অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पंढरपूर

पंढरपूर

पंढरपूर

मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. लोकसंख्या ५३,६३८ (१९७१). सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ते मुख्य ठिकाण असून सोलापूरच्या पश्चिमेश ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, स.स. पासून ४५० मी. उंचीवर वसलेले आहे. हे मिरज-कुर्डुवाडी अरूंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे.

या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात. येथील नगरपालिका १८५८ मध्ये स्थापन झाली असून गावास सुद्ध पाणीपुरवठा, अग्‍निशामक सेवा, घरगुती, औद्योगिक, व्यापारी आणि सार्वजनिक उपयोगांसाठी वीज इ. सोयी आहेत. गटारे उघडी असून संडाससफाई भंग्यांमार्फत व मैलावाहतूक ढकलगाडी व ट्रॅक्टरमार्फत होते.

यात्रेच्या दिवसांत सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखणे हे एक आव्हानच असते. सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळीही घाणेरड्या गल्ल्या साफ करवून घेण्याबद्दल व त्यासाठी हलालखोरांस घर पाहून दरमहा एक-दोन पैसे देण्याबद्दल हुकूम झाला होता. गावात नऊ रुग्णालये व २११ रुग्णशय्या, दोन शुश्रूषागृहे व ६० रुग्णशय्या, २० दवाखाने व कुटुंबनियोजन केंद्र आहे. यांशिवाय यात्रेच्या वेळी खास वैद्यकीय सोयी आणि रोगप्रतिबंधक व्यवस्था केली जाते.

गावातील ५७-६ टक्के लोक साक्षर व शिक्षित असून पुरुषांपैकी ७० टक्के स्त्रियांपैकी ४४.१ टक्के साक्षर व शिक्षित आहेत. येथे वाङ्मय, विज्ञान व वाणिज्य शाखांचे एक महाविद्यालय, आठ माध्यमिक शाळा, २८ प्राथमिक शाळा, चार इतर (टंकलेखन, लघुलेखन व व्यावसायिक) शाळा, एक सार्वजनिक वाचनालय तसेच तीन चित्रपटगृहे आहेत. गावात १९७१ मध्ये ५,४०७ राहती घरे व ९,८३८ कुटुंबे होती. तसेच ५३,६३८ लोकसंख्येपैकी २७,९७२ पुरुष व २५,६५६ स्त्रिया, अनुसूचित जातींचे २,५६४ पुरुष आणि २,२,६७ स्त्रिया, अनुसूचित जमातींचे ४८ पुरुष व ४४ स्त्रिया होत्या.

गावात पक्के रस्ते ३४.५३ किमी. व कच्चे रस्ते १.५३ किमी. असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत अरूंद फरसबंदी बोळ आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते, मोठमोठ्या इमारती व सेना महाराज, दामाजीपंत, गाडगे महाराज, बंकटस्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज रोहिदास, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, घाटगे महाराज इत्यादीचे मठ व धर्मशाळा आहेत. गोरक्षण, अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालकाश्रम, फाउंडलिंग होम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय इ. संस्था येथे मोलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलिसठाणे आहे.

मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये, कापूस, तंबाखू, जर्दा, तपकीर, अगरबत्ती, घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्या यांचा मोठा बाजार असतो. येथे आठ बँका व दोन कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, खण, बांगड्या, तुळशीमाळा, अष्टगंध यांचा चांगला खप होतो. वारकर्‍यांस लागणारे टाळ, मृदंग, चिपळ्या इ. वस्तूही येथे मिळतात.

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे, पंढरपूर.विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदीर सु. २०० मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १०७ मी. व दक्षिणोत्तर रूंदी सु. ५२ मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत.

पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत. तसेच येथे गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरूंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत.

मधल्या दरवाज्याच्या दोन बांजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मी. पेक्षा किंचित जास्त आहे.

१८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटालथा त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेशमंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मिमंदिर आहे. ओवरीत नारद व कोपऱ्यात रामेश्वर यांच्या मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे.

जन्ममरणांच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत. विठोबावे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या ह्क्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत; आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. अलीकडे शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालयव्यवस्थेबाबत निर्णय केला होता; तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.

नदीकाठी अकरा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सु. १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सु. १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाला (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत.

अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.

चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर.पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर ५१६ मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो.

सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून, होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठलदेवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामघील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कडूर तुलाक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावाजवळच्या बेंडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. चौऱ्याऐंशीच्या शिलालेखात (१२७३) पंढरपुरास फागनिपूर व विठेबास विठ्ठल किंवा विठल म्हटले आहे. १२६० ते १२७० च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. १२५८ च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचरिते ग्रंथात पंढरपूर, विठ्ठल मंदिर व तेथील गरुड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या १३११ च्या मराठी शिलालेखात पंडरिपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.

विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयानगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही.

महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामांजस्याचा दुवा सांधला जातो

.

संदर्भ :

1. Mate, M. S. Temples and Legends of Maharasthtra, Bombay, 1962.

२. खरे,ग. ह. महाराष्ट्राची चार दैवते, पुणे, १९५८.

३. खरे, ग. ह श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, पुणे, १९६३.

लेखक - प्र. रा. सावंत / ज. ब.कुमठेकर

स्त्रोत मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate