साधारण 12 ते 18 या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा वर्षांनंतर त्यांना सज्ञान मानले जाते. या वयात त्यांच्यामध्ये लैंगिकदृष्टया बरेच बदल होत असतात. हीच मुले उद्याचे पालक आणि आपल्या देशाचे भावी नागरिक होणार. किशोरवयीन गर्भारपण आणि गर्भपात ही एक कठीण समस्या आहे.
वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते. योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची- वजन आणि स्नायूंची शक्ती प्राप्त होते. अनुकूलता मिळाली तर एका पिढीत हा फरक दिसून येतो. हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार होतात. याचे कारण पूर्वीपेक्षा हल्ली जास्त पोषक अन्न मिळते.
स्त्रियांना समाजात असलेल्या दुय्यम स्थानामुळे मुलींना कुपोषणाचा धोका जास्त असतो. त्यांना कमी आणि हलके अन्न दिले जाते. त्याच्याकडून काम मात्र जास्त करून घेतले जाते. त्यात दर महिन्याला पाळीच्या रक्तस्रावामुळे त्यांना रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. (तसेच मुलांनादेखील रक्तपांढरी होऊ शकते.) वजन, उंची आणि आरोग्याचे तेज ही चांगल्या आरोग्याची लक्षणे आहेत. या वयात सकस अन्न मिळणे, जरूर पडल्यास लोहाच्या पूरक गोळया देणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या लाडांमुळे या वयात ब-याचदा बाजारातील निकृष्ट जिन्नस खाण्याची सवय काही मुलांना लागते. पण लहान मुलांइतकेच या वयातही सकस अन्नाला महत्त्व आहे.
या वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे. यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते. मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत. मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात. योगासनांचादेखील पुढच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो. खेळ आणि व्यायामामुळे त्यांना पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 1/25/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...