कुक्कूटपालन हा तसा पारंपरिक व्यवसाय! भारताची आर्थिक नाडी जशी कृषीवर आधारित आहे. तशी ग्रामीण भागात कृषीपूरक जोड म्हणून कुक्कूट पालन व्यवसायावर ग्रामजीवनाची आर्थिक नाडी बेतलेली असते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ सातारचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडाळा तालुक्यातील 7 गावांमध्ये गिरीराज कोंबडी पालनाचा प्रकल्प राबवून तेथील 186 महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे. परसबागेतील या कोंबडी पालनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी चांगला आर्थिक रोजगार निर्माण झालेला आहे.
देशी कोंबड्यांना व त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी असल्याचे दिसून येते. सातारा जिल्ह्यात परसबागेतील देशी तसेच गिरीराज या कोंबडीपालनास चालना देण्याच्या दृष्टीने आत्मा सातारने लाभार्थी महिलांशी चर्चा करुन हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारच्या प्राप्त अनुदानातून राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. प्रकल्पामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिके याबाबींचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पामध्ये प्रशिक्षण या बाबीवर विशेष भर देण्यात आला, जेणेकरुन अशा स्वरुपाच्या नवीन विषयाबाबत महिलांना सांगोपांग माहिती मिळेल. प्रशिक्षणासाठी या महिलांना गोंदवले ता. माण, जि. सातारा येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडी पालन प्रकल्पांच्या ठिकाणी नेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांना देशी कोंबड्यांच्या संगोपनाबाबत एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
एक दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल व निगा राखणे, प्रथमोपचार इ. बाबत सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांना प्रात्यक्षिक स्वरुपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची प्रत्येकी 50 पिले देण्याचे नियोजन करण्यात आले. तथापि पिलांच्या सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत ती लहान असल्यामुळे त्यांना मांजर, घार, कुत्रा इ. प्राण्यांपासून असलेला धोका विचारात घेऊन संरक्षणासाठी लोखंडी खुराड्यांची गरज असल्याचे लक्षात आले. महिलांनी स्थानिक कारागिराकडून लोखंडी खुराडी तयार करुन घेतली. या खुराड्यांचे आकारमान 5 फूट लांब, 2.5 फूट रुंद व 3.5 फूट उंच अशा प्रकारचे आहे. अशा खुराड्यासाठी प्रत्येकी 2 हजार 800 इतका खर्च आला व तो सहभागी महिलांनी केला.
लाभार्थी महिलांना दोन आठवडे वयाची व लसीकरण पूर्ण झालेली पिले प्रत्येकी 50 या प्रमाणे देण्यात आली. पिले दिल्या दिल्या त्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थीस 25 किलो पिलांचे खाद्य (chick mash) देण्यात आले. तद्नंतर खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महिलांना स्थानिक पद्धतीने मका, गहू, ज्वारी, बाजरी इ. धान्याचा उपयोग करुन खाद्य तयार करण्याबाबत पंचायत समिती सातारा येथील पशूधन विकास अधिकारी रुपाली अभंग यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
महिलांनी पिलांचे संगोपन काळजीपूर्वक केल्याने मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहिले. प्रकल्पास आत्मा सातारा, कृषी विभाग व पशूसंवर्धन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी सातत्याने भेट देऊन महिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 3 महिन्यांच्या कालावधीत पिलांचे सरासरी वजन दीड किलो झाले. या प्रकल्पास राज्याचे तत्कालीन पशूसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हा प्रकल्प अतिशय उत्कृष्टपणे राबविला असल्याबाबत अभिप्राय दिला. तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व महिलांचे अभिनंदन कले. अशा प्रकारचे नियोजनबद्ध व नाविण्यपूर्ण प्रयोग इतर ठिकाणी राबवले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, कृषी उपसंचालक विकास बंडगर, कृषी उपसंचालक प्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रदीप देवरे यांनी सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी, रेणावळे, शिंदेवाडी व आरफळ या चार गावांमधील 115 लाभार्थ्यांसाठी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महादेव माळी यांनी वाई तालुक्यातील केंजळ आणि पसरणी या दोन गावांमधील 46 लाभार्थ्यांसाठी तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोमनाथ गवळी यांनी खंडाळा तालुक्यातील अंदोरी या गावामधील 25 लाभार्थ्यांसाठी आवश्यक ते परिश्रम घेतले. सातारा, खंडाळा व वाई या तीन तालुक्यांमधील या प्रकल्पासाठी लाभार्थ्यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि अभ्यास दौरे यासाठी अनुक्रमे तीन लाख 625, एक लाख तीन हजार 700 आणि 64 हजार 375 असा एकूण चार लाख 68 हजार 700 इतका आत्माच्या माध्यमातून खर्च करण्यात आला आहे. तर पिल्लेवाटप आणि खाद्य वाटप यासाठी तीन लाख 31 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यात 115 लाभार्थी महिला, वाई तालुक्यात 46 लाभार्थी महिला तर खंडाळा तालुक्यातील 25 लाभार्थी महिला अशा एकूण 186 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गिरीराज या कोंबड्या चांगल्या प्रमाणात दररोज अंडी देतात. या अंड्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली असून सहा रुपये किंमतीप्रमाणे त्याची विक्री करण्यात येते. तर गिरीराज कोंबड्यांना 500 ते 800 रुपयांप्रमाणे त्यांच्या वजनाप्रमाणे दर उपलब्ध होत आहेत. सर्व खर्च वजा जाता प्रती महिना सरासरी दोन ते दोन हजार 500 रुपये या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना मिळत आहेत. तसेच अन्य लाभार्थ्यांसाठी प्रती पिल्ले 20 रुपये प्रमाणे विक्रीतूनही आर्थिक फायदा होत असल्याचे दिसून आले. जोडधंदा म्हणून हा प्रकल्प अतिशय उत्तम आहे. देशी कोंबड्याचे संगोपनदेखील यामुळे होत आहे.
या प्रकल्पातील चार किलोपर्यंत वाढ झालेला गिरीराज कोंबडा कराड येथे झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वांचे आकर्षण ठरलेला होता. एकूणच काय ग्रामीण भागातील महिलांचे आत्माच्यावतीने आता सक्षमीकरण करण्यात येत असून परसातील कोंबडी पालनाने ग्रामीण भागातील विशेषत: महिलांसाठी आर्थिक रोजगाराचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.
लेखक - प्रशांत सातपुते
माहिती अधिकारी, सातारा
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/27/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडीपालन चांगला रोजगार ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...