शरीराचा अगदी प्राथमिक घटक म्हणजे पेशी. पेशींचे विभाजन होऊन पेशींची संख्या वाढत असते. या संख्यावाढीमुळे अवयवांची वाढ होते. मात्र या सर्व पेशींची वाढ ठरलेल्या ठिकाणापुरती मर्यादित असते. उदा. जठराच्या पेशी फुप्फुसात वाढणार नाहीत. कर्करोगात या दोन्ही नियमांचे उल्लंघन होते. एक म्हणजे पेशींची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढते व तिथून सुटलेल्या कर्कपेशी शरीरात कोठे रूजून वाढू शकतात. ही कर्करोगाची मूळ घटना आहे. असे का होते? काही पेशी अशा बेलगाम का होतात? या प्रश्नाचे उत्तर पेशीकेंद्रातली गुणसूत्रे व रंगसूत्रे यांच्यात शोधावे लागेल. पेशीचे सर्व गुणधर्म यात सामावलेले असतात. त्या पेशीच्या वाढीच्या मर्यादा, संख्यावाढीच्या मर्यादा,स्थानाच्या मर्यादा, इत्यादी या पेशीकेंद्रात गुणसूत्रांच्या स्वरूपात ठरलेल्या असतात. यात बदल झाले, की गुणधर्मातही बदल होतात. पेशींची संख्या, आकारमान, स्थान, इत्यादी बंधने सैल करणारे बदल घडले की, कर्करोगाची शक्यता तयार होते.
समजा एखाद्या पेशीत (उदा. जिभेवरच्या एका पेशीत) असा बदल झाला तर त्या पेशीचे पुढे विभाजन होताना संख्या, आकारमान वाढत जाईल. त्यातून तयार होणा-या सर्व पेशी अशाच स्वैर असतील. हळूहळू त्या ठिकाणी एखादी गाठ तयार होईल. गाठीच्या काही भागांस रक्तपुरवठा न झाल्याने किंवा घर्षणाने त्याचा काही भाग मरून त्या ठिकाणी व्रण किंवा खड्डा तयार होईल. पण उरलेल्या पेशी मात्र वाढत राहतील. लगतच्या भागापर्यंत (उदा. जिभेपासून तोंडातील आतले आवरण, त्यावरचे स्नायू, अस्थी, इ.) या कर्कपेशी वाढत जातील. उगमस्थानापासून आजूबाजूच्या अवयवांत बांडगुळाप्रमाणे वाढण्याच्या या अवस्थेला स्थानिक आक्रमणाची अवस्था असे म्हणता येईल. या अवस्थेत रोगट भाग काढून टाकणे शक्य असल्यास रोगमुक्ती मिळू शकते. पण असे काही थोडे भागच काढून टाकणे शक्य असते. जीभ, गाल, त्वचेचा एखादा भाग, स्तन, आतडयाचा थोडा भाग, इत्यादी काढून टाकण्यासारखे असतात. पण हृदय, यकृत असे काही भाग काढून चालत नाहीत. काही भाग अंशतः काढता येतात (उदा. जठराचा काही भाग, फुप्फुसाचा काही भाग, इ.)
कर्करोगाचे स्थानिक आक्रमण चालू असतानाच कर्कपेशी रसवाहिन्यांवाटे व रक्तावाटे पसरत असतात. काही कर्करोगांची या मार्गाने वाढण्याची प्रवृत्ती जास्त असते, तर काहींची कमी. उदा. प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग इतरत्र वेगाने पसरतो, तर स्तनांचा कर्करोग त्या मानाने स्थानिक आक्रमणच जास्त करतो. रक्तावाटे किंवा रसवाहिन्यांवाटे वेगाने पसरणा-या कर्करोगांमध्ये मुख्यतः प्रॉस्टेट, थॉयराईड (गलग्रंथी), स्त्री-पुरुष बीजांडे, यकृत, रक्तपेशी यांचे कर्करोग प्रमुख आहेत. रक्तपेशींचा कर्करोग मात्र इतर अवयवांत फारसा पसरत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...