অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोल्ट्री केली यशस्वी

स्वयंचलित खाद्य, पाणी व्यवस्थापन यंत्रणेचा वापर मुंगसरे (ता. जि. नाशिक) येथील दीपक मुरलीधर भोर यांनी केवळ शंभर ब्रॉयलर पक्ष्यांपासून सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय मागील अठरा वर्षांत पन्नास हजार पक्ष्यांपर्यंत वाढवला. काटेकोर नियोजन, बाजारपेठेवर त्यांचे कायम लक्ष असते. पक्ष्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी स्वयंचलित तंत्रज्ञान वापरणारे नाशिक जिल्ह्यातील ते पहिले व्यावसायिक शेतकरी आहेत.

नाशिक भागातील मुंगसरे परिसर हा तसा बागायती शेतीचा परिसर. मुंगसरे फाट्यानजीक मुंगसरे ते आनंदवल्ली रस्त्यालगत भोर कुटुंबीयांची शेती आहे. गोरख आणि दीपक भोर या बंधूंचा पोल्ट्री फार्म ही या परिसराची ओळख. वडिलोपार्जीत अवघे दीड एकर क्षेत्र या दोन्ही भावांच्या वाट्याला आलेले. शिक्षण जास्तीत जास्त बारावीपर्यंत, जवळ भांडवलही नाही. या स्थितीत गावातील तरुण रोजंदारी किंवा नोकरीचा पर्याय स्वीकारतात. दीपक भोर यांनीदेखील पोल्ट्री उद्योगातील एका नामांकित कंपनीत सहा वर्षे नोकरी केली. याच काळात पोल्ट्री व्यवसायाची जवळून ओळख झाली. घरी तसा गावरान कोंबडीपालनाचा व्यवसाय केलेला होता. मात्र व्यावसायिक कुक्कुटपालन उद्योगातील संधी लक्षात आल्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्याच कंपनीशी करार करून पूर्णवेळ करार पोल्ट्री उद्योगात उतरले.

योग्य व्यवस्थापन हा "पोल्ट्री'चा पाया

पोल्ट्रीतील व्यवस्थापनाबाबत श्री. भोर म्हणाले, की एका शेडमध्ये वर्षातून पाच बॅचेस निघतात. पक्षी जन्मल्यानंतर काही तासांत शेडमध्ये येतो. कंपनीच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त वजनाचा व उच्च गुणवत्तेचा पक्षी निर्माण करणे, मरतूक कमी ठेवण्याचेही दडपण असते. काटेकोर व्यवस्थापन केल्यासच पक्ष्यांचे अपेक्षित वजन व गुणवत्ता मिळते. आम्ही घरचे सहा जण पोल्ट्रीच्या व्यवस्थापनामध्ये असतो. नियोजनामध्ये मी स्वतः, मोठा भाऊ गोरख आणि भाचा शशिकांत हांडगे यांचा सहभाग असतो. पोल्ट्रीमध्ये वेळेचे गणित अचूकपणे सांभाळावे लागते. मजुरांची टंचाई, वाढते भारनियमन, काही वेळा महत्त्वाच्या औषधांची खरेदी करावी लागते. त्याच बरोबरीने अचानक येणाऱ्या समस्या पोल्ट्री व्यवसायाला भेडसावतात. कामाची वेळ चुकल्यास नुकसान होते. असे असताना चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मागील दहा वर्षांत प्रत्येक वर्षी सलग पाच बॅचेसचे उत्पादन मिळाले आहे.

करार पोल्ट्रीमुळे मिळाली दिशा

सन 1995 पासून सुरवातीला काही वर्षे व्यक्तिगत पातळीवर कुक्कुटपालन केल्यानंतर श्री. भोर मागील दहा वर्षांपासून खासगी कंपनीशी कराराद्वारा जोडले आहेत. करार शेतीमुळे माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकाला मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविणे शक्‍य झाले असल्याचे ते सांगतात. शेडची उभारणी, वीज, पाणी, पक्ष्यांचे संगोपन ही शेतकऱ्याची जबाबदारी असते, तर पक्ष्यांना खाद्य पुरविणे, औषधे व वैद्यकीय साह्य करणे या बाबी कंपनीकडे असतात. प्रचलित कुक्कुटपालनापेक्षा करारपद्धतीने केलेल्या कुक्कुटपालनात जोखीम तुलनेने कमी असल्याचे श्री. दीपक यांनी आवर्जून नमूद केले.

ठेवले खर्चावर नियंत्रण

  • लसीकरण, रॅकिंग करणे, वाहतूक ही कामे कुटुंबातील सहा सदस्य मिळून करतात.
  • पाणी व खाद्याचा पुरवठा स्वयंचलित यंत्रणेद्वारा होतो.
  • 90 टक्के कामे कुटुंबातील सदस्य व स्वयंचलित यंत्रणेने होतात, तर 10 टक्के कामांसाठीच बाहेरचे मजूर लागतात.
  • भाताचे तुस बिगर हंगामात एकदाच खरेदी करून वर्षभराचा साठा केला जातो.
  • शेडच्या आत व बाहेर सीएफएल दिव्यांच्या वापरावर भर दिल्याने विजेवरील खर्चात बचत झाली.
  • कोंबडी खताच्या गुणवत्तेवर चांगले लक्ष दिले. पोल्ट्रीत लिटरमध्ये चुना न वापरता सुपर फॉस्फेटचा वापर केल्यामुळे कोंबडी खतात स्फुरद घटकाचे प्रमाण वाढले. हे खत ट्रॉलीने न देता सुटसुटीत गोण्यातून दिल्यामुळे वाहतूक सोयीची झाली, तसेच प्रचलित दरापेक्षा प्रति किलोमागे चार रुपये अधिक मिळाले. स्थानिक शेतकरी कोंबडी खताची आगाऊ मागणी नोंदवितात. सध्या या लिटरमध्ये कोकोपीटचा वापर करण्याबाबत दीपक यांचा प्रयोग सुरू आहे.

नफा वाढीवर लक्ष

प्रति पक्ष्यामागे औषधे, मजुरी, लसीकरण, बॅंकेचे व्याज, इतर व्यवस्थापन असा एकत्रित खर्च सहा रुपये येतो. प्रति पक्षी 10 रुपये उत्पन्न मिळते म्हणजे प्रत्येक पक्ष्यामागे सरासरी चार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. सरासरी 50 हजार पक्ष्यांमागे खर्च वजा जाता सरासरी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. बॅच प्रमाणे हे उत्पन्न कमी जास्त होते.

यशस्वी पोल्ट्रीसाठी महत्त्वाची सूत्रे

  • उत्पादन खर्च कमी ठेवला.
  • पक्ष्यांच्या वजनात सातत्य.
  • मागील दहा वर्षांत प्रति वर्षी सलग पाच बॅचेस घेतल्या.
  • मरतुकीचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांच्या वर नाही.
  • पक्ष्यांच्या आहार आणि आरोग्यावर लक्ष ठेवले.
  • कुटुंबाच्या सहभागातून मजूरटंचाईवर मात.
  • शेडमधील व्यवस्थापन चांगले ठेवले.
  • स्वयंतचलित यंत्रणेतून वेळ व मजूर खर्चात बचत.

पोल्ट्री व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

  • पिले येण्याअगोदर शेडचे संपूर्ण निर्जंतुकीकरण.
  • पिले वाहतूक करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या गाडीवर जंतूनाशकाची फवारणी करून ती निर्जंतुक करून मगच तिला शेडच्या जवळ आणले जाते.
  • पिले आल्यानंतर पुरेसा प्रकाश, गुणवत्तापूर्ण खाद्य आणि स्वच्छ पाणी उपलब्धतेकडे लक्ष.
  • उन्हाळी दिवसात सव्वा ते दीड चौरस फुटावर एक पक्षी, तर हिवाळ्यात एक चौरस फुटावर एक पक्षी या प्रमाणे व्यवस्था.
  • पहिल्या दिवशी पक्ष्यांना "प्री स्टार्टर' म्हणून मका व सोयाबीनचे पावडर स्वरूपातील मिश्रण दिले जाते. हे खाद्य 10 दिवसांपर्यंत दिले जाते. त्यानंतर पुढे 10 ते 12 दिवस स्टार्टर खाद्य आणि 21 दिवसांनंतर फिनीशर खाद्य दिले जाते.
  • शेडमधील लिटर कायम कोरडे ठेवले जाते. जमिनीवर चार इंचांचा तुसाचा थर राहील याची काळजी घेतली जाते. ओलावा राहिल्यास पिलांना आजार होण्याची शक्‍यता असते.
  • शेडमध्ये 1 ते 15 दिवसांचा काळ हा अतिसंवेदनशील मानला जातो. या काळात 95 फॅरनाईट इतके तापमान कायम ठेवले जाते.
  • उन्हाळ्यात फॉगर्सचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवले जाते.
  • लसीकरण सर्व्‌ात महत्त्वाचे असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने 5 व्या दिवशी लासोटा, 10 व्या दिवशी गंबोरो, 21 व्या दिवशी लासोटा बुस्टर या प्रमाणे लसीकरण केले जाते. यामुळे पिलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
  • शेडमध्ये खेळती हवा राहील याकडे लक्ष दिले जाते. यासाठी भिंतीलगतच्या पडद्यांची उघडझाप गरजेनुसार केली जाते. यासाठीही यंत्राचा वापर करतो.
  • पाणी शुद्धीकरण करूनच पक्ष्यांना दिले जाते, त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
  • योग्य व पुरेसा आहार मिळेल यासाठी "एफसीआर' कायम ठेवण्याकडे लक्ष.
  • आजारी, कमजोर पिलू बाजूला करून त्याची विशेष काळजी. आजाराचे कारण शोधून त्यावर तातडीने उपाय योजना.
  • तज्ज्ञांच्याकडून वेळोवेळी तपासणी, पक्ष्यांच्या वाढीबाबत नोंदी.
  • दर सात दिवसांनी पिलांची वजने घेतली जातात. आवश्‍यकतेनुसार दोन दिवसांनीही वजन घेतले जाते.
  • स्वयंचलित यंत्रणेमुळे मजुरीत बचत झाली असून पाणी व खाद्याचे 10 टक्के होणारे "वेस्टेज' आता दोन टक्‍क्‍यांवर आले आहे.
  • 30 ते 40 दिवसांत पक्षी विक्री योग्य होतो. पक्ष्यांचे अंतिम वजन दीड ते अडीच किलो मिळते.

भोर यांच्या व्यवसायाचा चढता आलेख

वर्ष ---- पक्ष्यांची संख्या
1994 ----- 100
1995 ----- 200
1996 ----- 500
2000 ----- 1000
2001 ----- 3000
2002 ---- 3000
2003 ---- 10,000
2006 ---- 16000 (इंदोरे (ता. दिंडोरी) येथे 3 एकर जमीन खरेदी केली)
2007 ---- 28,000
2008 ----- 28,000
2009 ------ 30,000
2010 ------ 30,000
2011 ----- 35,000 (ऍटोमेशन केले)
2012 ----- 50,000
2013 ------- 51,000
--------------------------------------------------------------------------------------------
संपर्क : दीपक भोर : 9922907759

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate