पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने गाव हागणदारीमुक्त झाले आहे. ग्रामस्थांना स्वच्छतेच्या सवयी लावून गावातील कचरा दूर करण्याचा संकल्पही ग्रामपंचायतीने केला आहे.
नाशिक-पेठ मार्गावरील करंजाळीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावात एकूण 163 कुटुंबांकडे शौचालय नव्हते. गावात 65 टक्के कुटुंब भूमीहिन असल्याने तुटपुंज्या कमाईतून शौचालय बांधणे त्यांना शक्य नव्हते. अशावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष कमलाकर गवळी आणि उपसरपंच मनोहर खैरे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. ग्रामसभेतूनही स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.
नागरिकांची मानसिकता तयार झाल्यानंतरही शौचालय उभारण्यासाठी करावयाच्या खर्चाचा प्रश्न कायम होता. सुरूवातीचा खर्च करण्यासाठीदेखील नागरिक पुढे येत नव्हते. अशावेळी ग्रामपंचायतीने स्वत: दुकानदाराशी संपर्क साधून प्रत्येकी पाच हजाराचे साहित्य शौचालय बांधण्यासाठी उपलब्ध करून दिले. शौचालय उभारणीच्या प्रशिक्षणासाठी गावातील 10 नागरिकांना पाठविण्यात आले. त्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच गावातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला. शौचालयाचे प्रत्येकी 12 हजार रुपये अनुदान मिळाल्यानंतर दुकानदारास साहित्याची रक्कम देण्यात आली.
शौचालय बांधताना जागेचाही प्रश्न अनेक ठिकाणी आला. ग्रामपंचायतीने आपल्याकडील जागादेखील काही कुटुंबांना शौचालय उभारण्यासाठी उपलब्ध करून दिली. गावात सिमेंटचे रस्ते असून ग्रामस्थ स्वत: गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात.
गावात वृक्षारोपणावरही भर देण्यात येतो. पावसाळ्यात दोन हजार आंब्याची झाडे लावून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता जलसंधारणाची अनेक कामे ग्रामपंचायतीअंतर्गत हाती घेण्यात आली आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनी गाव हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने आरोग्याबाबतही नागरिक अधिक दक्ष झाले आहेत.
गावात शौचालय उभारताना खर्चाची आणि जागेची प्रमुख अडचण होती. ग्रामपंचायतीने या दोन्ही बाबतीत ग्रामस्थांना सहकार्य केले. त्यांच्यात विश्वास निर्माण केला, तसेच जनजागृतीवरही भर दिला. त्यामुळे नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले. - कमलाकर गवळी |
बायकांना बाहेर जाताना अडचणी यायच्या. आता स्वच्छता राहते. गावात फिरतांनाही चांगले वाटते. मच्छरही कमी झालेत. रोगराईची भीती राहिलेली नाही. - विठाबाई भोये,गावातील वृद्ध महिला |
डॉ.किरण मोघे
जिल्हा माहिती अधिकारी
नाशिक
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/14/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...