२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते. आपण जरी वर्षाची सुरुवात जानेवारी १ तारखेपासून करीत असलो तरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अश्विनी नक्षत्रापासून नवीन वर्षास आरंभ होतो. आपण या नक्षत्रास प्रथम नक्षत्र मानतो. सूर्याचा या नक्षत्रामध्ये प्रवेश म्हणजे नूतन वर्षारंभ होय.
या नक्षत्राचा समावेश मेष राशीमध्ये होतो. एकूण १२ राशीमध्ये मेष राशी देखिल आपण प्रथम रास म्हणून मानतो.
आकाशात तीन ठळक तारकांचा समूह मिळून ही रास तयार होते. आपणास या तारकांचा विशालकोन तयार झालेला आढळतो. या तीन तारकांशिवाय आणखी काही तारे या नक्षत्रात आढळतात. परंतु ते सारेच मंदतेज आहेत.
या नक्षत्रा संबंधीची एक सुंदर वेदकालीन कथा आपल्या येथे आढळते. मधुविद्या (मृताला जीवदान देणारी विद्या अशी कल्पना असावी) दधिची ऋषींना येते असे. अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य. तर अश्विनीकुमार यांना दधिची कडून ही विद्या शिकावयाची होती. पण इंद्राला ते नको होते. दधिचीला इंद्राने भीती घातली की अश्विनीला ही विद्या शिकविल्यास दधिचीचा शिरच्छेद करण्यात येईल. त्यामुळे अश्विनीकुमार यांनी अशी योजना आखली की दधिचींनी आधीच आपला शिरच्छेद करावा. व त्यास घोड्याचे डोके लावून घ्यावे. म्हणजे इंद्राने दधिचींचा शिरच्छेद केला तर पुन्हा त्यांना त्यांचे डोके लावण्यात येईल व ठरल्याप्रमाणे दधिचींचे मूळ डोके त्यांना परत लावण्यात आले. बहुदा अश्विनीकुमार या नावावरून पुढे या नक्षत्राचे नाव अश्विनी ठेवण्यात आले असावे.
आपण ज्या प्रमाणे या नक्षत्राचा समावेश मेष राशीमध्ये करतो. मेष म्हणजे मेंढा, त्याच प्रमाणे पाश्चात्यांनी देखिल या तारकासमुहास ऐरीस (मेंढा) हेच नाव दिले आहे. ग्रीक पुराणामध्ये या मेंढ्यासंबंधी एक कथा आढळते.
थेबिसचा राजा अस्थमस याला फ्रिक्सर आणि हेले ही दोन मुले होती. पण या मुलांची सावत्र आई इनो त्यांना फार जाच करी. देवांचा दूत मर्क्युरी याला एक दिवस कळले की इनो आपल्या दोन्ही सावत्र मुलांना ठार मारणार आहे. तेव्हा मर्क्युरीने एक सोनेरी केसांचा मेंढा या दोन्ही मुलांना वाचविण्यासाठी पाठविला. दोन्ही मुलांना घेऊन हा मेंढा आकाशात उडाला पण वाटेत येणार्या एका समुद्रावरून जाताना हेलेच्या हाताची पकड सुटली व तो समुद्रात कोसळला (हे ठिकाण म्हणजे दादा नेल्सची समुद्र धुनी. अजूनही ते ठिकाण हेलिस्पॉट म्हणून ओळखले जाते.) फ्रिक्सर मात्र काळ्या समुद्राच्या किनारी सुखरूप उतरला. आपल्या सुटकेसाठी देवाचे आभार म्हणून तो मेंढा त्याने देवाला बळी दिला व त्याची सोनेरी लोकर तिथल्या राज्याला भेट दिली. ही ग्रीक पुराणकथा अजूनही फार प्रसिद्ध आहे.
खरेतर 'वसंतसंपात' बिंदू (आयनिकवृत्त व खगोलीय विषुववृत्त यांना जोडणारे स्थान) ज्या राशीमध्ये असेल ती पहिली रास अथवा ज्या नक्षत्रास असेल ते नक्षत्र प्रथम मानावे. साधारणात ज्यावेळेस कलगणनेस सुरुवात झाली त्याकाळी 'वसंतसंपात' बिंदू अश्विनी नक्षत्रामध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये होता. परंतु पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा बिंदू सरकत-सरकत सध्या रेवती नक्षत्रामध्ये (मीन राशीमध्ये) आला आहे. म्हणजे नक्षत्र गणना रेवती नक्षत्रा पासून करावयास हवी. पण काही कारणांमुळे हा बदल करावयाचा राहून गेला. म्हणून अश्विनी नक्षत्र व मेष राशीचा अग्रक्रम कायम राहिला.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/26/2023
हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक...
तारकामध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्...
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनु...
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुं...