योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याशी तुलना करून पहा. वरील सर्वांमध्ये आपण हातापायांचे जास्तीत जास्त आकुंचन-प्रसरण करतो. त्यामुळे हृदय व फुप्फुस संस्थांना अधिक काम करावे लागते. इतर व्यायामात हृदयाकड़ून हातापायाच्या मांसपेशींना अधिक रक्त पुरवावे लागते. या तुलनेत आसनांकडे पाहिल्यावर असे लक्षात येईल, की त्यात हातापायातील मांसपेशींना ठरावीक स्थितीत बसवले जाते. यातून पाठ, पोट, कण्यातील अनेक मणके यांना वळवून दाब, ताण ओढ दिली जाते. यावेळी इतर व्यायामप्रकारांप्रमाणे भराभर श्वासोच्छ्वास न चालवता सावकाश, दीर्घ, आवाज न करता चालणारा श्वासोच्छवास अपेक्षित असतो. स्थिर बसवलेले, दामटून ठेवलेले हातपाय या अवयवांकडून अधिक रस- रक्त हृदय, यकृत, फुप्फुस यांच्याकडे वळते. म्हणजे खेळ, मजुरी, व्यायाम यांच्या तुलनेत योगासनामध्ये फुप्फुस-हृदयाला कमी काम देऊन पोकळ अवयवाकडे रस-रक्त वळवले जाते.
मनुष्याचे हात पाय घट्ट रचनेच्या मांस-चरबी-हाडांनी बनलेले आहेत तर धडामध्ये फुप्फुसाचे फुगे, आतडयाच्या नळया, पोटाची पिशवी अशा पोकळ रचनांचे बाहेरचे आवरण तयार करण्याइतपतच मांसाच्या भिंती आहेत. हातापायाचे काम बंद पडल्यानेसुध्दा शरीराची कामे तशी बिघडत नाहीत, पण फुप्फुसाचे, हृदयाचे, पोटाचे आतडयाच्या नळयांमधील कार्य बिघडल्याने आजारपण येते. म्हणूनच आरोग्य सांभाळायचे असेल तर धडामध्ये असणा-या फुगे, नळया व पिशव्यांसारख्या अवयवांचे काम हातापायांपेक्षा अधिक नीट चालले पाहिजे.
यामुळेच आरोग्य सांभाळण्यासाठी आसनांचे महत्त्व आहे. आसनस्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असता शरीरातील पोकळ अवयवांना अधिक रस-रक्त पुरवले जाते. त्यातून टाकाऊ पदार्थ सहज सुटू शकतात. त्यामुळे घेतलेली हवा, घेतलेले अन्न-पाणी अधिक चांगले वापरले जाते. फुप्फुस, पोट, आतडी ही आतुन स्वच्छ होण्यामुळे शरीराला आवश्यक क्रिया चांगल्या होतात. खेळ, मजूरी, व्यायाम यांमध्ये आपण मुख्यतः हातापायातील घटकांना राबवतो, तर आसनामध्ये बसण्याने आपण फुप्फुसे, पोट, आतडे, कणा यांना विशिष्ट काम देतो.
स्नायूंच्या इतर व्यायाम प्रकारात शरीरातली चेतासंस्थेची सावधान शाखा जादा काम करते. यामुळे हृदयक्रिया, रक्तदाब, श्वसन, तपमान, घाम इ. वाढतात. याउलट योगासने, प्राणायाम हा चेतासंस्थेच्या विश्राम शाखेशी संबंधित आहे. ही शाखा हृदय, फुप्फुसे, आतडी, मूत्र, जननसंस्था यांच्याशी निगडित आहे. यामुळे शरीर शांत, स्थिर होते व संथ होते. शिथिलीकरणाचा उद्देश यातूनच साधतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 11/14/2019
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर द...
ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा अ...
नुसत्या व्यायामापेक्षा व्यायामयुक्त खेळ केव्हाही च...