অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंत


जंत होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात तर 80-90 टक्के मुलांच्या पोटात जंत असतात. माणूस खातो त्यातले बरेच अन्न त्याच्या पोटातले जंत खाऊन टाकतात. त्यामुळे बरेच लोक अशक्त, कुपोषित होतात.

जंतांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक मुख्यत: पचनसंस्थेत वाढणारे तर दुसरे यकृत, स्नायू वगैरे इतर ठिकाणी वाढणारे. पण सर्वसाधारणपणे पचनसंस्थेत वाढणा-या जंतांनाच जंत म्हणण्याची पध्दत आहे. या प्रकरणात आपण फक्त पचनसंस्थेच्या जंतांबद्दल शिकू या.

आपल्या देशात पचनसंस्थेच्या जंतांचे मुख्य प्रकार चार-पाचच आहेत. या सर्व जंतांची अंडी विष्ठेतून सगळीकडे पसरतात. या अंडयांतून सूक्ष्म कृमी बाहेर पडून तोंडावाटे अथवा त्वचेवाटे (पावलातून) परत नवीन माणसाला जंताची बाधा होते. यांतले काही जंत त्यांच्या जीवनचक्रात रक्तावाटे फुप्फुसात येतात.  त्यामुळे खोकला येतो.

या सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा होत नाही. म्हणून जंतांचे उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे. घरोघरी सुरक्षित संडास हाच यावरचा खरा उपाय आहे.

लक्षणे व चिन्हे

मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. वाढ खुंटू शकते.

- पोटात बारीक दुखत राहणे.

- पातळ जुलाब होणे किंवा शौचास साफ न होणे किंवा उलटया होणे.

- कधी कधी मोठे जंत खूप झाल्याने आतडयाची वाट बंद होऊन उलटया व पोटदुखी होऊन, मृत्यू येऊ शकतो.

- यांपैकी आकडेकृमी आतडयातून रक्त शोषतात. त्यामुळे रक्तपांढरी (ऍनिमिया) होते.

- काही प्रकारच्या कृमींमुळे गुदद्वाराजवळ खाज सुटते. (कारण बारीक कृमी अंडी घालायला गुदद्वाराशी येतात)

उपचार

तात्पुरता उपचार म्हणून जंत पडून जाण्यासाठी औषध द्यावे. जंतांवर बेंडझोल गोळया गुणकारी आहेत. डोस  दिवसातून दोन गोळया याप्रमाणे तीन दिवस. अलबेंडा औषध याच जातीचे आहे. पण त्याची एकच गोळी किंवा औषध डोस पुरतो. बेंडाझोल पेक्षा हे थोडे महाग पडते. या गोळयांबरोबर एरंडेल, त्रिफळा चूर्ण किंवा तसेच एखादे रेचक द्यावे, म्हणजे जंत बाहेर पडतात.

याच प्रकारे एक - दोन आठवडयानंतर परत उपचार करावा. मात्र अस्वच्छतेमुळे काही काळानंतर जंत परत होतात. मुलांची नखे वारंवार कापणे हे प्रतिबंधासाठी आवश्यक आहे.

मांसाहारामुळे होणारे जंत

डुक्कर किंवा गाय या प्राण्यांचे मांस नीट न शिजल्यामुळे  विशिष्ट प्रकारचे लांब जंत (टेप कृमी) आतडयामध्ये तयार होतात. डुकरे व गायी माणसाची विष्ठा खात असल्याने गाय, डुकरे यांच्या शरीरात (मांसात) जंत तयार होतात.

मांस कुकरमध्ये चांगले शिजवणे हाच यावरचा हमखास प्रतिबंधक उपाय आहे.

टेपकृमीवर 'प्राझीक्वांटेल' गोळीचा एकच डोस पुरतो. हे प्रभावी औषध आहे.

जंत/ लक्षणे - पोटदुखी, खोकला खाज

आयुर्वेद

लहान मुलांना जंत होऊ नये म्हणून वावडिंगाचा वापर करावा. लहान मुलांसाठी दूध तयार करताना त्यात वावडिंगाच्या बिया उकळून ते दूध द्यावे. वरचा आहार चालू करताना म्हणजे सहा महिन्यांनंतर पाच बिया वापराव्यात.  दोन वर्षापर्यंत वाढवत 25 बियांपर्यंतन्यावे. याचा अर्थ असा, की दिवसभराच्या द्यायच्या वरच्या दुधात5 ते 25 बिया वापराव्यात. बिया दोन-तीन  तास आधीच भिजवून ठेवल्यावर त्याचे सत्व दुधात लवकर मिसळते.

याऐवजी तयार विडंगारिष्टही वापरता येईल. विडंगारिष्ट अर्धा ते तीन चमचे दिवसातून दोन वेळा पाजावे. देताना दोन-तीन आठवडे रोज द्यावे. नंतर तीन-चार आठवडयांचा खंड पाडावा असे दोन-तीन वर्षेपर्यंत हा क्रम ठेवावा. या उपायाने जंत होणार नाहीत. तसेच मुलांच्या आहारात सौम्य कडू रस (उदा. शेवग्याच्या पाल्याचा रस + मध) जाईल हे पाहावे.

पोटात झालेले जंत घालवण्यासाठी काही औषधे आहेत. पळसाचे बी, हिंग, ओवा,कापूर एकत्र करून कृमिकुठार नावाचे औषध बनते. याच्या (250मि.ग्रॅ.च्या) दोन गोळया रोज रात्री याप्रमाणे आठवडाभर घ्याव्यात.

आणखी एक सोपा उपाय म्हणजे खाजकुयलीची कुसे. याच्या एका शेंगेवरील कुसे खरवडून काढून गोटीइतक्या गुळामध्ये मिसळून रात्री खायला द्यावे. गुळाऐवजी एक चमचा मधही चालेल. दुस-या दिवशी सौम्य रेचक (त्रिफळा चूर्ण) द्यावे. याने गोल जंत पडतात. खाजकुयलीची कुसळे, तळहात, तळपाय या शिवाय इतरत्र त्वचेवर लागली तर तीव्र आग होते. कुसळे खरडताना ती वा-यावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कुसे सुरक्षितपणे कॅपसूलमध्ये (100मि.ग्रॅ.) पर्यंत भरता येतात. कॅपसूल देणे जास्त सोपे असते.

होमिओपथी निवड

कल्केरिया कार्ब, सीना, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate