অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भक्तीत हरवलेलं खेडलेझुंगे

भक्तीत हरवलेलं खेडलेझुंगे

वेशीवरच्या पाऊलखुणा : खेडले झुंगे

भक्तीत हरवलेलं खेडलेझुंगे

नदीकाठच्या गावांना प्राचीन इतिहासाचा सुगंध असतो. तसाच सुगंध नाशिक परिसरातील गोदाकाठच्या गावांनाही आहे. गोदासंस्कृतीत बहरलेल्या अनेक गावांवर अगदी रामायणापासून सातवाहनांपर्यंत अन् मुगल ते पेशवाईची छाप पहायला मिळते. निफाड तालुक्यातील असेच एक गाव म्हणजे खेडलेझुंगे. खेडलेझुंगे आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे तर अनोखे ठरतेच पण, या गावाने भक्तीची वेगळीच परंपरा जपली आहे. तुकाराम बाबांच्या भक्तीशक्तीत दंग असलेले खेडलेझुंगे निसर्गरम्य अन् एकशे अकरा फूट उंच हनुमानाच्या मूर्तीसाठीही ओळखले जाते. त्यामुळे ही सफर रोचकही होते.

नाशिकहून सायखेडामार्गे म्हाळसाकोरे रस्त्याने खेडलेझुंगेला जाता येते. हे अंतर साधारण ५०-५५ किलोमीटर आहे. हा रस्ता चांगला असल्याने आजूबाजूची गावे पाहत हा प्रवास अधिक मनोरंजक होतो. नाशिक-निफाड-नांदूरमधमेश्वरहूनही खेडलेझुंगेला जाता येते. हे गाव निफाड तालुक्यात येते. त्यामुळे परिसरात मोठाले डोंगर नाहीत. म्हणून निफाडला पहाड नसलेले ‘नि पहाड म्हणजे निफाड’ म्हटले जाते. पण आजूबाजूचा परिसर शेतीमुळे हिरवागार आहे. या गावात पोहचण्यापूर्वी पाच किलोमीटर अंतरावरूनच हनुमानाची प्रसन्न मुद्रा दिसू लागली की समजायचे खेडलेझुंगे जवळ येऊ लागले आहे. मग फक्त उत्सुकता राहते ती ‘इतकी उंच हनुमानाची मूर्ती कशी?’ हे जाणून घेण्याची. म्हाळसाकोरे मार्गाने गेल्यास गोदावरीवरचा पूल ओलांडून गावात प्रवेश करतो येतो. सध्या नदीच पात्रे कोरडे पडले आहे. मात्र आजूबाजूची घनदाट हिरवाई तुमचे मन त्याच्याकडे खेचत राहते अन् तुम्ही हनुमानाची मूर्ती उभी असलेल्या ठिकाणी जाऊन पोहचता. पूल ओलांडला की, उजव्या हाताला गाव वस्ती ‌दिसते; मात्र तुम्ही डाव्या हाताला वळता. कारण हनुमानाची मूर्ती डाव्या हाताला असलेल्या नक्षत्रवनात स्वागतासाठी सज्ज असल्याची दिसते.

खेडलेझुंगे असे गावाचे नाव असण्यामागे एक इतिहा‌स आहे. हा इतिहास रामायणाशी जोडला गेला आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, त्रेतायुगामध्ये प्रभुरामचंद्र आपला वनवास दंडकारण्यात व्यतीत करत असताना त्याचेकडे सीतामातेने सुवर्ण कांतीमय हरणाचा हट्ट धरला होता. त्यासाठी प्रभु राम हरणाच्या मागे गोदावरी नदीच्या तटाने शिकारीसाठी धावत असताना ते हरीण ज्या ठिकाणी खटले (थांबले) त्या ठिकाणी जी वस्ती निर्माण झाली तिला खटले नाव पडले. खटले गाव पुढे गोदाकाठी उत्तर तीरावर स्थिरावले अन् पुढे काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन गावास 'खेडले' म्हटले जाऊ लागले. सध्याच्या खेडलेझुंगे या नावातील 'झुंगे' या नावाचा इतिहास ही मनोरंजक आहे. गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर एक बेट आहे. त्याठिकाणी संन्यासी पंथाच्या दशम आखाड्यापैकी 'गिरी' पंथिय साधुचे वास्तव्य होते. तेथे 'झुंगा' नावाचे महात्मा फार थोर व योगी अवालिया राहत होते. त्यांच्या साधनेचे आसन चमत्कारांनी भरलेले होते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे झुंगे महाराजांची गादी येथे आहे. त्याच्या दर्शनासाठी अजूनही लांबून लोक येथे येतात. गोदामातेला जर पूर असेल तर हा महात्मा पाण्यावरुन चालत ‘खेडले’ या गावी येत असे, अशी दंतकथा आहे. त्यातून दोन नावांचा संगम झाला अन् गावास 'खेडले झुंगे' हे नाव पडले, अशी अख्यायिकाही सांगितली जाते.

नाशिक जिल्ह्यातील हनुमानाची सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून खेडलेझुंगेतील एकशे अकरा फूट उंच मूर्तीकडे पाहिले जाते. ही मूर्ती पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठा वाटा उचलत आहे. गावाचे वैभव म्हणूनही या मूर्तीकडे पाहिले जाते. मात्र यामागे मोठी भक्तपरंपरा दडली आहे. याच परंपरेमुळे खेडलेझुंगेला श्रीक्षेत्र म्हणून दर्जाही मिळला आहे. खेडलेझुंगे या गावास धार्मिक वारसा म्हणजे हभप विंचुबाबा, पगडीबाबा अशा योगी पुरुषांचा गावाला सहवास लाभला. त्यांनी खेडलेझुंगे येथे वास्तव्य करून परिसरात कीर्तन प्रवचनादींनी धर्म प्रसारचे कार्य केले. दरम्यान, ही परंपरा तुकारामबाबा खेडलेकर यांनी पुढे नेली. खेडलेकर यांचा भक्तीयोग प्रदीप हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी गाव विकासाबरोबर माणुसकी अन् धर्मजागराची भावना गावात रूजवली. त्यांच्यानंतर माऊलीबाबा, गोविंदबाबा यांनी ही परंपरा पुढे नेली. काशिनाथबाबांनी पालखी सोहळा सुरू करून नवीन अध्याय सुरू केला. तर दिल्लीतील शांतीवनप्रमाणे खेडलेझुंगेत संतवन व नक्षत्रवन उभारण्यात

त्यांचा हातभार मोठा आहे. आता ही परंपरा रघुनाथबाबा पुढे नेत आहेत. संतवन व नक्षत्रवन हे पर्यटन व भक्तीधाम आहेत. येथे धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रमही राबविले जातात. नक्षत्रवनात राशीवृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यामुळे हा परिसर निसर्गरम्य वाटतो. येथेच १११ फूट हनुमानाची मूर्ती आहे. ही मूर्ती २००५ मध्ये मध्य प्रदेशातील मूर्तीकार केशवराम साहू यांनी दोन वर्षात साकारली. भक्तीशक्तीच्या या प्रतिकाला पाहण्यासाठी जिल्हाभरातील पर्यटक येथे येत असतात. नक्षत्रवनात नऊग्रह देवतांच्या धातूच्या मूर्तीही येथे आहेत.

नक्षत्रवन आणि संतवन पाहून खेडलेझुंगे गावात यायचं. गोदाकाठी वसलेले गाव टूमदार आहे. गावात लहानमोठी अनेक मंदिरे आहेत. यात खंडोबा, विरोबामंदिर संतवनाच्या जवळच आहे. गावात तुकारामबाबांचे तप साधना स्थान तसेच शिवकुटी आहे. या शिवकुटीतील शांतता तुमच्या मनाला थंडा देते. शिवकुटीजवळच रामरथ आहे. या रामरथातून रामनवमी व इतर उत्सव काळात मिरवणूक काढली जाते. रामरथासमोरील राममंदिर पाहण्यासारखे आहे. पेशवाईतील बांधणीचे दुमजली राममंदिर मोठ्या वाड्यासारखे वाटते. मंदिरातील गाभाऱ्याबाहेरील लाकडी महिरप आकर्षक आहे. तर मंदिराच्या आतील बाजूला गावाला लाभलेल्या योगी पुरूषांचे फोटो लावले आहेत. राममंदिरासमोर एक ‌मोठा दगडीपाटावर एक दगडी मंदिर आहे. पूर्वी येथे मोठे मंदिर असावे, असे या पाऊलखुणांवरून वाटते. येथून पुन्हा गावाबाहेर पडताना खंडोबा व विरोबाचे रस्त्यापल्याड मंदिरे पाहून नांदूरमधमेश्वरकडे निघायचे. पुढे गोदाकाठी एका लहानशा टेकडावर वसलेले अगदी ३०-४० घरांचे सारोळेथडी हे छोटेखानी गाव तुम्हाला थांबायला लावते. गोदेच्या पुरामुळे हे गाव असे ‌टेकडीवर वसले असेल, असे गावाच्या रचनेवरून लगेच लक्षात येते.

गावातून पुढे गेल्यावर डाव्या हाताला एका चौरस पाटावर पिवळ्या रंगाचा एक लाकडी घोडा नदीकडे टक लावून पाहताना दिसतो. हा घोडा म्हणजे जलाश्व होय. गोदातीरावरील गावांमध्ये तीरावरील एखाद्या मंदिराजवळ हा जलाश्व पहायला मिळतो. याबद्दल असे म्हंटले जाते की, नदीचे पाणी या घोड्याच्या तोंडाला लागले की हा घोडा किंचाळतो. त्यामुळे गावकऱ्यांना पुराच्या धोक्याचा संकेत मिळतो. म्हणजे ही पूराची निशाणी म्हणायला हरकत नाही. नेहमी पाण्याशी बिलगून असलेला सारोळेथडीतील हा जलाश्व मात्र पाण्यासाठी तळमळलेला दिसला. त्याच्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर या जलाश्वालाही दुष्काळाची दाहकता सोसावी लागत असल्याचे दिसते. त्याचे नदीपात्राकडे एक टक नजर बरच काही सांगून जाते. खेडलेझुंगे अन् सारोळथडीचा हा प्रवास गावच्या वेगळेपण सांगत केव्हा संपतो हे लक्षातही येत नाही.

 

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate