नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जाताना त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो व डोंगराच्या वरच्या टप्प्यात मंदिर दिसते. हा डोंगर चामर लेणी म्हणून प्रसिद्ध असून, हे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चामरलेणी अकराव्या शतकात दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली. म्हणूनच या लेणीला चामरलेणी म्हटले जाते. अनेकजण त्याचा उच्चार चांभार लेणी करतात. मात्र तो उच्चार चुकीचा आहे. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनीराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याचे जैन बांधव सांगतात. म्हणून या ठिकाणाला गजपंथही म्हटले जाते.
राष्ट्रकूटांच्या काळात राजा वीरप्पदेव याने जैन दीक्षा घेतली आणि तो आचार्य वीरसेन नावाने प्रसिद्ध झाला. त्याने नाशिकच्या चामरलेणीत विद्याकेंद्र स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. जैन धर्मातल्या नऊ ब्रलभद्रांपैकी सात बलभद्र हे गजपंथ सिद्धक्षेत्रातून निरनिराळ्या तीर्थंकराच्या काळात मोक्षास गेल्याची आख्यायिका आहे. ही लेणी साधारण ४०० फूट उंचीवर आहे व लेणीपर्यंत जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते.
पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्ती प्रथम दर्शनी पडतात. इथं तीन गुहा आणि एक मंदिर आहे. पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवानांच्या तीन मूर्ती आहेत. भगवान महावीर स्वामी, गुहेच्या बाहेर भगवान नेमीनाथ, चंद्रप्रभू आणि आदिनाथ यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. दुसऱ्या गुहेत शांतीनाथ, कुंथूनाथ आणि अरहनाथ यांच्यासहीत अनेक सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत अकरा फूट उंचीची भगवान पार्श्वनाथांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. लेणीतून बाहेर पडल्यावर या डोंगराला फेरीही मारता येथे. चामरलेणीच्या पायथ्याला पारसनाथांचे जैन मंदिर आहे.
चामर लेणीच्या पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. तर येथेच पायथ्याला जैन मंदिरात प्राचीन मूर्तीचा अनोखे संग्रहालय आहे. दुर्मिळ कलाकुसरीच्या मूर्ती, भुजपत्रावरील हस्तलिखिते आणि पोथ्या, शिलालेख, ब्राँझ धातूच्या विविध मूर्ती असा मनाला मोहून टाकणारा खजिना येथे पाहायला मिळतो. हा खजिना अनुभवला की चामर लेणी पाहिल्याचे सार्थक झाल्याचा फिल येतो. चामर लेणी डोंगराचा थरार अन् अनोखे शिल्पसौंदर्य बच्च कंपनींसाठी नक्कीच आवडेल.
लेखक : रमेश पडवळ
अंतिम सुधारित : 5/8/2020
कोल्हापूर शहर : करवीर. दक्षिण महाराष्ट्रातील तीर्थ...
दारनाथ: उत्तर प्रदेशाच्या मध्य कुमाऊँ भागातील अखिल...
आळंदी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे...
घृष्णेश्वर : औरंगाबाद जिल्ह्यातील ते तीर्थक्षेत्र ...