करवीर. दक्षिण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र, जिल्ह्याचे ठिकाण आणि जुन्या कोल्हापूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या गांधीनगर या उपनगरासह २,६७,५१३ (१९७१). हे पंचगंगेच्या दक्षिण तीरावर, पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्यापासून २३२ किमी. असून रुंदमापी लोहमार्गाने ते मुंबईशी जोडलेले आहे. परिसरात छोटा विमानतळही आहे.
पंचगंगेच्या मूळ पात्राचा काही भाग सध्यापेक्षा २१ मी. उंचीवर मिळाल्याने ब्रह्मपुरी येथे उत्खनन करण्यात आले. त्यावरून पहिल्या-दुसऱ्या शतकांतील सातवाहनांच्या कारकीर्दीतील हे वैभवशाली नगर आठव्या-नवव्या शतकांतील भूकंपाने उद्ध्वस्त झाल्याचा पुरावा मिळाला आहे. ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा व रावणेश्वर या मूळ सहा गावांना सांधून त्यांना मध्यवर्ती असे महालक्ष्मी (अंबाबाई) चे देऊळ राष्ट्रकूटांनी नवव्या शतकात पूर्णावस्थेला नेले.
दहाव्या-बाराव्या शतकांत ही शिलाहारांची राजधानी होती. मराठा अंमलात १७३० नंतर या गावास महत्त्व मिळाले व कोल्हापूर गादीची स्थापना झाल्यावर (१७८२) शहराची भरभराट झाली. महालक्ष्मीचे स्थान, अनेक मंदिरे, तीर्थे (कपिलतीर्थ, वरुणतीर्थ वगैरे), तलाव इत्यादींमुळे कोल्हापूरला दक्षिण काशीचे महत्त्व मिळाले.
त्यातच विसाव्या शतकात महाराजांच्या प्रोत्साहनाने येथे शिक्षण, मल्लविद्या, संगीतकला, चित्रकला, चलचित्रविद्या अशा अनेक कलांचा विकास झाला. आज येथे दोन चित्रपटनिर्मिती केंद्रे, आंतरराष्ट्रीय कीर्तीची मल्लविद्या केंद्रे, ख्यातनाम संगीतशाळा, शिवाजी विद्यापीठ व अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहेत. शाहू छत्रपतींनी स्थापलेला क्षात्रजगद्गुरू मठ हे येथील वैशिष्ट्य आहे.
समृद्ध परिसर, मोक्याचे ठिकाण आणि कोकणची उतारपेठ यांमुळे व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात झालेली कोल्हापूरची वाढही लक्षणीय आहे. गुळासाठी ही पेठ सबंध भारतात किंबहुना जगात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांमुळे ही साखरेचीही पेठ मानली जाते.
याशिवाय तांदूळ, भुईमूग, तंबाखू, मिरची, हळद, हातमाग, कापड, चपला आणि चामड्याच्या वस्तू इत्यादींचा मोठा व्यापार येथे चालतो. येथील औद्योगिक वसाहतीत लहानमोठे २५० वर कारखाने असून त्यात डीझेल एंजिने, त्यांचे सुटे भाग, विद्युत् उपकरणे, मोटारींचे व सायकलींचे सुटे भाग, औषधे, सिमेंट, साबण, पोलादाच्या वस्तू इत्यादींचे कारखाने आहेत. औद्योगिक क्षेत्रात दक्षिण महाराष्ट्रात हे अग्रेसर मानले जाते.
अंबाबाईचे भव्य देऊळ, टेंबलाई, अबूच्या मंदिराप्रमाणे नक्षीकाम असलेले जैनमंदिर, तीन राजवाडे, टाउनहॉल, अनेक सुंदर पुतळे, दर्गा, शंकराचार्य मठ, कोटीतीर्थ, रंकाळा तलाव, पंचगंगेचा घाट, साठमारी इ. अनेक प्रेक्षणीय स्थळे या शहरात आहेत. डिसेंबर १९७२ पासून कोल्हापूरला महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. (चित्रपत्र २६).
कुलकर्णी, गो. श्री.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/20/2020
नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जात...
दारनाथ: उत्तर प्रदेशाच्या मध्य कुमाऊँ भागातील अखिल...
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहराजवळ वसलेल्या नेमगिर...
आळंदी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे...