অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यायाम करताय... तर ही खबरदारी घ्या…- भाग-1

आजकाल प्रत्येकजण आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष देऊ लागला आहे. फिटनेसबद्दल जागरुकता असावी, पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नये. आपण सुंदर आणि आकर्षक दिसावे ही भावना सर्वांमध्ये असते. स्त्री असो वा पुरुष सर्वांना सर्व मिळत नाही. कोणी जाड असते तर कोणी बारीक आणि या फरकामागे खरे कारण शोधून त्यावर योग्य उपचार आवश्यक आहेत.

व्यायामाची आधुनिक उपकरणे

वजनाचा काटा हा तर आपला परम शत्रू. तो काटा घरी आणून ठेवण्यात जितकी तत्परता दाखवली जाते तेवढी तो वापरताना आपण दाखवत नाही. आकर्षक ट्रेडमिल घरात दिसते छान आणि बहुधा त्यामुळे आपण त्याचा खरा उपयोग विसरत चाललो आहे. आपली मानसिकता अशी बनली आहे कि वजन काटा वापरला नाही, वजन वाढले नाही किंवा त्याला लांब ठेवणेच योग्य. पण प्रश्न सोडवून सुटतात, लांबवून किंवा दुर्लक्ष करून सुटत नाहीत.

आपल्या वजनावरती एक नजर हवी. जर ते थोडे अधिक झाले आहे तर लगेच उपाय करू शकतो. थोडेसे वाढलेले वजन कमी करणे सोपे जाते. खाण्या-पिण्यावर नियंत्रण आणि योग्य व्यायाम हे रामबाण उपाय. जर अन्य काही कारणास्तव वजन वाढत असेल तर वैद्यकीय तपासणीच योग्य. अशा रीतीने आपण आपले स्वास्थ उत्तम ठेऊ शकता.

काळजी करणे

घर नीट बंद केलं, किल्ल्या पर्समध्ये आहेत, पंखा बंद केला, काल साहेब म्हणाले, ते काम झालं अशा बऱ्याच गोष्टींचा विचार आपल्या मनात चाललेला असतो. त्यात भर म्हणून शरीर स्वास्थ्याकडे आपण वळतो. हे सर्व विचार तुम्हाला जागरूक ठेवतात पण तुमचा ताण वाढवतात.

सलग काळजी केल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी, अस्वस्थ पोट, उच्च रक्तदाब, छाती दुखणे आणि कमी झोप असे विकार होऊ शकतात. हे सर्व तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. काम आणि घर सांभाळणे ही एक तारेवरची कसरतच आहे, यात शंका नाही. पण एक निरोगी मन आणि शरीरच हे योग्य रितीने करू शकतात. आपल्या कामाची क्रमवारी लावा आणि त्यानुसार सर्व योजना आखा. अशाने तुमची सर्व कामे मार्गी लागण्यास मदत होईल आणि तुम्हाला ताण जाणवणार नाही.

औषधे बंद करणे

आपल्याला जरा बरे वाटले तर आपण औषधे घेणे बंद करतो. डॉक्टरने आपल्याला अमुक एका कालावधीपर्यंत अमुक औषधे घेण्यास सांगितले असते. पण आपली तब्बेत थोडीशी सुधारली कि आपण औषधे घेणे कमी करतो किंवा टाळतो. हे सर्व डॉक्टरांना न विचारता. शरीरावर हा अतिरेक का ? कोणाच्या जोरावर ? कधी विचार केला आहे या गोष्टींचा. उत्तर आहे - नाही.

आजारपणात नियमित औषध सेवनाने आपल्यातील रोग किंवा त्याचे कारण नष्ट करण्यास मदत होते. हे सर्व हळूहळू एका विशिष्ट पद्धतीने घडून यावे म्हणून आपल्याला एका कालावधीमध्ये ती औषधाची संख्या घेणे बंधनकारक असते. या चक्रात अचानक बदल झाला तर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांना विचारूनच औषधे घेणे व बंद करणे योग्य ठरते.

स्वच्छ व निरोगी तोंड

दातांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. दिवसातून दोन वेळा दात घासणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याअगोदर दात स्वछ करणे योग्य. दात आणि जीभ स्वच्छ होतात पण दातामधील जागा अनेकदा साफ होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्लाकची समस्या निर्माण होऊ शकते. जर हा प्लाक वाढला तर याचे विषाणू रक्त प्रवाहामध्ये सहज पोहोचू शकतात. त्यानंतर तुम्हाला हृदयरोग, कर्करोग अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

वैद्यकीय उपचार घेऊन आपण बरे होऊ शकतात, पण बऱ्याचदा समस्या समजायला उशीर झालेला असतो. त्यामुळे दात गमावण्याची पाळी येऊ शकते. हे सर्व जर आपण दातामधील जागा साफ ठेवली तर टाळू शकता. त्यामुळे निरोगी दात ही आजची प्रमुख गरज बनली आहे.

न्याहारी टाळणे

आपल्या रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या न्याहारीपर्यंत एकूण 7 ते 8 तास आपले पोट रिकामी असते. आपले सर्व सकाळचे विधी शरीरात साठवलेल्या ऊर्जेतून सहज पार पडतो. त्यामुळे आपल्या शरीराला नवीन ऊर्जा हवी असते. ती ऊर्जा आपल्याला न्याहारीद्वारे प्राप्त होते.

जर तुम्ही न्याहारी केली नाही तर तुम्हाला खर्च केलेली ऊर्जा मिळवणे जड जाते. शरीर साठवलेली ऊर्जा वापरण्यास सुरुवात करते. अशावेळी तुम्ही अधिक ताण आणि अशक्तता अनुभवता. यासाठी सकाळी न्याहारी करणे खूप गरजेचे आहे.

असे म्हणतात कि न्याहारी असावी राजेशाही, दुपारचे जेवण असावे सामान्य आणि रात्रीचे जेवण असावे हलके. जर आपण न्याहारी केली नाही किंवा कमी जेवलो तर शरीर आपली ऊर्जा राखण्यासाठी चरबी राखून ठेवते. याचा परिणाम आपण लठ्ठ होता आणि त्यामुळे अजून रोगांना निमंत्रण मिळते. त्यामुळे मस्त खा आणि निरोगी राहा.


लेखिका - सुजाता चंद्रकांत.
(ईमेल : sujatacbn@gmail.com)

 

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate