेर यश मिळू लागले. सोसायटीचे दूध संकलन हळूहळू का होईना पण ८०० लिटरच्या पुढे जाऊ लागले. "एनडीडीबी'ने यापुढील महत्त्वाचा टप्पा पार करताना संचालकांना दूध सोसायटीचे काम कसे चालते, दूध संघाची कार्यप्रणाली व भवितव्य याची माहिती होण्यासाठी आणंद (गुजरात) येथे पाठविले. दूध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी स्वच्छ व फॅटयुक्त दुधाचे महत्त्व त्यातून संचालकांना समजले. एवढेच नव्हे तर दुधाळ जनावरांचे आधुनिक पद्धतीने संगोपन, व्यवस्थापन कसे करावे, शास्त्रोक्त गोठा कसा असावा, त्यात हवा, सूर्यप्रकाश यांचा प्रभावी वापर कसा करून घ्यायचा, हेही आणंदच्या प्रक्षेत्र भेटीत माहीत झाले. त्याचा वापर अंतुर्ली येथे आल्यानंतर झाला.
शरद महाजन यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. सोसायटीची प्रगतीकडे वाटचाल करण्यामध्ये त्यांचा वाटा महत्त्वाचा राहिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केवळ बोलत न राहता त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून इतरांना विश्वास दिला. सर्वाधिक दूध सोसायटीतच घालण्याचा पायंडा त्यांनी आजही कायम राखला आहे. दूध सोसायटीकडे सुरवातीला पुरेसा निधी नसल्याने शिपाई ठेवणेही शक्य नव्हते. तेव्हा तत्कालीन अध्यक्ष महाजन यांनी अनेक कामे करून आदर्श ठेवला. स्वच्छ दुधाची निकड ओळखून दुधाचे कॅन व अन्य भांडी स्वच्छ करण्यामध्येही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. रघुनाथ मोतीराम पाटील यांनी सचिव म्हणून काम करताना गावहिताचा विचार करून कोणतेही मानधन न घेता अनेक वर्षे मोफत काम केले. सर्वांच्या अशा प्रयत्नांमुळेच सोसायटी नावारूपाला आली.
शरद महाजन, ९४२१५६७१६३
अंतुर्ली दूध सोसायटीची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. गावात आता तीन दूध सहकारी सोसायट्या झाल्या असून, त्यामुळे सभासदांची व परिणामी दुधाची विभागणी झाली. त्यामुळे कधीकाळी एक हजार लिटरपर्यंत गेलेले संकलन आता रोज सरासरी ४०० लिटरच्या घरात आहे. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी डॉ. यू. के. पाटील यांचेही मार्गदर्शन त्यामध्ये राहिले आहे.
जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानेही अंतुर्ली दूध उत्पादक सहकारी सोसायटीचा "आत्मा' योजनेतून यथोचित सत्कार केला आहे. सोसायटीतील ५० सदस्यांना याच योजनेतून बारामती दूध संघ, इस्लामपूर (जि. सांगली), पुण्याजवळील चितळे फार्म व राहुरी येथील कृषी विद्यापीठात अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते, असे मुक्ताईनगरचे तालुका कृषी अधिकारी जे. डी. पाटील यांनी सांगितले.
अंतुर्ली सोसायटीत दरवर्षी एका संचालकाला एका वर्षासाठी अध्यक्षपद दिले जाते. तसा अलिखित पायंडाच पडला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून श्रीकृष्ण प्रकाश महाजन तरुण असल्याने त्यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा कायम आहे. जेणेकरून त्यांच्यापासून प्रेरणा मिळून इतरही तरुणांनी या व्यवसायाकडे वळावे, हाही त्यामागील उद्देश आहे. शासनाच्या विविध योजना असून त्यांच्या आधारे जनावरांची संख्या व पयार्याने दूध संकलनात वाढ करण्याचे काम सोसायटीने हाती घेतले आहे. स्टेट बॅंक यासाठी कर्जही देते.
- शरद महाजन, माजी अध्यक्ष, दूध सह. सोसायटी, अंतुर्ली प्रोत्साहनपर उपक्रम
पूर्वी दहा पर्यंतच फॅट लावला जायचा. मात्र "एनडीडीबी'च्या नूतन कार्यकारी संचालकांशी रवी महाने यांच्याशी चर्चा करून १२ पर्यंतच्या फॅटला पैसे देण्याचे मान्य करून घेतले. दूध संघातर्फे म्हशीला ३.८५ पैसे दराने प्रति फॅट दर मिळतो. त्यानुसार १२ चा फॅट लागल्यास उत्पादकाला प्रति लिटरला ४६.२० पैसे मिळतात. सोसायटीला स्वच्छ व दर्जेदार दूध पुरवठ्याबद्दल सलग तीन वर्षांपासून जिल्हा दूध संघाचे पारितोषिक मिळाले आहे. सर्वाधिक दूध घालणारे उत्पादक, सर्वाधिक फॅटचे दूध, स्वच्छ दूध यासाठी सभासदांना सोसायटीतर्फे प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात.
सकाळी ६ व संध्याकाळी ५ वाजेपूर्वी दूध घालणाऱ्या सभासदांना प्रति लिटर एक रुपया जास्तीचा दर दिला जातो. ताकाचे उत्पादन व विक्रीचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. सोसायटी दरवर्षी जिल्हा दूध संघ व इंडिया जीन यांच्या सहकार्याने वांझ जनावरांची तपासणी करून आहारात योग्य बदल सुचव कृत्रिम रेतनाने ती भरवून घेते. लहान तसेच मोठ्या जनावरांसाठी जानेवारीत लाळ्या खुरकूत, घटसर्पासाठी लसीकरण मोहीम, जंतनाशक गोळ्यांचा पुरवठा केला जातो. हे उपक्रम दूध संघातर्फे अनुदानित तत्त्वावर राबविले जातात.
श्रीकृष्ण महाजन, अध्यक्ष, दूध सह. सोसायटी, अंतुर्ली
दुग्धोत्पादन हा फायदेशीर पूरक व्यवसाय ठरला आहे. आमच्या गावात बागायती पिके घेतली जातात. जनावरांसाठी खास वैरणीचा चारा मात्र कोणी घेत नव्हते. या व्यवसायाकडे वळलेल्यांनी आता ती कसर भरून काढली आहे. परिणामी केवळ केळी पीक होणाऱ्या जमिनींमध्ये पीकबदल झाला आहे. जनावरांची संख्या वाढवून दूध नफा वाढीकडे अधिक लक्ष द्यावयाचे आहे.
- भागवत महाजन, संचालक, दूध सह. सोसायटी, अंतुर्ली
-------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
बिहारमधील सूरजपूर गावामध्ये 200 पैकी 140 घरांमध्ये...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...