हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक्षत्र आपणास पूर्वेकडे उगवताना दिसेल. कृत्तिकांना ओळखणे फार सोपे आहे. कारण आपणास या नक्षत्रामध्ये एक-दोन ऐवजी सहा तारका जवळ जवळ दिसतील. फार पूर्वीपासून कृत्तिकांना निरनिराळी नावे देण्यात आली आहेत. वैदिक ऋषी यांना सप्तमातृका किंवा सप्त बहिणी म्हणत. काही ठिकाणी यांना वस्तर्याची उपमा देण्यात आली. तर काहींना हे नक्षत्र एखाद्या द्राक्षाच्या घोसाप्रमाणे दिसते. तर काहींनी ह्यांना उडत्या पतंगाची उपमा दिलेली आहे. कृत्तिकांचा उल्लेख वर सात तारका म्हणून जरी केला असला तरी नीट पाहिल्यास आपणास त्या ठिकाणी सहाच तारका पाहाव्यास मिळतील. बहुतेक नक्षत्र संग्रहात कृत्तिकांचा उल्लेख ७ तारकाच म्हणून केला जातो. तर मग आज ६ तारका कशा दिसतात? त्यातील एक तारका नाहीशी झाली असा विचार केल्यास असे लक्षात येते की बहुदा नंतरच्या काळात त्या सातव्या तारकेचा स्फोट झाला असावा. म्हणून आजच्या संशोधकांना ह्या कृत्तिका नक्षत्रा भोवती एक धूसर अभ्रिकेचे आवरण आढळले आहे.
कृत्तिकांना इंग्रजीमध्ये 'प्लिड्स' असे म्हणतात बहुदा हा शब्द 'प्लिहादीही' या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असावा.
ह्या सहा तारकांपैकी जी सर्वात तेजस्वी तारका दिसते तिचे नाव अंबा. ही आपल्या सूर्याच्या कित्येक पट तेजस्वी आणि आकाराने मोठी आहे. तर उरलेल्या तारकांची नावे दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती आणि वर्षयंती आहेत. कृत्तिकांमध्ये सात तारका असल्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या सातव्या तारकेचे नाव चुपुणिका असल्याचे काही साहित्यांमध्ये सापडते.
एका कथे नुसार महादेवाचा पुत्र षडाननाचे मातृत्व कृत्तिकांकडे आहे. शंकरामुळे अग्नीस गर्भ राहिला. अग्नीस लाज वाटून त्याने एका सरोवरात गर्भाचा त्याग केला. त्या सरोवरातील सहा बहिणींनी हा गर्भ धारण केला व एका पुत्राला जन्म दिला. या अदभुत जन्मामुळे षडाननास सहा मुखे ( तोंड ) निर्माण झाली. कृत्तिकांमुळे षडाननाचे नाव कृत्तिकेय असे पडले.
दुसर्या एका कथेनुसार अवकाशातील उत्तरेस ध्रृवतार्याशेजारी एक काहीसा पतंगाच्या आकाराचा तारकासमूह आहे. ज्यास सप्तर्षी असे म्हटले जाते. म्हणजेच ते सात ऋषी आहेत. तर कृत्तिकांना ह्या सप्तर्षीच्या ऋषीपत्नी म्हटले जाते. एकदा हिवाळ्यात खूप थंडी पडली असता ह्या ऋषीपत्नीपैकी वसिष्ठपत्नी अरुंधती सोडून इतर सहा जणी उबेसाठी अग्नीजवळ गेल्या. अरुंधती पतिव्रता म्हणून प्रसिद्ध झाली. तर बाकीच्या सहा कृत्तिकांच्या या व्यभिचारी कृत्याचा सप्तर्षींना फार राग आला व तेव्हा पासून त्यांनी कृत्तिकांचे तोंड न पाहायचे ठरविले. ह्या कथेचा संदर्भ आपणास पडताळायचा असल्यास हिवाळ्यामध्ये आकाशाचे निरीक्षण केल्यास आपणास कृत्तिका रात्रभर दिसतात व वरील कथेमध्ये उल्लेखलेला अग्नी हा तारा त्याच्या शेजारीच असलेल्या सारथी या तारकासमुहात आढळेल. तसेच सप्तर्षींनी रागाने कृत्तिकांचे तोंड न पाहण्याचे ठरविले या वाक्यातील सत्यता पडताळायची असल्यास निरीक्षण केल्यास आपणास दिसेल की कृत्तिका आकाशात मावळण्यासाठी पश्चिमेकडे सरकल्या शिवाय सप्तर्षी उगवत नाहीत.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/9/2020
तारकामध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्...
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनु...
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुं...