अनुराधा हे विंचवाचे मुख तर ज्येष्ठा विंचवाचे मधले शरीर. हे देखिल ओळखण्यास अतिशय सोपे. अनुराधाच्या तीन तारका जश्या आडव्या रेषेत आढळतात. त्याच प्रमाणे थोड्या पुढे आपणास तशाच तीन तारका दिसतात. परंतु तारकामध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्षत्र.
ज्येष्ठा नक्षत्राचा समावेश देखिल वृश्चिक राशीमध्ये होतो. वृश्चिक म्हणजे विंचू. पाश्चात्यांनी देखिल या वृश्चिक समूहास 'स्कॉर्पिओ' हे नाव दिले.
या विंचवासंबंधी ग्रीक पुराणात दोन कथा आढळतात. सूर्यदेव अपोलो हा आपल्या दिव्य घोड्यांनी जुंपलेल्या रथात बसून रोज फेरफटका मारण्यासाठी जात असे एक दिवस अपोलोचा मुलगा 'फेटन' याने स्वतः एकदा या रथातून फेरफटका मारण्याचा हट्ट धरला. मुलाच्या हट्टामुळे अपोलोने त्यास परवानगी दिली. अपोलोचा रथ घेऊन मग फेटन फेरफटका मारण्यासाठी निघाला. मेष, वृषभ, सिंह (ही सारी अवकाशातील नक्षत्रेच) त्याच्या वाटेत आलेत. ह्या सार्यांना मागे टाकत फेटन रथ घेऊन पुढे निघाला. परंतु अचानक वाटेत एक मोठा विंचू आला. त्या विंचवाला पाहून रथाचे घोडे उधळले व फेटनचा रथावरील ताबा सुटला. हा विंचू म्हणजेच वृश्चिक तारकासमूह.
दुसर्या एका कथेनुसार फार पूर्वी ओरायन हा एक प्रसिद्ध शिकारी होऊन गेला. आपल्या शक्ती सामर्थ्यामुळे त्याने बरीच कीर्ती मिळवली. नंतर त्याला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला. त्याचे गर्वहरण करण्यासाठी ज्युनो या ग्रीक देवतेने ओरायनवर एक विंचू सोडला. या महान शिकार्याचा मृत्यू अखेर विंचू दंशाने झाला. डायना या देवतेने ओरायन म्हणजे मृग नक्षत्र व वृश्चिक नक्षत्र यांस अवकाशात परस्पर विरुद्ध असे स्थान दिले. जेव्हा मृग नक्षत्र पश्चिमेस मावळते तेव्हा वृश्चिक तारकासमूह पूर्वेकडे उगवत असतो.
वृषभ राशीतील रोहिणी आणि वृश्चिक राशीतील ज्येष्ठा या दोन्ही तारका समान लाल रंगाच्या भासतात म्हणून फार पूर्वी या दोन्ही तारकांना लाल म्हणजे रोहित रंगाच्या म्हणून रोहिणी हे एकच नाव होते. तसेच या दोन्ही तारका एकमेकींच्या बहिणी असे देखिल म्हटले जात आहे. पुढे वृश्चिकेतील तारका जास्त प्रखर दिसू लागल्याने तिला ज्येष्ठा हे नाव देण्यात आले व वृषभातील तारकेस कनिष्ठा हे नाव मिळाले. नंतरच्या काळात ज्येष्ठा व रोहिणी अशी नावे या दोन तारकांना देण्यात आली.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 8/11/2023
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुं...
हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक...
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनु...
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.